Thursday, 3 July 2025

निवेदन : आम्ही वारकरी, आम्ही संविधानी 


महाराष्ट्राच्या संपन्न लोकसंस्कृतीचे वैभव असणाऱ्या आषाढी वारीसाठी इथेले वारकरी पंढरपूरला जात आपल्या लाडक्या विठूमाउली आणि चंद्रभागेच्या वाळवंटात जमणाऱ्या लाखो सहोदारांच्या भेटीसाठी अत्यंत आतुरतेने वाट बघत असतात. 

मुळातच, महाराष्ट्राच्या जडणघडणीत वारकरी संत आणि परंपरेचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. लोकभाषेतील विपुल साहित्य रचनेतून या संत मंडळींनी मराठी समाज जीवनावर आपला अमिट ठसा उमटवला. शोषणवादी परंपरांचा त्याग करत लोकाभिमुख तत्त्वज्ञान आणि आचारमार्गाचा पुरस्कार केला. भक्तीप्रेमाची नवी मांडणी करून महाराष्ट्राच्या भावजीवनाला नवा आकार दिला. 

नामदेवरायांपासून तुकोबारायांपर्यंत जवळपास पाचशे वर्षांची ही संत परंपरा समता, स्वातंत्र्य, चिकित्सा, विवेक, करुणा आणि बंधुता या मूल्यांची कृतिशील आग्रह धरणारी परंपरा आहे. याच परंपरेवर पोषित झालेला वारकरी संप्रदाय महाराष्ट्रातल्या लोकधर्माच्या महान परंपरेचे अविभाज्य अंग आहे. महाराष्ट्राला लाभलेल्या या गौरवशाली परंपरेचा महोत्सव म्हणजे आषाढी वारीचा सोहळा होय. आपल्या गावापासून पंढरपूरपर्यंत पायी चालत जाणे म्हणजे वारी. या वारीला तुकोबारायांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज देहूकर यांनी पालखी सोहळ्याची जोड दिली. तुकोबारायांच्या पहिल्या पालखी सोहळ्यानंतर इतरही अनेक पालखी सोहळे सुरू झाले. आता हजारो दिंड्या आणि शेकडो पालखी सोहळे महाराष्ट्रात आहेत. वारकरी संतांची ही परंपरा समता, स्वातंत्र्य, बंधूता आणि न्याय या संविधानिक मूल्यविचारांना पूरक आहे. त्यामुळे वारीच्या या सोहळ्यात सहभागी होण्याची महाराष्ट्रातील संविधान मूल्यविचारांशी बांधिलकी असणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यातूनच असे कार्यकर्ते सद्गुरु भोजलिंग महाराज घेरडीकर फडाच्या घेरडी ते पंढरपूर या पालखी सोहळ्यात सहभागी होत आहेत. 

सद्गुरु भोजलिंग महाराज वारकरी संप्रदायातील आदर्श सत्पुरुष होते. त्यांचा वारसा पुढे नेणाऱ्या या फडाच्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन महाराष्ट्राची संत परंपरा समजून घेण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. 
वारकरी संतांनी जात - धर्म - वंश आणि लिंग याच्याशी जोडलेले भेदाभेद अमंगळ ठरवून नव्या परंपरेची सुरवात केली. वारी हीच या वारकरी परंपरेची मुख्य ओळख आहे. त्यामुळेच या परंपरेचा गाभा समजून घेण्याच्या भूमिकेतून या वारीत सहभागी होणं ही आपल्यासाठी आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. संत विचारांची कास धरून 'आम्ही वारकरी, आम्ही संविधानी' हे ब्रीद घेत संविधानिक मूल्यांच्या जाणीवेने मार्गक्रमण करूया. या वारीत सहभागी होऊया.

दिनांक ४ आणि ५ जुलाई २०२५ - घेरडी ते पंढरपूर

आपले विनीत
सद्गुरु भोजलिंग महाराज घेरडीकर फड; कोरो इंडिया; अत्त दीप अकादमी ऑफ ग्रासरूट नॉलेज, महिला मंडळ फेडरेशन; ग्रासरूट व्हॉइस ऑफ वेस्टर्न महाराष्ट्र; संविधान संवाद समिती; ग्रामीण विकास केंद्र जामखेड; भटके विमुक्त संयोजन समिती, महाराष्ट्र राज्य; सहारा सामाजिक विकास संस्था, जालना; ज्ञानदीप संस्था, कराड; क्षितिज संस्था, कोल्हापूर; श्रावस्ती संस्था, कोल्हापूर; समता संस्था, मंगळवेढा; 'व्हॉइस ऑफ व्हॉइस लेस' सोलापूर; सृष्टी संस्था, सोलापूर; आज्ञाशील सांगली; अग्रणी संस्था, सांगली; राजलक्ष्मी प्रतिष्ठान; लोक विकास केंद्र; शिव प्रताप बहु संस्था; ग्राममगीता सोशल ट्रस्ट; वंचित लोक विकास संस्था, जिजामाता सेवा भावी संस्था; ज्ञानऊर्जा बहु संस्था, कासुबाई नाईक सार्वजनिक वाचनालय संस्था, चंदगड, जि. कोल्हापूर आणि अभंग प्रबोधिनी, पंढरपूर.

संपर्क : 
ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज बंडगर 
कुणाल रामटेके