Wednesday 30 March 2016

अजब तुझे सरकार…
विजय मल्ल्या प्रकरणी एक प्रतिक्रया 

     
 

      ‘प्रसिद्ध’ उद्योजक विजय मल्ल्या यांनी बँकांकडून घेतलेल्या ९ हजार कोटी रुपयांपैकी ४ हजार कोटी रुपयांची परतफेड करण्याची तयारी न्यायालयापुढे दाखवली. मुळात, रंगेल्याचे रंकरयतेवरील हे थोर उपकारच म्हटले पाहिजे. शेवटी 'गेलेला माणूस कधी परत येत नाही' हा भारतीय तत्त्वज्ञानाचा नियम त्यांनी यानिमित्त खोटा ठरविला आणि 'सजग' मीडियालाही खोटे पाडले, असेच आता म्हटले पाहिजे. मुळात भ्रष्टाचार हा काही आपल्या देशात नवा नाही. 'रोजचेच मढे त्याला कोण रडे?' अशीच अवस्था भ्रष्टाचाराच्या रोगाबद्दल झाल्याचे दिसून येते. त्यातूनच त्यावर औषधे शोधण्याचा प्रयत्न करणाराच मूर्ख असल्याचेही चित्र रंगविले जाते. मग अवघ्या व्यवस्थेला बोट लावून गेलेले 'आदरणीय' मल्ल्याजी शहाणे समजले जातात. मात्र, 'अति शहाणा त्याचा बैल रिकामा' कधी ना कधी होतोच; त्यातलाच हा प्रकार. मुळात 'चोर सोडून सन्याशालाच फाशी'ची परंपरा असल्याने असे प्रकार आपल्या नशिबी आहेतच, हे सांगणे न लागे.   

‘जाणीव’ तंबाखूमुक्तीची
जाणीव सामाजिक संस्थेचा अभिनव उपक्रम

   
        
         व्यसनमुक्त समाजासाठी संकल्पाची सुरुवात तंबाखूमुक्तीपासून करून ‘जाणीव’ या सामाजिक संस्थेच्या वतीने विविध अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यात जिल्ह्यातील प्रत्येक शाळांपासून ते विविध शासकीय कार्यालये, पोलीस स्टेशन आणि तुरुंगात जाऊनही विविध खेळ, पथनाट्य, गाणी आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवीत समाजात तंबाखूमुक्तीची ‘जाणीव’ रुजविण्याचा प्रयत्न केला जातो.




       ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांमधील वाढत्या तंबाखूचे व्यसन बघता त्याला पायबंद घालण्यासाठी ‘जाणीव’च्या वतीने अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांच्या पालकांपर्यंत व्यसनमुक्तीचा भावनिक संदेश पोहोचविण्याचा प्रयत्नही कार्यकर्त्यांनी केला. या उपक्रमांतर्गत आजपर्यंत जिल्ह्यातील २०० शाळांमध्ये जाऊन प्रत्यक्ष २० शाळा पूर्णपणे तंबाखूमुक्त करण्याचा विक्रमही ‘जाणीव’ने केला आहे. त्यामुळेच, आज जिल्ह्यातील वेळू, दिवे, झेंडेवाडी, कुरुंगवळी या गावांना तंबाखूमुक्त शाळांचा गौरव प्राप्त झाला. मुळात तंबाखू नियंत्रण कायदा २००३ च्या कलम ६ नुसार शाळेच्या १०० मीटरच्या परिसरात अमली वा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करता येत नाही.


तंबाखूविरोधी शालेय आर्मी
तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विळख्यात सापडलेल्या समाजाला तंबाखूमुक्त करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांची अभिनव ‘आर्मी’ तयार करण्यात आली आहे. या शालेय आर्मीची सुरुवात जानेवारी २०१५ मध्ये करण्यात आली होती. यात विद्यार्थ्यांचाही मोठ्या प्रमाणात सहयोग ‘जाणीव’ला लाभला. विद्यार्थ्यांनीही शाळेच्या १०० मीटर परिसरातील पानटपऱ्यांना भेटी देऊन तंबाखूला विरोध दर्शविला. आपल्या व्यसनी पालकांनाही याअंतर्गत त्यांनी भावनिक ‘समज’ दिली. 

तंबाखूचे भीषण वास्तव 


        दरवर्षी जगात सुमारे ६० लाख लोकांचा तंबाखूमुळे मृत्यू होतो. भारतात याचे प्रमाण दरदिवशी २५००, तर दरवर्षाला १० लाख एवढे आहे. वैश्विक युवा तंबाखू सर्वेक्षणानुसार भारतात सध्या १४.६ टक्के मुले तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करीत आहेत. त्यामध्ये मुलांचे प्रमाण १९ टक्के, तर मुलींचे ८.३ टक्के आहे. या मुलांना ह्दयविकार, फुप्फूस आणि श्वासोच्छवासासंदर्भातील रोग, कॅन्सर, नपुंसकत्व, वंधत्व आणि इतर आजारांना सामोरे जावे लागत आहे. समाजातही १८ वर्षे वयाच्या आतील मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत आहे. शाळांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूची अवैध विक्री होत आहे.




मनोगत 

            "व्यसनमुक्त समाज हे आपल्या सर्वांचेच ध्येय आहे. त्यासाठी ‘जाणीव’च्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करीत आहोत. आमच्या या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात समाजाचा सकारात्मक प्रतिसाद लाभात असून, हा उपक्रम आता संपूर्ण देशभरात राबविला जावा, यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत."
- मधुकर बिबवे 
संस्थापक अध्यक्ष, जाणीव सामाजिक संघटना, पुणे.

-------------


Monday 28 March 2016



निस्वार्थी कार्यकर्त्याचा 'जीवनगौरव'
 (वेध 'विजय यशवंत विल्हेकर' यांच्या जीवन कार्याचा)


               "स्वतःची कोणतीही आर्थिक परिस्थिती नसतांना शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करणाऱ्या विजय विल्हेकरांना आमच्या संस्थेच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. निरपेक्ष वृत्तीने काम करण्याची त्यांची प्रेरणा समाजाने घ्यावी हाच त्यामागचा उद्देश आहे." 
अभिजित फाडके
आपुलकी फाउंडेशन, पुणे..  
  




       महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी निस्वार्थ भावनेने काम करणारे विजय यशवंत विल्हेकर यांना पुण्यातील 'आपुलकी फाउंडेशन' च्या वतीने देण्यात येणारा 'आपुलकी जीवनगौरव पुरस्कार' नुकताच जाहीर झाला. अमरावती येथे दि. २९ मार्च रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येईल. त्यात वनराईचे गिरीश गांधी, जेष्ठ कवी विठ्ठल वाघ, बाळासाहेब कुलकर्णी आदी उपस्थित राहणार आहेत. एक लाख रुपये रोख, सन्मान चिन्ह असे स्वरुप असलेल्या या पुरस्काराची रक्कम मात्र नेहमी प्रमाणेच विल्हेकर सर यांनी शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबियांना मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे.  


     
       माझा या 'अवलिया' व्यक्तिमत्वाशी परिचय झाला तो एका वादविवाद स्पर्धेच्या निमित्ताने. सर त्या स्पर्धेचे परीक्षक म्हणून आले होते. त्या स्पर्धेत मी यशस्वी होऊ शकलो नाही. मात्र, पुढील काळात माझ्यावर पित्यावत प्रेम करणाऱ्या सरांचा कायमचा ऋणानुबंध जुडला. आदिवास्यांच्या भाषेतील अनेक गाणी त्यांनी आम्हाला गावून दाखवली आणि चळवळी विषयीच्या गप्पाही आमच्याशी त्यांनी मारल्या होत्या.




     मुळात विजय यशवंत विल्हेकर यांच्या कार्याचा आढावा घेताना त्यांनी १९७० च्या दशकापासून ते आजवर केलेल्या व्यापक कार्याचा आलेख आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. देशातील विविध समस्यांविरुद्ध आवाज उठवत व्यापक जनआंदोलन निर्माण करण्यासाठी सरांची भूमिका महत्वाची ठरते. त्यातच महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी केलेले प्रयत्नही आदर्श ठरले आहेत. खरेतर वडिलांचा स्वातंत्र्य चळवळीचा वारसा आणि आईची कुटुंबा नियोजनाच्या चळवळीतील भूमिकेचे संस्कार त्यांच्यावर बालपणीच झाले होते. त्यातच वयाच्या १२ - १३ व्या वर्षात सरांनी विदर्भात कृषी विद्यापीठ व्हावे या साठीच्या मोठ्या भावाच्या मार्गदर्शनात आपला सहभाग नोंदवला. पुढे राष्ट्रीय विचारांनी प्रेरित होत जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनातही जनजागरण कार्यरत महत्वाच्या वाटा त्यांनी उचलला. जेपी यांच्या 'छात्र संघर्ष वाहिनी' या संघटनेत सामील होऊन देशभरात विद्द्यार्थ्यांचे जाळे त्यांनी तयार केले. पुढे महाराष्ट्रातील नामांतर चळवळीत सहभागी होऊन आंबेडकरी चळवळीशीही त्यांचे घट्ट नाते निर्माण झाले. 



       

        शेती आणि शेतकरी यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सरांवर पित्याप्रमाणे प्रेम करणाऱ्या शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेतही पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून आपण सहभागी झाल्याचे ते मोठ्या अभिमानाने सांगतात. याच आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी विदर्भात महिलांच्या नावे शेत जमिनी असाव्यात या साठीही प्रयत्न केले. त्यात १९८७ साली राबवण्यात आलेले 'लक्ष्मी मुक्ती आंदोलन' महत्वाचे ठरले. १९८८ मध्ये देशव्यापी 'शेतकरी कर्ज मुक्ती आंदोलन' छेडत सरकारला शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी त्यांनी भाग पडले. 

     
        विल्हेकर सरांच्या या कामांची दाखल घेत विविध संस्था संघटनांनी त्यांना अनेक पुरस्कार देऊन गौरवले आहे. त्यात २०१२ चा निळू फुले पुरस्कार, आम्ही सारे फाउंडेशनचा कार्यकर्ता पुरस्कार अशी प्रातिनिधिक नावे सांगता येतील. मात्र, मिळालेल्या या पुरस्कारांची रक्कमही त्यांनी आपली आर्थिक परिस्थिती नसतांनाही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना सुपूर्द केली. आपल्या चळवळींचा सर्व प्रवासही त्यांनी विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून वेळोवेळी मांडला आहे. त्यात २०१२ मध्ये या विषयावरचे 'अंबर हंबर' हे पुस्तकही प्रकाशित झाले. अलीकडेच मनोविकास प्रकाशनाच्या वतीने त्यांचे 'फकीरीचे वैभव' हे दुसरे पुस्तक येऊ घातले आहे. 



Saturday 5 March 2016

सावित्रीची शाळा 


'निर्माण' सामाजिक संस्थेचा सावित्रीची शाळा प्रकल्प
सावित्रीच्या शाळेला एक वर्ष पूर्ण
वस्तीवर जावून दिले जाते मुलांना शिक्षण…

         
    
    समाजातील भटक्या विमुक्ताना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 'निर्माण' ही सामाजिक संस्था 'सावित्रीच्या शाळा' हा अभिनव उपक्रम राबवत आहे. विश्रांतवाडीच्या फुलेनगर येथील भटक्यांच्या पालावर जावून ६० ते ७० वंचित मुलांना शिक्षण देण्याचे काम 'निर्माण' च्या वतीने केले जाते.  

          पुणे - आळंदी रस्त्यावर विश्रांतावाडी नजिकच्या परिसरात भटक्या विमुक्त समाजातील नागरिक गेल्या १० ते १२ वर्षांपासून राहत आहेत. कोणत्याही प्रकारच्या सुविधा आणि सवलतींपासून वंचित असणाऱ्या त्या समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सावित्रिबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने गेल्या वर्षी 'सावित्रीची शाळा' या प्रकल्पाची स्थापना करण्यात आली होती. त्यात मुलांना शालेय शिक्षणाबरोबरच आरोग्याच्या चांगल्या सवयी सुद्धा लावल्या जातात. 

   भटक्या विमुक्तांच्या वस्तीमधील मुलांचे पालक दिवसभर कामासाठी बाहेर असतात. अशावेळी त्यांच्या छोट्या भावंडाना सांभाळण्याची जबाबदारी मोठ्या मुलांवर येते. या समाजात बालमजुरीचे प्रमाणही मोठे आहे. मुलांना मात्र त्यामुळे शिक्षण मिळू शकत नाही. त्यावर उपाय म्हणून ;निर्माण' चे कार्यकर्ते वस्तीवर जावून शाळा भरवतात. त्यातून मुलांना कथा, गाणी, विविध खेळांच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते.   

            केंद्र सरकारने ६ ते १४ वर्ष वयोगटासाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला. मात्र, आजही लाखो मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. यासाठी सर्वाना शिक्षण मिळावे हा महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेत 'सावित्रीची शाळा' हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती 'निर्माण' संस्थेचे संस्थापक संतोष जाधव यांनी 'नवराष्ट्र'शी बोलतांना दिली. 

             'निर्माण' च्या या उपक्रमात समाजातील विविध घटकांतील नागरिक सहभागी होत असून याला मोठ्या प्रमाणात सहकार्याची गरज आहे. मुळात, समाजकार्याचे शिक्षण घेतलेल्या संतोष जाधव यांनी सामाजिक बांधिलकीपोटी 'निर्माण' या संस्थेची स्थापना २००६ मध्ये केली होती. ज्या समाजातून आपण वर आलो त्या सामाजाला काही तरी दिले पाहिजे इतकाच काय तो यामागचा हेतू होता. पण, हीच छोटी सुरुवात नव्या सामाज प्रयोगाची नांदी ठरली. त्यातूनच अनेक उपक्रम समर्थपणे राबवले गेले. याच पैकी एक म्हणजे 'सावित्रीची शाळा' हा होय. हा प्रकल्प राबवण्यासाठी अशोक हतागळे, नामदेव कसबे, संदीप आखडे, अप्पा चाबुकस्वार आदी कार्यकर्ते प्रयत्न करीत आहेत.  


मनोगत- 


        "सावित्रीची शाळा' हा अभिनव उपक्रम आमची संस्था राबवत आहे. स्वातंत्र्यानंतरच्या इतक्या वर्षांच्या काळातही समाजातील सर्व घटकांना शिक्षण मिळू शकले नाही. त्यासाठी सामाजिक जाणीवेतून या प्रकल्पाचे निर्माण आम्ही केले होते. शाळा जर मुलांपर्यंत पोहचत नसेल तर शाळेने त्यांच्याकडे पोहोचावे. म्हणून भटक्या विमुक्तांचे जीवन जगणाऱ्या माणसांच्या पालावर जावूनच आम्ही हा प्रकल्प राबवीत आहोत."
संतोष जाधव 
संस्थापक - अध्यक्ष, निर्माण सामाजिक संस्था. 


    "देशाच्या महासत्तेची स्वप्न आपण बघतो आहोत पण समाजातील सर्व घटकांच्या समान विकासाशिवाय ते शक्य होणार नाही. 'सर्वांना शिक्षण' हा आपला मुलभुत अधिकारही सर्वाना मिळू शकला नाही. याच वंचितांपर्यंत शिक्षण घेऊन जाण्यासाठी 'सावित्रीची शाळा' हा प्रकल्प महत्वाचा ठरतो."
वैशाली भांडवलकर  
संचालिका, भटक्या - विमुक्त महिला अधिकार आंदोलन  


========================================

दिनांक ६ मार्च २०१६ च्या दैनिक 'नवराष्ट्र' पुणे मधे 'सावित्रीची शाळा' या 'निर्माण' संस्थेच्या अभिनव उपक्रमाचा आढावा घेणारी 
माझी ही 
'न्यूज स्टोरी' 



  


Friday 4 March 2016

       "आज पर्यंत माहेरच्या माध्यमातून  महाराष्ट्रात काम करीत आहोत पण आता मात्र मागे वळून बघताना खूप काही कारायचे बाकी आहे असे वाटते. आजही आपले मुलभुत प्रश्न सुटू शकले नाहीत. समाजातील फार मोठा वर्ग अन्न, निवारा, शिक्षण, आरोग्य या पासून वंचित आहे. समाजातील हेच वास्तव बघून मला 'माहेर' ची प्रेरणा मिळाली होती. पण माझ्या साठी हे काम नाही तर प्रेमाचा विषय आहे."

                                                                                                      -सिस्टर ल्युसी कुरियन

                                                             संस्थापिका,माहेर आश्रम सामाजिक संस्था, पुणे.

---------------------------------------------------------------------------------------------
ज्यांना नाही कुणी... 
वंचित निराधारांना 'माहेर आश्रम' चा आधार 

   

   
     माणूस चंद्रावर, मंगळावर पोहचला पण शेजारच्या दाराआडच्या दुखा:पर्यंत मात्र पोहचू शकला नाही. अश्यावेळी रस्त्यावर भटकणाऱ्या अनाथ, अपंग आणि निराधारांचा तर विचारच आपाल्या पैकी किती जणांच्या मनात येईल हा संशोधनाचा विषय  ठरावा. समाजातील याच निराधार वंचितांना आधार देण्याचा वसा घेतला आहे ते पुण्याच्या 'माहेर आश्रम' या सामाजिक संस्थेने.

  
       आपण नेहमी ऐकत आलेली न्यूटनची गोष्ट खूप प्रासंगिक आहे. एक सफरचंद न्यूटनच्या डोक्यावर पडलं. आणि त्यातून शोध लागला तो जग बदलणाऱ्या  गुरुत्वाकर्षणाचा. आपल्यापैकी सर्वांच्याच जीवनात घडणाऱ्या सर्वसामान्य घटनांपैकी एक अशी ही घटना. आपल्या डोक्यावर सफरचंद नाही तर आणखी काही पडेल इतकाच काय तो फरक. मात्र जीवनाच्या छोट्या प्रसंगातूनही जीवनाची दृष्टी यावी यासाठी असावी लागते ती 'देखणे वाली नजर'. मग त्यातूनच निर्माण होत असतात आपले रोल मॉडल्स आणि आदर्श. अश्याच एका आदर्शाची ही गोष्ट.    


      


       आपण नेहमी ऐकत आलेली न्यूटनची गोष्ट खूप प्रासंगिक आहे. एक सफरचंद न्यूटनच्या डोक्यावर पडलं. आणि त्यातून शोध लागला तो जग बदलणाऱ्या  गुरुत्वाकर्षणाचा. आपल्यापैकी सर्वांच्याच जीवनात घडणाऱ्या सर्वसामान्य घटनांपैकी एक अशी ही घटना. आपल्या डोक्यावर सफरचंद नाही तर आणखी काही पडेल इतकाच काय तो फरक. मात्र जीवनाच्या छोट्या प्रसंगातूनही जीवनाची दृष्टी यावी यासाठी असावी लागते ती 'देखणे वाली नजर'. मग त्यातूनच निर्माण होत असतात आपले रोल मॉडल्स आणि आदर्श. अश्याच एका आदर्शाची ही गोष्ट.    

      
     
         आज ‘माहेर’ हे वंचितांचे हक्काचे घर बनले आहे. संस्थेच्या माध्यमातून ६ घरांमधून ३०० निराधार महिला, ३० घरांमधून ८८२ बालके तर २ घरांत ५२ निराधार पुरुषांना आश्रय मिळाला आहे. माहेर चा उद्देशाच मुळी रस्त्यावरच्या निराधार माणसाला आश्रय देण्याचा असल्याने त्या कार्याची फलश्रुती म्हणजे आजपर्यंत ४००० महिला, १४० पुरुष व ३८०० बालकांनी माहेरचा आधार घेतला आहे. माहेरच्या २३ विविध प्रकल्पांच्या माध्यमातून समाजाच्या शास्वत विकासासाठी प्रयत्न केल्या जात आहेत. त्यात ५५२ बचत गट, १३ अभ्यासिका वर्ग, ११ बालवाड्या व गंमत शाळा कार्यरत आहेत.  

...आणि काही प्रसंग 


        काही दिवसांपूर्वीची ही एक गोष्ट. एक मनोरुग्ण महिला रस्त्यावर विवस्त्र अवस्थेत माहेरच्या कार्यकर्त्यांना सापडली. त्यांनी तिला माहेर मध्ये आणले. तिची तपासणी केल्यावर ती गर्भवती असल्याचे आढळूण आले. आश्या अवस्थेत ‘माहेर’ ने तिला आधार दिला. काही दिवसानंतर तिची प्रसुतीही माहेर मध्ये पार पडली. तिने एका गोंडस बाला जन्म दिला. कार्यकर्त्यांनी त्या बाळाचं मोठं सार्थ नाव ठेवलं. कबीर. या आणि अश्या किती तरी कथा ‘माहेर’ बरोबर जोडल्या गेल्या आहेत. अश्याच मुलांमधली मुले आता उच्च शिक्षण घेत असून काही मोठ्या पदांवरती काम करत समाजात स्वतःचे आणि माहेरचे नाव करीत आहेत.               

       अमरनाथ चौधरी या अनाथ मुलाला त्याच्या आजोबांनी वय झाल्याने मुलाची जबाबदारी पेलता येत नाही म्हणून माहेर आश्रमात आणून सोडले. मायेची उब गमावलेल्या अमरनाथला माहेरने सावली दिली. याच मुलाने पुढे १० वीच्या परीक्षेत ८६ टक्के गुण मिळवले. हाच मुलगा आज जर्मनीत उच्च शिक्षण घेत आहे.

      


          आरती सयाम ही तळेगाव ढमढेरेची मुलगी. त्या तीन बहिणी. वडिलांनी घर सोडले. आई मानसिक आजारी. अश्या अवस्थेत माहेरने तिला आधार दिला. माहेरच्या प्रयत्नाचे चीज करीत आरतीनेही १० वीच्या परीक्षेत ७९ टक्के गुण मिळवीत यश मिळवले. आज हीच मुलगी नेदरलँड मध्ये उच्च शिक्षण घेत आहे. एकेकाळी ‘विशेष मुल’ म्हणून गणल्या गेलेल्या दर्शन पाटील या मुलाने एका वर्षात 3 परीक्षा पास करीत लंडन येथील कार्यक्रमात सहभाग नोंदवला. रवीना काटे या मुलीला तीन बहिणी मात्र आई वडिलांची सावली नव्हती. अश्या काळत त्यांना सावरत उभे करण्याचे काम माहेर ने केले. आज हीच मुलगी अमेरिकेत शिक्षण घेत आहे. माहेरच्या विद्द्यार्थ्यांनी जागतिक स्तरावरही बाजी मारली असून तृप्ती शिंदे आणि पूजा बढे या मुली मेक्सिको येथे झालेल्या ग्लोबल लीडरशिप फोरम मधेही सहभागी झाली होती.


एक मनोगत 


      “मानवता हाच खरा धर्म या तत्वाने समाजातील सर्व जाती व धर्मांच्या नागरीकांसाठी आमची संस्था काम करते. ज्यांना कोणीही नाही त्यांना समाजाच्या मुख्यधारेत आणण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. आजवर याच भावनेने आम्ही काम करीत राहिलो आहोत. त्याचा लाभ हजारो नागरिकांना झाला आहे.”


-हिरा बेगमुल्ला
अध्यक्ष (माहेर संस्था, पुणे.)



-----------------------------------------------------


दि. ३ मार्च २०१६ च्या 'दैनिक नवराष्ट्र' पुणे मधे 
प्रकाशित झालेली ही माझी 
'अँकर न्यूज स्टोरी...'

  

      ==============================

माहेर संस्थेचे उपक्रम 


-वात्सल्य धाम- 

मानसिक अपंगत्व असणाऱ्या महिलांसाठी हक्काचे घर.
-आधार-
खेड्यातील महिला व तरुणांना रोजगार संधीची उपलब्धता योजना.
-ज्ञानगंगा-
 वंचित खेड्यांसाठी वाचनालय प्रकल्प.
-स्वावलंबन- 
 बचत गटांची चळवळ
-कलासागर- 
शाळा सोडलेल्या मुला-मुलींसाठी मुक्त शाळेचा अभिनव उपक्रम.
-प्रगती- 
 खेड्यांसाठी जाणीव जागृती कार्यक्रम.
-परिश्रम- 
व्यावसाईक प्रशिक्षण व उत्पादन केंद्र.
-गंमत शाळा- 
 वीट कामगारांच्या मुलांसाठी दिवस शाळा प्रकल्प.
-किशोरधाम-
अनाथ व विघटीत कुटुंबातील मुलांसाठी हकाचे घर.
-ममाताधाम- 
परित्यक्ता महिलांसाठी घर. 





copyright_kunalramteke_march_2016