Wednesday 8 August 2018


बंदूकवाला

प्रतीकात्मक चित्र (साभार - इंटरनेट)
 
पुण्याला जाणाऱ्या एक्सप्रेसचे दोन्ही 'जनरल' डबे त्या दिवशी सैनिकांनी बळकावले होते. प्रत्येक बर्थवर बलदंड सैनिक त्याच्या बंदुकीसह निवांत पहुडला होता. स्टेशनं येत जात होती. आणि स्टेशनांसोबत शेकडोंच्या संख्येनं माणसंही. त्या भल्या थोरल्या गर्दीत कुणालाही बसायला वगैरे जागा मिळण्याचा काही प्रश्नच नव्हता. सर्व सैनिक मात्र येणाऱ्या प्रत्येक 'सिव्हीलीयन्स'कडे एका वेगळ्याच नजरेनं बघत होते. त्या सर्वांसाठीच जणू हे लोक म्हणजे कुणी 'उपरे' होते. अर्थातच सर्व 'सिव्हीलीयन्स' त्यांची तिकिटं घेऊनच प्रवास करत होती नाही असं नाही. पण आज त्यांच्यापैकी कुणालाही बर्थवर बसण्याचा काही एक अधिकार नव्हता. अर्थात नेहमी जागेसाठी भांडण असणाऱ्या या जनरल डब्यांमधून त्या दिवशी मात्र सैनिकांना तसं बोलून दाखवण्याची साधी हिम्मतही कुणी दाखवली नाही. अशाच एका स्टेशनवर कदाचित ते अमरावती असेल किंवा बडनेराही, एक चार - पाच वर्षांची चिमुरडी तिच्या आईसोबत ट्रेन मध्ये चढली. तिची आई बोगीतल्या सैनिकांना बघून सुरुवातीला थोडी बिचकली. कारण आजपर्यंत तिच्या बघण्यात सैनिक आणि त्यांच्या हातातल्या बंदुका कधी आल्या नसतील. जीव कोंडणाऱ्या गर्दीत दोघी निमूट उभ्या राहिल्या. मुलीचं लक्ष मात्र बंदुकीकडच लागून राहिलं होतं. तेव्हढ्यात एका सैनिकानं तिला जवळ घेत विचारलं, ''बेटा, तुला बंदुकीची भीती नाही वाटत ?" ती निरागस पोर सैनिकाला म्हणाली, "बंदुकीची नाही, पण बंदुकवाल्या माणसाची खुप भीती वाटते." आणि तितक्यात ट्रेन सुरू झाली...


No comments:

Post a Comment