Wednesday 20 July 2016

उपयोजानाच्या दिशेने...

‘निर्माण’ द्वारा आयोजित भटक्या विमुक्त महिला पारिषदेच्या निमित्ताने 



   
      “आवो सायब, टीवीतल्या रामायनात वाल्याचा वाल्मिकी झाला मनत्यात मंग आमची फासेपारध्याची जमात का म्हणून सुधरत न्हाय ? बरं जसा त्या वाल्याला नारद भेटला तसाच आमालाबी दर पाच वर्सानं भेटतोच की. कोणता सराप असल आमच्या जातीला ? जग चंद्रावर रहाया गेलं म्हणत्यात आन आम्हाला हिथं पन सुखानं ऱ्हाया जागा न्हाय. जसा तुमचा देस तसा आमचाबी. मंग आमच्याशीच भेद म्हणून का ? सरकार लैय मोठं काम करतं म्हणत्यात पन आमाला त्याचा उपिग कायच नाय. तरी लोकं भारतच महान म्हणत्यात” सुनीताताई बोलत होत्या. सुनीता भोसले एक फासेपारधी समाजातील सर्वासामान्य महिला कार्यकर्ती. निमित्त होतं ‘दुसऱ्या भटक्या विमुक्त महिला परिषदे’चं. 

 पुण्यातील ‘निर्माण’ या भटक्या विमुक्त समाजाच्या उत्थानासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आलेली ही दुसरी महिला परिषद. केवळ अकादामिक स्तरावरच नाही तर त्याही पुढं जात प्रत्यक्ष त्या समाजातील महिलांनाच बोलतं करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत होता. मुळात भटक्या विमुक्त महिलांच्या प्रश्नावर चिंतन करण्यासाठी म्हणून खास आयोजीत करण्यात आलेली ही परिषद म्हणजे देशातील तसा पहिलाच प्रयत्न. परिषदेच्या निमित्तानं खास भारत सरकारच्या राष्ट्रीय भटके विमुक्त आयोगाचे अध्यक्ष भिकुजी दादा इदाते एखाद्या विद्द्यार्थ्यासारखं दोन दिवस या परिषदेला स्वतः टिपणं काढत हजर राहिले होते. पुण्यात दिनांक १८ व १९ जून या दोन दिवसीय परिषदेला अवघ्या महाराष्ट्रातून भटक्या विमुक्त समाजातील महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या. 
   


 मुळात, ‘दलितातील दलित म्हणजे महिला’ हे समीकरणच महिलांच्या बाबतीत आपल्या देशात घातलं जातं. असं असेल तर भटक्या विमुक्त समाजातील महिलांची नेमकी परिस्थिती काय असेल याचा साधा अंदाज लावता येणं सहज शक्य आहे. स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही भटका विमुक्त समाज सर्वांगीण विकासाच्या मुख्य धारेपासून दूरच राहिला आहे. गुन्हेगार म्हणून भाळी आलेला ठपका इतक्या दिवसानंतरही काही केल्या पुसल्या नजाता कालपरत्वे तो अधिकाधिक दृढच होत गेला की काय हा संशय यावा. त्यातच या समाजातील महिला वर्गाचे प्रश्न तर गंभीरच म्हटले पाहिजे. अन्न, वस्त्र, निवाऱ्याच्या मुलभूत समस्यांचा सुटू शकत नसल्याने आरोग्य, शिक्षण आणि सर्वांगीण विकास यांसारख्या संकल्पना तर अद्यापही दूरच्याच. त्यासाठी सर्वार्थाने वंचित राहिलेल्या भटक्या विमुक्त समाजातील महिलांच्या प्रश्नावर सरकार, प्रशासन आणि समाजाने विचार करावा यासाठी ही दुसरी महिला परिषद आयोजित करण्यात आली होती. मुळात, भटक्या विमुक्त समाजातून समाजकार्याचं शिक्षण घेतलेल्या वैशाली भांडवलकर, संतोष जाधव आणि त्यांच्या ‘निर्माण’ या विकास संस्थेनं त्यात मोलाचा वाटा उचलला. या परिषदेबाबत वैशालीजींशी बोलण्याची संधी मिळाली. भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांवर त्या अगदी मनातून बोलत होत्या. त्या स्वतः विमुक्त अशा रामोशी समाजातील पहिल्यांदाच उच्चशिक्षण घेतल्या वैशालीजींनी पुढं याच प्रश्नाला वाहून घ्यायचं ठरवलं. त्यातूनच जन्माला आलं, भटके विमुक्त महिला अधिकार आंदोलन. सोबत ‘निर्माण’ होतच. वंचित विकासासाठी रचनात्मक आणि विधायक कार्याच्या माध्यमातून त्यांनी या समाजाच्या महिलांच्या परिस्थितीचा अगदी पालापालांत जावून स्वतः आभ्यास केला. कारणं शोधून काढली. आता गरज होती, ती केवळ उपयोजानाची. त्यासाठी प्रसंगी सरकारचे उंबरठेही झिजवले. यशापयशाच्या ऊन सावलीत कामात मात्र कधी खंड पडू दिला नाही.    



       
 महाराष्ट्र शासनानं २०११ साली महिला धोरण तयार केलं. मात्र, रस्त्यावरचं जिनं जगणाऱ्या भटक्या विमुक्त महिलांच्या नशिबी त्यातही वाटायच्या अक्षदाचा आल्या होत्या. त्यासाठी वैशालीजींनी या धोरणात अशा परिषदांच्या माध्यमातून प्रयत्न करणं महत्वाचं वाटलं. त्यात राष्ट्रीय भटक्या विमुक्त आयोगाचे आजी-माजी अध्यक्ष स्वतः उपस्थित राहिल्याने महिलांना त्यांच्या समस्या, त्या प्रत्यक्ष करीत असलेल्या कामांची माहिती प्रत्यक्ष त्यांच्या कानी घालता आली. त्यातून आयोगाला धोरणे ठरवितांना मदत होणार असल्याचा विश्वास इदातेजींनी व्यक्त केला. भटक्या विमुक्त महिलांना शिक्षण, आरोग्य, रोजगाराच्या सुविधा, नागरिकत्वाचे पुरावे असे अनेक विषय परिषदेत मांडण्यात आले. शिक्षणाचे प्रमाणाच मुळी अत्यल्प असल्याने शासकीय नोकऱ्यांपासूनही हा वर्ग वंचितच राहिला. त्यातूनच या समाजाला आपल्या पारंपारिक रोजगाराला चिकटून राहणे भाग पडले. त्यामुळे भटक्या विमुक्त समाजाकडे बघण्याचा सामाजिक दृष्टीकोनही फारसा बदलू शकला नाही. या समाजातील एक महिला म्हणून वाट्याला येणारी कुचंबणा तर ‘रोजचच मढं’ झाल्यानं त्यावर रडणाऱ्याही त्याचा उरल्या. भटक्या विमुक्त महिलांच्या या सर्व प्रश्नांविषयी सामाजिक संवेदाना जागृत करणं महत्वाचं झालय. त्यासाठी या समाजातील महिलांच्या प्रगतीसाठी केवळ शासकीय प्रयत्नांचीच वाट बघत बसल्यापेक्ष्या त्याही पुढे जात अनेक कार्यकर्ते ‘निर्माण’ सारख्या विविध सामाजिक संस्था रचनात्मक व विधायाक काम करीत आहेत.


शैलाचा सावित्रीच्या लकी पुरस्कार देवून सन्मान करतांना
           वैशाली भांडवलकर, भिकुजी इदाते, लता भिसे. 

      भटक्या विमुक्त महिला परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अशाच काही महिला कार्यकर्त्यांची भेट झाली. त्यांच्या कामाविषयी जाणून घेता आलं. त्यातच   शैला यादव नावाच्या निर्माणच्याच एका कार्याकर्तीशी बोलत असतांना तिनं सहजच आपली कहाणी सांगितली. शैला मुळात कोल्हाटी सामाजातील. कोल्हाटी समाजात मुलगी ‘पदराला’ आली की तिनं नाचायला निघायच. पैसा कमवायचा. कुटुंब पोसायचं. स्वतः मात्र लग्न करायच नाही. त्यातूनच पराकोटीची विषमता. कमालीचा अज्ञान. सातत्यानं नशिबी लिहिलेलं शोषण. पण हे सर्व झुगारून देत शैलानं ‘निर्माण’ ची कास धरली. समाजकार्याचं शिक्षण घेतलं. आणि आता ‘निर्माण’ सोबतच इंदापूर तालुक्यात ती भटक्या विमुक्त समाजासाठी पूर्ण वेळ काम करते. यावेळी ती सहज बोलून गेली, “आमची पारंपारिक कामं जर आमच्याच स्वाभिमानाच्या आड येत असतील तर ती आम्ही का म्हणून नाकारू नयेत ?” तिचा हा प्रश्न कोणत्याही संवेदनशील माणसाला आश्वस्त करणारा होता.

     खरच भटक्या विमुक्त समाजातील महिलांचे प्रश्न आजही अनुत्तरीतच राहिले आहेत. त्यासाठी गरज आहे ती संवेदनशील होण्याची आणि नुसत्याच योजनांपेक्षा त्याच्या उपयोजानाची....







#nirman #nt #dnt #community #socialwork #pune #savitribaiphule #vaishalibhandvalkar #santoshjadshav #nomadictribes #india 

No comments:

Post a Comment