Tuesday 12 April 2016

'ओपन' ब्लॉक

          भारतीय करक्षेत्रातील आकडेवारीचा विचार केल्यास २०१२-१३ या वर्षांत ८६ लाख नागरिकांनी करभरणा केला, तर २०१५-१६ या वर्षात २१३ लाख नागरिकांनी करभरणा केला. बदलत्या काळात ही संख्या वेगाने वाढणार असून, देशात ‘एच. आर. ब्लॉक’सारख्या कंपन्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.


      बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे स्थान विकसनशील देश म्हणून महत्त्वाचे असून, करदात्यांच्या सहयोगातूनच देशाची अर्थव्यवस्था सक्षम होणार आहे. मात्र, गुंतागुंतीच्या करप्रणालीचे ज्ञान आणि कर भरण्यासाठी लागणारी किमान कौशल्ये यांच्या अभावातून सर्वसामान्य करदात्यांना समस्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी भारतीय करप्रणाली समजावत करदात्यांना सुलभ होईल अशी सेवा प्रदान करण्यासाठी ‘एच. आर. ब्लॉक’ ही आंतरराष्ट्रीय कंपनी प्रयत्न करीत आहे. 

        
       ‘एच. आर. ब्लॉक’ ही करभरणा क्षेत्रातील कंपनी असून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, केनडा आदींसह भारतातही वैयक्तिक करभरणा क्षेत्रात सेवा प्रदान करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजाविण्याचे ध्येय असल्याचे प्रतिपादन सांकला यांनी केले. भारत वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असून, त्यात करदात्यांचेही योगदान महत्त्वाचे ठरत आहे. मात्र, जगभरातील विकसित देशांच्या तुलनेत भारताचा असलेला करभरणा क्षेत्रातील वाटा केवळ ३.२ टक्के इतका नगण्य असला; तरीही भविष्यात प्रगत राष्ट्र म्हणून उदयास येणाऱ्या देशात करदात्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या समस्यांमध्ये न गुंतता, सुलभ पद्धतीने करभरणा करण्याची सेवा उपलब्ध करवून देण्यासाठी ‘एच. आर. ब्लॉक’ कंपनीकडून प्रयत्न केले जात असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. देशातील ७०० करतज्ज्ञ या कंपनीचे भाग असून, व्यक्तिगत करधाराकांना केवळ २९९ रुपयांपासून सेवा प्रदान करीत कंपनीद्वारे विविध सूटही देण्यात येते. योग्य वेळेत कर चुकविण्यासाठी प्रयत्न करणे, हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. 
   
काय आहे ‘एच. आर. ब्लॉक’ ?
        अमेरिकेतील ‘एच. आर. ब्लॉक’ ही वैयक्तिक करभरणा क्षेत्रातील महत्त्वाची आंतरराष्ट्रीय कंपनी असून, या कंपनीची स्थापना १९५५ मध्ये हेन्री व रिचर्ड ब्लूच यांनी केली. अमेरिकेतील एकूण करधारकांपैकी सुमारे १५ टक्के नागरिक ‘एच. आर.’च्या सेवांचा लाभ नियमितपणे घेतात. अमेरिकेसह ऑस्ट्रेलिया, कॅनडा, २०१२ पासून भारतातही या कंपनीने सेवा प्रदान केली असून, देशात १०० केंद्रे कार्यरत आहेत. 


मनोगत-

       "भारतात करदात्यांची संख्या बदलत्या अर्थव्यवस्थेत झपाट्याने वाढत असल्याने या करदात्यांना योग्य मार्गदर्शन करीत करभरण्याच्या साहाय्यासाठी ‘एच. आर.’ प्रयत्नशील आहे. येत्या २०२० सालापर्यंत कंपनीचे ध्येय १० लाख करधारकांना सेवा पुरविण्याचे आहे."     


रोहन पारेख

व्यवस्थापकीय संचालक
‘एच. आर. ब्लॉक’ कंपनी



        "भारतासारख्या विकसनशील देशात सुमारे १०० कोटि रुपयांची गुंतवणूक करण्याबरोबरच येथील तरुणांना रोजगा उपलब्ध करवून देण्यात 'एच. आर. ब्लॉक'चे मोठे आहे. देशात कर क्षेत्रात सेवा देण्यासोबतच आमचा हेतु विकासात नागरिकांची भागीदारी वाढवत सामाजिक जबाबदारी जपणे हे ही आहे." 
वैभव सांकला 
मा.संचालक, एच. आर. ब्लॉक
  

Sunday 10 April 2016

साक्षात महात्मा येतो तेव्हा
महात्मा फुले जयंती निमित्त पाणी बचतिचा संदेश देण्यासाठी पुण्यातील एक अभिनव उपक्रम 



       
      महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त अभिनव उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत पुणे कॅम्प भागात समता सामाजिक संस्थेच्यावतीने भीमपुरा गल्ली मध्ये सार्वजनिक नळकोंडाळ्यावर जाऊन पाण्याची बचत करण्याचा संदेश साक्षात महात्मा जोतीबा फुले यांच्या वेषभूषेत समाजप्रबोधनकार कुमार आहेर यांनी दिला‘सध्या पाणी टंचाई असल्याने पाण्याची बचत करा अन्यथा मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल’ असा संदेश यावेळी कुमार आहेर यांनी पाणी भरण्यासाठी आलेल्या महिलांना दिल. यावेळी महिलांनी देखील पाणी बचत करण्याची शपथ घेतली . 







Photo - Mandar Tannu (Pune)

Friday 8 April 2016

काय म्हणाल्या विद्द्या बाळ ?
शनी शिंगणापूर प्रकरणी विद्द्या बाळ यांनी माझ्याशी केलेल्या चर्चेतील त्यांचे मनोगत वाचकांसाठी देत आहे...  
  




     शनी शिंगणापूर मंदिरात महिलांना  मिळालेला प्रवेश माझ्यासाठी आनंदाचा विषय असली तरीही हा निर्मळ आणि निर्भेळ आनंद नाही. महिलांचा ऐतिहासिक लढा आणि न्यायालयाचा निर्णय यांचा हा एकत्रित परिणाम आहे. भारतीय राज्य घटनेने दिलेला समतेचा मूलमंत्र घेऊन आम्ही सनदशीर मार्गाने मंदिर प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्नशील होतो. मात्र, भारतीय राज्यघटना व न्यायालयाने दिलेल्या निर्णायाचा अवमान करीत महिलांना मंदिर प्रवेश देण्यात येत नव्हता. उलट त्यासाठी विरोध करणाऱ्यांनाच सरकार व पोलिसांनी संरक्षण दिले. शनी शिंगणापूर मंदिर प्रशासनानेही महिलांना प्रवेश द्यावा लागेल म्हणूण पुरुषांनाही चाबुतऱ्यावर प्रवेश नाकारला होता. मात्र, पाडव्याच्या दिवशी पुरुषांच्या समुहाने बळजबरीने शनी चबुतऱ्यावर प्रवेश केला. त्यातूनच भीतीपोटी आता महिलानाही प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. महिलांना मिळत
असलेला हा मंदिर प्रवेश मात्र घटनेला अभिप्रेत असलेल्या समता तत्वाचे पालन करणारा नाही. मुळात समता आणि भेदभावाच्या पलीकडचे वातावरण निर्माण करणे हे आपले ध्येय आहे. मात्र, या बाबतीत जंगल कायदा वापरत ‘बळी तो कान पीडी’ हे सूत्र अमलात आणले गेले. मुळात घुसखोरी करून  अमलात आणलेला कायदा ही घटनेला अभिप्रेत असलेल्या तत्वांची सकारात्मक अमलबजावणी नाही. त्यातून कायद्याच्या मुळ उद्देशावरच गदा येते. घटनेची पायमल्ली करीत परंपराचा प्रमाण मानणाऱ्यांनी याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. हा मंदिर प्रवेश म्हणजे कायद्याचा संपूर्ण विजय झाला असे नाही उलट पोलीस आणि सरकारनेच गुन्हेगारांना कायदा मोडण्यास सहकार्य केले असल्याने त्यांनीच घटनाभांग केला आहे. त्यासाठी त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात यायला हवे. 


लढ्याची पार्श्वभूमी 
शनी शिंगणापूर मंदिर प्रवेशाचा मुद्दा अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या चळवळीचा एक भाग होता. नरेंद्र दाभोळकर यांच्या पुढाकाराने २००० साली यासाठी आंदोलनाची सुरुवात करण्यात आली होती. त्यासाठी अहमदनगर येथे सत्याग्रहही करण्यात आला होता. त्यावेळी डॉ. नरेंद्र दाभोळकर, डॉ. श्रीराम लागू, पुष्पा भावे आदींनी व्यापक लढा निर्माण केला होता. त्यावेळी त्यांना अटकही करण्यात आली होती. 

चळवळीची भूमिका 
कोणत्याही चळवळीला वैचारिक पाया असणे महत्वाचे असते. मी नास्तिक आहे. मग मला मंदिर प्रवेशाशी काय कर्तव्य असा नेहमी प्रश्न विचारण्यात येतो. मात्र, इथे प्रश्न आहे तो समतेचा. 

                                                  



                                                     -विद्या बाळ यांच्याशी केलेल्या चर्चेत त्यांनी व्यक्त केलेले मनोगत


  

Thursday 7 April 2016



भटक्या-विमुक्त महिलांना गोधडीची ऊब 
निर्माण सामाजिक विकास संस्थेचा अभिनव गोधडी प्रकल्प 


             "उद्योगातून सामाजिक विकास साधता यावा, यासाठी अभिनव उपक्रम राबविणाऱ्या समाजकार्याचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना ‘टेक महेंद्रा फाउंडेशन’च्या वतीने दर वर्षी फेलोशिप देण्यात येते. याअंतर्गत वैशाली भांडवलकर यांना या वर्षीची फेलोशिप देण्यात आली होती. त्यातून त्यांनी ‘निर्माण’ केलेला गोधडीनिर्मितीचा अभिनव प्रकल्प पारंपरिक गोधडी कलेला चालना देण्यासोबतच भटक्या-विमुक्त महिलांनाही सर्वांगीण आधार देणारा ठरला आहे."

प्रा. महेश ठाकूर 
प्रकल्प निदेशक,
टेक महेंद्र एनजीओ रिसोर्स सेंटर 
       

       भटक्या-विमुक्त समाजातील महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील करीत त्यांच्या परंपरागत कलांना व्यवसायाची जोड देण्यासाठी ‘निर्माण’ या सामाजिक संस्थेच्या वैशाली भांडवलकर यांच्या संकल्पनेतून ‘गोधडी प्रकल्प’ राबविण्यात येत आहे. जून २०१५ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पाची सुरुवात १५ महिलांना घेऊन करण्यात आली. केवळ पारंपरिकच नाही, तर आधुनिक डिझाईन वापरून तयार करण्यात आलेल्या या गोधड्यांची दखल देशातच नाही, तर थेट लंडनच्या राहिवाशांनीही घेतली असून, या गोधड्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकल्पातून वंचित महिलांना कायमचा रोजगार तर मिळालाच; शिवाय सर्वार्थाने सक्षम होण्याची संधीही त्यांना ‘निर्माण’च्या वतीने देण्यात आली.

वैशाली भांडवलकर 


       पुण्यातील कर्वे समाजसेवा संस्थेच्या समाजकार्याच्या विद्यार्थिनी असलेल्या वैशाली भांडवलकर यांनी शहरात दिवसभर भटकून गोधडी शिवणाऱ्या अशिक्षित महिलांना एकत्रित करीत त्यांच्या अंगभूत कौशल्याला वाव देत गोधडी प्रक्ल्पाचे काम सुरू करण्याचा निर्धार केला. यासाठी त्यांनी भटक्या-विमुक्त समाजातील महिलांच्या वस्त्यांवरही वारंवार भेट देत त्यांचे मन वळवून याचे महत्त्व त्यांना समजून देण्याची तारेवरची कसरत करावी लागली. प्रकल्पाचे काम सुरू झाले. मात्र, पारंपरिक गोधडीला आधुनिक रूप देण्यासाठी स्वतःला या कामाचे रीतसर प्रशिक्षण घ्यावे लागले. शेवटी या प्रयत्नांचा लाभ मात्र या महिलांनाच झाला.







     गोधडी बनविणे ही मुळात ग्रामीण हस्तकला. मात्र, आधुनिक काळात त्याचे 'मार्केटिंग' करीत या महिलांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न प्रकल्पाच्या माध्यमातून ‘निर्माण’ करीत आहे. या प्रकल्पात गोधडीचे विविध प्रकार बनविण्यावर भर देत लहान मुलांच्या गोधड्या, पायपुसणी, बॅग, झोपाळ्यावरील कव्हर इत्यादीची निर्मिती केली जाते. ‘निर्माण’च्या या उपक्रमात विविध सामाजिक संस्था, हितचिंतकांची मदत तर मिळालीच; शिवाय ‘निर्माण’च्या कार्यकर्त्यांनीही बचत गटांची प्रदर्शने आणि प्रसंगी घरोघरी जाऊनही गोधडीचे मार्केटिंग केले.

      
   
   पश्चिम महाराष्ट्रातील बारामतीजवळील माळेगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असणारा जोशी समाज रोजगाराच्या आशेने स्थलांतरित झाला. सध्या शहरातील भोसरीतील सद्गुरूनगर, फुगेवस्ती या भागात वस्ती करून असलेल्या या समाजातील पुरुष भविष्य सांगण्याचे काम करतात; तर महिला गोधडी शिवण्याचे काम करतात. मात्र, या महिलांना त्यासाठी शहरात दिवसभर पायी भटकत फिरावे लागत होते. खायला पुरेसे अन्न नाही आणि त्यातच दिवसभराची भटकंती, यामुळे त्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत होते. त्यासाठी या महिलांना एकत्र आणून त्यांच्या कलागुणांना वाव देत रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी हा अभिनव गोधडी प्रकल्प राबविण्यात येत आहे. 






‘निर्माण’ची पार्श्वभूमी
     ‘पे बँक टू सोसायटी’ या भावनेने प्रेरित झालेल्या कर्वे समाजसेवा संस्थेच्या संतोष जाधव, वैशाली भांडवलकर आदींनी समाजातील वंचित घटकांच्या विकासासाठी ‘निर्माण’ या बहुद्देशीय सामाजिक संस्थेची स्थापना केली. त्यातच समाजाच्या मुख्य धारेपासून दूर असलेया भटक्या-विमुक्तांच्या प्रश्नावर काम करण्याचा निर्धार त्यांनी केला. यासाठी विविध उपक्रम राबवतच शाश्वत विकासाचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवले. त्यात शिक्षणापासून वंचित मुलांसाठी ‘सावित्रीची शाळा’ या अभिनव उपक्रमाबरोबरच आधुनिक काळात तरुणांना सक्षम करण्यासाठी ‘टेक महेंद्रा’च्या माध्यमातून संगणक, इंग्रजी भाषा, व्यक्तिमत्त्व विकासासह विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी ‘स्मार्ट सेंटर’ अश्ाा उपक्रमांचा समावेश आहे.



दिनांक ६ एप्रिल २०१६ 
'दैनिक नवराष्ट्र' 
मध्ये प्रकाशित झालेली माझी ही न्यूज स्टोरी 



Friday 1 April 2016

पानी रे पानी तेरा रंग कैसा?
भविष्यात डोळ्यांना पाणी न यावे 
यासाठी आत्ताच प्रयत्न केलेले बरे यासाठी प्रतिक्रया    


     
       

      महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाने आपले रंग चांगलेच दाखवून दिल्याने हे 'जलमाहात्म्य' आतातरी आमच्यासारख्या 'सुशिक्षितांना' कळले आहे का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. उलट पाण्याची भीषण टंचाई असतानाच आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून पाण्याची मोठी उधळपट्टी करणारे 'लातुरी' महाभाग आम्ही बघितले आहेतच. विदर्भ, मराठवाड्यासारख्या भागात नळाला पाणी येण्यासाठी ८ ते १० दिवस वाट बघत बसावे लागण्याचे चित्र असतानाच 'पांढऱ्या मीडियात' मात्र उन्हाळ्याच्या दिवसांत 'शॉवर' कसा घ्यावा? या विषयावर करण्यात येणारे तज्ज्ञाचे मार्गदर्शन डोळ्यांना पाणी आणणारे ठरते. केवळ पाणीबचत आणि एखाद् दुसऱ्या 'जागृत' एनजीओचे 'कॅम्पेन' याने हा प्रश्न सुटणार नसून, पर्यावरणाला समृद्ध करणाऱ्या परंपरा त्यासाठी आम्हाला निर्माण कराव्या लागतील.