Sunday 19 October 2014

बारीपाडयाची गोष्ट… 

                    बारीपाडयाची गोष्ट… 



    
मा.चैतराम पवार 
 भारत म्हणजे खेड्यांचा देश. हे नेहमीच वाचत आणि ऐकत आलेलं घोटीव वाक्य,पण त्याच खेड्यात वास्तव भरतच दर्शन घडत असतांनाही विकासाच्या मार्गापासून कोसो दूर असलेला ग्रामीण भारत म्हणजे अभावाचे मूर्तिमंत प्रतीकच होय. गाव म्हटलं की आठवत ती म्हणजे गावाचे गचाळ रस्ते,गोदार्या,अपुर्या आरोग्य सुविधा,सांडपाणी आणि चिखल.जसा रस्त्यावर तसाच माणसांच्या आयुष्याचाही. म.गांधी म्हणाले होते की,"तुम्हाला जर तुमच्या देशाचा विकास करायचा असेल तर आधी खेड्यांचा विचार करावा लागेल."स्वातंत्र्या नंतर मात्र राजकीय पोळी भाजाण्याच्याच प्रयत्नात असणार्या राजकारण्यांनी गावाच्या समस्यांचा वापर स्वार्थासाठी करून घेतला.गावाच्या सेवेसाठी सर्वस्व अर्पण करणारे निस्वार्थी कार्यकर्ते मात्र विरळाच निर्माण होत राहिली.महापुरुषांचा संदेश सांगणारे पुष्कळ असतात मात्र उपयोजन करणारे महाभाग काही औरच. अश्याच कर्मयोग्यांच्या परंपरेत आजच्या काळात एक नाव आदरानं घ्यावं लागेल ते म्हणजे चैतराम पवार यांचे. बारीपाडा,तालुका सक्री,जिल्हा धुळे या जिल्ह्याच्या  नकाशावरही धड दिसू न शकणार्या गावाने चैतारामजींच्या नेतृत्वात एक नवा मैलाचा दगड रचला आणि देशाच्या विकासात आपल्या गावाचे महत्व उद्घृत केले.
सामुहिक श्रमदान 
                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                            एका सर्वसामान्य गावासारखाच असणार शंभर टक्के आदिवासी असणाऱ्या पाचशे लोकसंखेच छोटस गाव बारीपाडा. समस्यांनी घेरलेल्या गावात माणसे तर होती,पण प्राण मात्र हरवला होत.विहिरी तर विहिरीत्र होत्या पण जीवन मात्र हरवलं होत. होता तो केवळ अभाव आणि अंधश्रद्धा. आपण आपल्या गाव साठी काही करायचं हा भाव होताच तिथल्या तरुणानामध्ये दिशा मात्र मिळत नव्हती.आशा होती पण मार्ग नव्हता.अश्याच तरुणांपैकीच एक चैतराम पवार.गावातील पहिले पदव्युत्तर शिक्षण M.Com मधून पूर्ण केल्या नंतर घर-दार,नोकरी,पैसा,पत्नी आणि कुटुंब या चक्रव्युहात न अडकता आपला  गाव हाच आपला मार्ग हा विचार करून कार्याला लागण्याचा संकल्प करण्याचा निर्धार करणारा तरुण.स्वतः एका गरीब कुटुंबातून येऊनही 'अहं' पेक्षा 'वयं' चा हा विचार त्या काळात त्यांच्या प्रबुद्ध मानसिकतेची साक्ष देतो.आपल्या गावासाठी काही करता येईल का ? या प्रश्नाने चैतारामजींच्या मनात हलकल्लोळ निर्माण केला होता.करायचं पण नेमकं काय?हा प्रश्न 'आ' वासून उभा रहिला.'गाव करी ते राव न करी' अशी एक म्हण आपल्या कडे प्रसिद्ध आहे. म्हणूनच गावातल्या समस्यांच्या निर्मुलनासाठी एका माणसाच्या प्रयत्ना पेक्षा रचनात्मक कार्यासाठी संघटन बांधणी गरजेची ठरली. गावात जुगाराचा प्रश्न मोठा त्यातूनच परगावातून जुगारासाठी येणाऱ्या लोकांशी झालेल्या संघर्षातून हे संघटन निर्माण करणं आणि दृढ करणं शक्य झालं. सूरुवातीला गावातल्या चार दोन तरुणांना संघटीत करून चैतारामजींनी आपला मोर्चा संपूर्ण ग्रामसभेकडे वळवण्याचा निर्णय केला.विरोध आणि अंतर संघर्षातून निर्माण झालेला कलह भविष्यात मात्र खरेच एक नाव सृजन ठरेल याचा थांग मात्र त्या काळात त्या भोळ्या जीवांना काही लागला नसेल.परंतु व्यक्ती विकासाची सुरु झालेली ही चळवळ आता व्यक्ती व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचा ध्यासच जणू चैतारामजींच्या अंतःकरणाने घेतला होता.या कामात  डॉ.आनद फाटक यांची लाभलेली साथ आणि प्रेरणा मोलाची ठरली.चैतारामजींच्या कार्याला या व अश्या प्रकारे झालेली सुरुवात बदलांची नांदी ठरली. मा.अण्णा हजारे यांच आदर्श गाव राळेगण सिद्धी बघण्याचा योगही याच काळात चैतरामजींना आला.अण्णांच्या ग्राम परिवर्तनाची प्रेरणा त्यांनी आपल्या गावात ओतली आणि सकारात्मक बदलांची प्रक्रियाच या नंतर जणू सुचारू झाली . 
       शेती हा ग्रामीण अर्थ व्यवास्थेचा कणा.म्हणून शेतीच्या सुधारणांची गरज भासू लागली.सिंचन सुधारनांच्या अभावा मुळे कोरडवाहू शेतीचे रुपांतर बागायती शेती मध्ये करणे भाग होते. त्या साठी शेत तळे आणि बंधारे यांची बांधणी लोक सहभागातून करण्याचा प्रस्थाव गावकर्यांनी सर्वानुमते ग्रामासाभेमध्ये पारित केला.श्रमदानाच्या कृती कार्यक्रमातून काम होणार होते.मात्र या श्रमदानात सहभागी न होणार्यांसाठीही गावाने तरतूद  करून ५० रुपये दंड आकारण्याची योजना केली.हात कामाला लागले.वाहते पाणी अडवल्या गेले.जमिनीतील पाण्याची पातळी वाढली.विहिरी तुडुंब भरू लागल्या.याच श्रमदानाचा परिणाम म्हणून एके काळी केवळ  ११ असलेली विहिरींची संख्या आता ४० वर जाऊन पोहचली.निश्चितच हे श्रेय गरीब सध्या भोळ्या आदिवसिंच्या कष्टांना आणि चैतरामजींच्या प्रयत्नास आहे.या कार्यास पाहून शेती विकासासाठी अनेक अभ्यासाक मंडळी पुढे आली.त्यातूनच या मार्गदर्शनच उपयोजन डोळ्यात भारणार्या पिकांमध्ये होऊ लागलं.ज्वारी,बाजरी,तूर,मुग,सोबतच अनेक प्रकारची कडधान्य तसेच उस,कांदा बटाटा,लसून या नगदी पिकांच्या उत्पादनातून कास्ताकारांची मने आनंदाने भरून गेली. हल्ली तर गावात स्टोबेरीची होत असलेली निर्मिती हा कौतुकाचा विषय ठरला आहे.गावाने निर्माण केलेला इंद्रायणी तांदूळ एक ब्रांड म्हणून पुढे आला असून जे गाव आन्ना - पाण्या साठी इतरांवर अवलंबून होते तेच गाव आज पुरवठादार झाले आहे.

     अर्थ संपन्नतेसोबतच शिक्षणाच्या सुधारणांसाठीही प्रयत्न करणे गरजेच होते.शाळा हा गावाचा आत्मा,म्हणून शाळेला जाणं प्रत्येक विद्यार्थ्याला सक्तीच करण्यात आलं. वेळेवर न येणाऱ्या गुरुजिंसाठीही दंडाची कार्यवाही करण्याचा निर्णय गावाने घेतला. दंड मात्र वेळेवरच घेतल्या जाण्याची सोयही गावाने केली.रस्त्यावर फिरणाऱ्या मुलांनी या मुळे धरलेली शिक्षणाची वाट प्रौढ शिक्षणासाठीही तेवढीच प्रेरक ठरली आहे.गावातील सुधारणांसाठी लोकांचा मिळालेला सकारात्मक सहभाग हा नव्या बदलास कारणीभूत ठरला.पाण्याचे निर्जंतुकीकरण,मुलांचे लसीकरण, घर तेथे सौचालाय, वृक्षारोपण, स्वच्छता अश्या विधायक कार्याच्या माध्यमातून बारीपाड्याने कात टाकायला सुरुवात केली. ज्या बाबी शहरात दुर्मिळ ठराव्यात त्या खेड्यात घडवण्याचा चमत्कार या गावकर्यांनी प्रत्यक्षात उतरवला.त्यात कुटुंब नियोजनासाठी स्वतः पुरुषांनी घेतलेला पुढाकार म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राच्या वैचारीक भूमोकेचे यथार्त प्रतिबिंबच म्हणावे लागेल.आज सुमारे ९०% पुरुष नसबंदी झाली असून कुटुंब नियोजन क्षेत्रातील एक नवा विक्रमाच गावाने केला आहे.
चैतराम पवार : एक संबोधन 

       गावाच्या प्रगतीत जसा वाटा पुरुषांचा तसाच महिलांचाही.मात्र नैसर्गिक संकोच्याच्या भावनेतून स्त्रियांना वाटच जणू मिळत नव्हती.म्हणूनच चैतरामजींनी क्यानडाहून पी.एच. डी.च्या संशोधना साठी आलेल्या एका विद्यार्थ्याच्या सल्ल्या वरून खास महिलांसाठी 'वन भाजी स्पर्धा' आयोजित करण्याचा निर्णय घेतला.यात महिलांचा आढळून आलेला लक्षणीय सहभाग १००० प्रकारच्या वनस्पती पासून ७०० प्रकारच्या औषधी वन भाज्यांच्या शोधास कारणीभूत ठरला.आज या अनोख्या स्पर्धेची दाखल देशभरातील माध्यमांनी घेतली असून महिलांच्या कमगिरीचे कौतुक अनेक मानाच्या पुरस्कारांनी करण्यात आले आहे.जर तुम्हाला झाडे लावायची नसतील तर किमान तोडू तरी नका,हा साधा विचार घेऊन आदिवासीबांधावांचा प्राण असलेल्या जंगलांकडे लक्ष देणेही गरजेचेच होते.बरीपाडयाचा जंगलच मुळी समृद्ध.मात्र गरज होती ती या वनांच्या संरक्षणाची.त्या साठी एक ठोस कृती समिती गावातील जेष्ठ मंडळींच्या नेतृत्वात आणि तरुणांच्या पुढाकाराने स्थापणकरण्यात येउनमहत्वाचे पूल उचलण्यात आले.बारीपाड्याच्या जंगलात आज गावाच्या सामुहिक सहभागातून ३४५ प्रकारचे वृक्ष,४८ प्रकारचे पक्षी,१० प्रकारचे प्राणी संरक्षित केल्या गेले तसेच ११०० हेक्टर जंगल क्षेत्रही सुरक्षित केले गेले.१९९१ मधेच या कार्याची मुहूर्तमेढ रोवल्या गेली होती ती 'कुऱ्हाड बंदी' करून त्याची मधुर फळे आज चाखायला मिळत आहेत.

        बारीपाडा आणि चैतरामाजींच्या या सार्या कार्याची दखल आज आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही घेतल्या जात असून त्यात त्यांना मिळालेला 'आंतरराष्ट्रीय जैवविविधता पुरस्कार','इंटर न्याशनल फंड फोर अग्रिकल्चर डेवलपमेंट'रोम,इटली चा पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याची पावतीच होय.महाराष्ट्र शासनानेही 'शेतीनिष्ठ पुरस्कार' चैतारामजिंना सन्मानाने प्रदान केला.या व अश्या किती तरी देश विदेशातील सन्मानांचे मानकरी ठरलेले चैतराम पवार हे व्यक्तिमत्व म्हणजे बारीपाड्याच्या विकासाचे महान शिल्पकार होत.व्यक्तिगत साधेपणा आणि कार्याची समर्पितता या गुणांमुळे ते आपल्या हृदयात आदराचे स्थान निर्माण करतात.
आबासाहेब गरवारे महाविद्यालय पुणे च्या वतीने घेण्यात आलेला हृद सत्कार 

        नुकत्याच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने चैतरामजींच्या भेटीचा योग पुण्यात आला.त्यांच्याशी बोलतांना जाणवलेला एक निस्सीम माणूस मनात घर करून गेला आहे.त्या वेळी मी त्यांना म्हणालो होतो,''सर,ज्या काळात आमच्या पिढीचा जन्म झाला,त्या काळात आपण कामाची सुरुवात केली आपण  स्वतः उच्च शिक्षित आहात मात्र तरीही मोठ्या पगरची नौकरी न करता आपण ग्रामसेवेस प्राधान्य दिले,पण आजचा युवक ग्रामीण भागात काम करण्यास उत्सुक दिसत नाही्. हे अपयश नेमकं कुणाचं? आमच्या मानासिकतेचं की  शिक्षण व्यवस्थेचं?''त्या वेळी त्यांनी दिलेलं उत्तर मोठ मार्मिक होत,ते म्हणाले होते की,''शिक्षित युवक शहरात जातो,पैसा कमवतो यात वाईट काही नाही पण आपण ज्या समाजात जन्मास आलो त्या समाजाच्या प्रगती साठी प्रयत्न करणं ही त्याच युवाकांची जबाबदारी असते.'' याच वेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असलेले जेष्ठ पर्यावरण तज्ञ माधव गाडगीळ उभे राहिले या समस्येची आर्थीक कारणेही आमच्या समोर मांडली. समस्या आज कोणतीही असो त्यावर उपाययोजना करता येणे गरजेचे आहे. त्या साठी  मात्र गरज आहे मानसिकता आणि प्रयत्नांची. हाच आदर्श आपल्या जगण्यातून चैतारामजींनी घालून दिला आहे.                                                    खरच बारीपाडा हे चैतरामजींच्या परिश्रमांचे फलीत आहे.बारीपाड्याच्या प्रगतीची ही गोष्ट आशीच पुढेही सुरूच राहिल,जोवर गावातल्या प्रत्येकात चैतराम आणि प्रत्येक गावाचं बारीपाडा होत नाही.                                                                                                        

#chaitrampawar #baripada  

1 comment:

  1. प्रति,
    श्री.कुणाल रामटेके,
    स.न.
    छान लिहिले आहे. तुम्हाला शुभेच्छा..!
    आपला,
    मनोज कापडे,
    पत्रकार,नाशिक

    ReplyDelete