Sunday 3 May 2020



 माझी लॉकडाऊन डायरी 


बरेचदा रोजच्या ‘रुटीन’ला कंटाळून आपण सारेच कधी ना कधी तरी रविवारची वाट बघतच असतो. कधी एकदाची सुट्टी मिळते असं सुद्धा आपल्याला वाटत असतं. मग अशा वेळी कधी तरी - काही तरी खोटी - मोठी  कारणं आपल्यापैकी बऱ्याच जणांनी दिली असतील. पण 'सुट्टी' ही तेव्हाच चांगली वाटते जेव्हा ती मिळणं कठीण असतं आणि तरीही आपण ती हक्कानं मागून घेतो. 
आज ‘कोविड १९’च्या साथीत आपण सर्व जण घरी आहोत. घरातच राहून काम करणं म्हणा किंवा सक्तीची सुटी म्हणा पण सुरुवातीचा काळ सोडला तर आपल्या पैकी बऱ्याच लोकांना या वेळात काय करावं तेच समजत नव्हतं आणि समजलं तरी उमजत नव्हतं. माझी अवस्था सुद्धा काही वेगळी नव्हती. सुरुवातीला जेव्हा ‘लॉकडाऊन’ जाहीर झालं त्याचवेळी वाटलं होतं की, "काय आठ - दहा दिवस तर आहेत ! जातील आरामात निघून..." पण पुढं - पुढं मात्र 'टेन्शन' वाढायला लागलं. त्याचं कारण म्हणजे जगभरात कोरोना काय थैमान घालतोय, आपल्याकडे काय होतय त्याच-त्या बातम्या आणि तोच-तो टिव्ही बघून बघून डोक्यात येणारे 'निगेटिव्ह' विचार.       
मग एक दिवस ठरवलं. म्हटलं खूप झालं आता. किती दिवस असेच आणि उगाच टेन्शन मध्ये काढणार. या वेळेचा चांगला उपयोग करून घेतला पाहिजे. मग काय करणार ? 
वाचायची 'बोम्ब' असली तरी माझ्याकडे भरपूर पुस्तकं घेऊन ठेवलेली असतात त्यातली निवडक बाहेर काढली. पण कोणत्याही पुस्तकाची १० - १५ पानं जरी वाचली तरी मन लागत नव्हतं. मग विचार केला, "अरे, 'यु-ट्यूब' आहे की..." नुसताच 'टाईम पास' न करता भरपूर विषयावरची सामग्री यावर आहे. फक्त आपल्याला त्याचा उपयोग करून घेता आला पाहिजे. 
मग कुठे तरी व्हिडीओज बघत असतांना पुन्हा एकदा लक्षात आलं की आज जशी 'लॉकडाऊन'ची स्थिती आहे. तसच आधीही बऱ्याचदा होऊन गेलय जगात. मग त्यात प्लेग ची साथ असेल किंवा जगाला घाबरवून सोडणाऱ्या इतर रोगांच्या साथी किंवा युद्धं. माणसावर अनेक संकटं येत असतात. त्या प्रत्येक संकटातून माणुस सतत काहींना काही शिकत असतो. त्यातून नवा धडा घेत असतो. संकटं येतात जातात पण त्यावेळी असलेलं माणसाचं वागणं मात्र इतिहासाचा भाग बनून जातो. आज ‘कोविड १९’ च्या या काळाचा उल्लेखही पुढे इतिहास म्हणून केला जाईल. लोक पुढं विचारतील, “त्यावेळी तुम्ही कसं काय मॅनेज केलत ? तुम्ही काय करत होतात तेव्हा ?” पुण्यात नाही का, १८९६-९७ च्या काळात प्लेगच्या वेळी सावित्री बाई स्वतः पुढं धावून समाजकार्य करत्या झाल्या. आजची परिस्थिती जरी वेगळी असली तरी घरात राहूनही खूप काही करता येणं शक्य आहे. ही जाणीव झाली. आणि उगाच व्हिडियो बघत पेंगत बसण्यापेक्षा ‘ऑनलाईन’ कामाला सुरुवात झाली. त्यात परराज्यात अडकलेले मजूर, विद्यार्थी यांचे प्रश्न असोत किंवा आजच्या या महामारीच्या काळात निर्माण होणारे इतर विषय असोत, त्यावर इतर मित्रांच्या सोबतीनं माझ्या परीनं काम करण्याचा प्रयत्न चाललाय. 
ऑनलाईन काम सुरु तर झालं पण यामुळं निर्माण झालेले सामाजिक प्रश्न बघून मन खूपच नकारात्मक होतं. कधी तरी आपणही आजारी-बिजारी तर पडलो नाही ना ? असही उगाचच वाटून जातं. ‘सायकोसमॅटिक’ मॅटर म्हणा याला हवं तर. पण गेल्या अनेक दिवसत घरात एकटा असूनही एकदाही मी ‘बोअर’ झालो नाही. याची कारणं स्वतःला नेहमी कशात तरी गुंतवून ठेवण्याच्या माझ्या सवयीत कदाचित असतील. 
कधी कधी उगाच‘टाईम पास’ होत असेल तर वेळ निघून गेल्यावर वाईट वाटतं आणि कधी स्वतःला वेळ देणं सुद्धा किती महत्वाचं आहे हे सुद्धा पटतं. मग यातून बुद्धाचा मध्यम मार्ग काढत पुढं जाणं गरजेचं होऊन जातं. खरंच आहे, आलेला दिवस नक्कीच मावळणार असतो आणि रात्र संपून सूर्य उजळणार असतो. आपण प्रतीक्षा करत राहू…           

(आकाशवाणी मुंबई'साठी) 

No comments:

Post a Comment