Wednesday 30 March 2016

‘जाणीव’ तंबाखूमुक्तीची
जाणीव सामाजिक संस्थेचा अभिनव उपक्रम

   
        
         व्यसनमुक्त समाजासाठी संकल्पाची सुरुवात तंबाखूमुक्तीपासून करून ‘जाणीव’ या सामाजिक संस्थेच्या वतीने विविध अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यात जिल्ह्यातील प्रत्येक शाळांपासून ते विविध शासकीय कार्यालये, पोलीस स्टेशन आणि तुरुंगात जाऊनही विविध खेळ, पथनाट्य, गाणी आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवीत समाजात तंबाखूमुक्तीची ‘जाणीव’ रुजविण्याचा प्रयत्न केला जातो.




       ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांमधील वाढत्या तंबाखूचे व्यसन बघता त्याला पायबंद घालण्यासाठी ‘जाणीव’च्या वतीने अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांच्या पालकांपर्यंत व्यसनमुक्तीचा भावनिक संदेश पोहोचविण्याचा प्रयत्नही कार्यकर्त्यांनी केला. या उपक्रमांतर्गत आजपर्यंत जिल्ह्यातील २०० शाळांमध्ये जाऊन प्रत्यक्ष २० शाळा पूर्णपणे तंबाखूमुक्त करण्याचा विक्रमही ‘जाणीव’ने केला आहे. त्यामुळेच, आज जिल्ह्यातील वेळू, दिवे, झेंडेवाडी, कुरुंगवळी या गावांना तंबाखूमुक्त शाळांचा गौरव प्राप्त झाला. मुळात तंबाखू नियंत्रण कायदा २००३ च्या कलम ६ नुसार शाळेच्या १०० मीटरच्या परिसरात अमली वा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करता येत नाही.


तंबाखूविरोधी शालेय आर्मी
तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विळख्यात सापडलेल्या समाजाला तंबाखूमुक्त करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांची अभिनव ‘आर्मी’ तयार करण्यात आली आहे. या शालेय आर्मीची सुरुवात जानेवारी २०१५ मध्ये करण्यात आली होती. यात विद्यार्थ्यांचाही मोठ्या प्रमाणात सहयोग ‘जाणीव’ला लाभला. विद्यार्थ्यांनीही शाळेच्या १०० मीटर परिसरातील पानटपऱ्यांना भेटी देऊन तंबाखूला विरोध दर्शविला. आपल्या व्यसनी पालकांनाही याअंतर्गत त्यांनी भावनिक ‘समज’ दिली. 

तंबाखूचे भीषण वास्तव 


        दरवर्षी जगात सुमारे ६० लाख लोकांचा तंबाखूमुळे मृत्यू होतो. भारतात याचे प्रमाण दरदिवशी २५००, तर दरवर्षाला १० लाख एवढे आहे. वैश्विक युवा तंबाखू सर्वेक्षणानुसार भारतात सध्या १४.६ टक्के मुले तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करीत आहेत. त्यामध्ये मुलांचे प्रमाण १९ टक्के, तर मुलींचे ८.३ टक्के आहे. या मुलांना ह्दयविकार, फुप्फूस आणि श्वासोच्छवासासंदर्भातील रोग, कॅन्सर, नपुंसकत्व, वंधत्व आणि इतर आजारांना सामोरे जावे लागत आहे. समाजातही १८ वर्षे वयाच्या आतील मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत आहे. शाळांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूची अवैध विक्री होत आहे.




मनोगत 

            "व्यसनमुक्त समाज हे आपल्या सर्वांचेच ध्येय आहे. त्यासाठी ‘जाणीव’च्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करीत आहोत. आमच्या या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात समाजाचा सकारात्मक प्रतिसाद लाभात असून, हा उपक्रम आता संपूर्ण देशभरात राबविला जावा, यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत."
- मधुकर बिबवे 
संस्थापक अध्यक्ष, जाणीव सामाजिक संघटना, पुणे.

-------------


No comments:

Post a Comment