Thursday 7 April 2016



भटक्या-विमुक्त महिलांना गोधडीची ऊब 
निर्माण सामाजिक विकास संस्थेचा अभिनव गोधडी प्रकल्प 


             "उद्योगातून सामाजिक विकास साधता यावा, यासाठी अभिनव उपक्रम राबविणाऱ्या समाजकार्याचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना ‘टेक महेंद्रा फाउंडेशन’च्या वतीने दर वर्षी फेलोशिप देण्यात येते. याअंतर्गत वैशाली भांडवलकर यांना या वर्षीची फेलोशिप देण्यात आली होती. त्यातून त्यांनी ‘निर्माण’ केलेला गोधडीनिर्मितीचा अभिनव प्रकल्प पारंपरिक गोधडी कलेला चालना देण्यासोबतच भटक्या-विमुक्त महिलांनाही सर्वांगीण आधार देणारा ठरला आहे."

प्रा. महेश ठाकूर 
प्रकल्प निदेशक,
टेक महेंद्र एनजीओ रिसोर्स सेंटर 
       

       भटक्या-विमुक्त समाजातील महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील करीत त्यांच्या परंपरागत कलांना व्यवसायाची जोड देण्यासाठी ‘निर्माण’ या सामाजिक संस्थेच्या वैशाली भांडवलकर यांच्या संकल्पनेतून ‘गोधडी प्रकल्प’ राबविण्यात येत आहे. जून २०१५ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पाची सुरुवात १५ महिलांना घेऊन करण्यात आली. केवळ पारंपरिकच नाही, तर आधुनिक डिझाईन वापरून तयार करण्यात आलेल्या या गोधड्यांची दखल देशातच नाही, तर थेट लंडनच्या राहिवाशांनीही घेतली असून, या गोधड्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकल्पातून वंचित महिलांना कायमचा रोजगार तर मिळालाच; शिवाय सर्वार्थाने सक्षम होण्याची संधीही त्यांना ‘निर्माण’च्या वतीने देण्यात आली.

वैशाली भांडवलकर 


       पुण्यातील कर्वे समाजसेवा संस्थेच्या समाजकार्याच्या विद्यार्थिनी असलेल्या वैशाली भांडवलकर यांनी शहरात दिवसभर भटकून गोधडी शिवणाऱ्या अशिक्षित महिलांना एकत्रित करीत त्यांच्या अंगभूत कौशल्याला वाव देत गोधडी प्रक्ल्पाचे काम सुरू करण्याचा निर्धार केला. यासाठी त्यांनी भटक्या-विमुक्त समाजातील महिलांच्या वस्त्यांवरही वारंवार भेट देत त्यांचे मन वळवून याचे महत्त्व त्यांना समजून देण्याची तारेवरची कसरत करावी लागली. प्रकल्पाचे काम सुरू झाले. मात्र, पारंपरिक गोधडीला आधुनिक रूप देण्यासाठी स्वतःला या कामाचे रीतसर प्रशिक्षण घ्यावे लागले. शेवटी या प्रयत्नांचा लाभ मात्र या महिलांनाच झाला.







     गोधडी बनविणे ही मुळात ग्रामीण हस्तकला. मात्र, आधुनिक काळात त्याचे 'मार्केटिंग' करीत या महिलांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न प्रकल्पाच्या माध्यमातून ‘निर्माण’ करीत आहे. या प्रकल्पात गोधडीचे विविध प्रकार बनविण्यावर भर देत लहान मुलांच्या गोधड्या, पायपुसणी, बॅग, झोपाळ्यावरील कव्हर इत्यादीची निर्मिती केली जाते. ‘निर्माण’च्या या उपक्रमात विविध सामाजिक संस्था, हितचिंतकांची मदत तर मिळालीच; शिवाय ‘निर्माण’च्या कार्यकर्त्यांनीही बचत गटांची प्रदर्शने आणि प्रसंगी घरोघरी जाऊनही गोधडीचे मार्केटिंग केले.

      
   
   पश्चिम महाराष्ट्रातील बारामतीजवळील माळेगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असणारा जोशी समाज रोजगाराच्या आशेने स्थलांतरित झाला. सध्या शहरातील भोसरीतील सद्गुरूनगर, फुगेवस्ती या भागात वस्ती करून असलेल्या या समाजातील पुरुष भविष्य सांगण्याचे काम करतात; तर महिला गोधडी शिवण्याचे काम करतात. मात्र, या महिलांना त्यासाठी शहरात दिवसभर पायी भटकत फिरावे लागत होते. खायला पुरेसे अन्न नाही आणि त्यातच दिवसभराची भटकंती, यामुळे त्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत होते. त्यासाठी या महिलांना एकत्र आणून त्यांच्या कलागुणांना वाव देत रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी हा अभिनव गोधडी प्रकल्प राबविण्यात येत आहे. 






‘निर्माण’ची पार्श्वभूमी
     ‘पे बँक टू सोसायटी’ या भावनेने प्रेरित झालेल्या कर्वे समाजसेवा संस्थेच्या संतोष जाधव, वैशाली भांडवलकर आदींनी समाजातील वंचित घटकांच्या विकासासाठी ‘निर्माण’ या बहुद्देशीय सामाजिक संस्थेची स्थापना केली. त्यातच समाजाच्या मुख्य धारेपासून दूर असलेया भटक्या-विमुक्तांच्या प्रश्नावर काम करण्याचा निर्धार त्यांनी केला. यासाठी विविध उपक्रम राबवतच शाश्वत विकासाचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवले. त्यात शिक्षणापासून वंचित मुलांसाठी ‘सावित्रीची शाळा’ या अभिनव उपक्रमाबरोबरच आधुनिक काळात तरुणांना सक्षम करण्यासाठी ‘टेक महेंद्रा’च्या माध्यमातून संगणक, इंग्रजी भाषा, व्यक्तिमत्त्व विकासासह विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी ‘स्मार्ट सेंटर’ अश्ाा उपक्रमांचा समावेश आहे.



दिनांक ६ एप्रिल २०१६ 
'दैनिक नवराष्ट्र' 
मध्ये प्रकाशित झालेली माझी ही न्यूज स्टोरी 



No comments:

Post a Comment