Friday 12 October 2018

‘हॅशटॅग’ मोहिमांच्या फलश्रुतीसाठी...
कथित धर्म आणि त्याच्या अविवेकी तत्वज्ञानाचा अव्हेर हीच समतेची सुरुवात असेल



भारतीय परीपेक्षातील समकालीन वास्तवाच्या संदर्भात तथाकथित धर्म आणि त्याच्या तत्त्वज्ञानाने  आपला गहनतम प्रभाव प्रस्थापित केला आहे. अर्थात हजारो वर्षांच्या कालखंडात धर्म आणि त्याअनुषंगाने निर्माण झालेली आचार प्रणाली विवेकाधिष्टित समाजस्वास्थ्यास आत्यंतिक हानिकारक ठरली असून नवं समाज निर्मितीसही सर्वार्थाने मारक ठरली आहे. भारतीय समाज व्यवस्थेत महिला आणि इतर शोषित वंचित घटक नागवल्या गेले आणि धर्म व्यवस्थेने त्यास प्रदान केलेल्या तत्वज्ञानात्मक अधिष्ठनामुळे अवैध - अमानवी परंपरा आणि आचारप्रणाली निर्माण होण्यास आणि त्या टिकण्यास वाव मिळाला.

आज भारतीय चित्रपट आणि मीडिया मध्ये सुरु असलेल्या 'मी टू' मोहिमेकडे बघत असतांनाही स्त्री अत्याचाराच्या कारणपरंपरेचा सर्वांगीण आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते. मुळात, निसर्गतः समान असणाऱ्या स्त्री अथवा कोणत्याही लिंग भावना असणाऱ्या व्यक्ती समूहास केवळ भोगवस्तू समजून त्याच्यावर केलेला अत्याचार हा केवळ त्या संबंधित गुन्हेगार व त्याची प्रवृत्ती इतक्यापुरताच मर्यादित नसून त्याची अनेकांगी कारणे आपणास समजून घ्यावी लागतील.

भारतीय संस्कृती सर्वार्थाने विशिष्ट वर्ण, जाती, वर्ग, पुरुषसत्ताक लिंग समूहाच्या वर्चस्वाखाली निर्माण झाल्याचे वास्तव आहे. अर्थातच या समाज व्यवस्थेमध्ये इतर उपेक्षित लिंग समूह, दलित, बहुजन, आदिवासी, अन्य अल्पसंख्यांक धर्म समूह आदींना कोणत्याही प्रकारचे स्थान नाकारण्यात आले. त्यातूनच प्रस्थापित समाजाच्या अथवा देशाच्या आवश्यकता पूर्ती साठी वापर करण्यात आल्याचा इतिहास आपणास नाकारता येणार नाही. त्यातूनच हा उपेक्षित समूह केवळ गुलाम असल्याचा विचार स्वार्थासाठी निर्माण करण्यात आला. आजही समाजाची ही मानसिकता बदलली असे आपणास वारंवार अधोरेखित होणाऱ्या उदाहरणांवरून म्हणता येणार नाही. कारण,  ज्या समाज व्यवस्थेवर मिथ्या धर्म आणि अविवेकी तत्वज्ञानाचा प्रभाव असतो त्या समाज व्यवस्थेमध्ये अन्याय, अत्याचार आणि शोषण हे गुलामांना अधिकाधिक गुलाम बनवण्याचे निरंतर प्रयोग असतात. त्यातूनच विवेकी समूहातही दहशत निर्माण करणे हे ही यामागचे एक धोरण असते.

समकलात होत असलेले अत्याचार आणि त्यामागजी सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, मानसिक पार्श्वभूमी ज्ञात असतानाही त्या शोषणवादी व्यवस्थेला प्रोत्साहन देणाऱ्या सणोत्सव, परंपरा, तत्वज्ञान, भाषिक वा अन्य प्रतिकांचे लांगुलचलन करणे म्हणजे शुद्ध स्वहत्या करण्यासारखे आहे. जो विवेकी मानव समूह शोषणाच्या विरोधात असल्याची भाषा बोलतो त्या समुदायाने धर्म वा तदानुषंगिक शोषणवादी प्रतीके सर्वार्थाने झुगारून दिली पाहिजेत. तेव्हाच खऱ्या अर्थाने अन्याय अत्याचार निवारणाची आणि सामाजिक क्रांतीच्या माध्यमातून समतामूलक समाज निर्माण होण्याची प्रक्रिया द्रुत गतीने निर्माण होईल. समतेचा हा संगर केवळ ‘हॅशटॅग’ च्या माध्यमातून सोशल मीडियावरच नाही तर जमिनीवरच्या ‘सोशल लाईफ’मधेही पुरोगामी कृतिशीलतेच्या माध्यमातून व्यक्त व्हावा. त्यातूनच कदाचित नवा समाज प्रत्यक्षात उतरेल.     

No comments:

Post a Comment