सावित्रीची शाळा
'निर्माण' सामाजिक संस्थेचा सावित्रीची शाळा प्रकल्प
सावित्रीच्या शाळेला एक वर्ष पूर्ण
वस्तीवर जावून दिले जाते मुलांना शिक्षण…
समाजातील भटक्या विमुक्ताना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 'निर्माण' ही सामाजिक संस्था 'सावित्रीच्या शाळा' हा अभिनव उपक्रम राबवत आहे. विश्रांतवाडीच्या फुलेनगर येथील भटक्यांच्या पालावर जावून ६० ते ७० वंचित मुलांना शिक्षण देण्याचे काम 'निर्माण' च्या वतीने केले जाते.
पुणे - आळंदी रस्त्यावर विश्रांतावाडी नजिकच्या परिसरात भटक्या विमुक्त समाजातील नागरिक गेल्या १० ते १२ वर्षांपासून राहत आहेत. कोणत्याही प्रकारच्या सुविधा आणि सवलतींपासून वंचित असणाऱ्या त्या समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सावित्रिबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने गेल्या वर्षी 'सावित्रीची शाळा' या प्रकल्पाची स्थापना करण्यात आली होती. त्यात मुलांना शालेय शिक्षणाबरोबरच आरोग्याच्या चांगल्या सवयी सुद्धा लावल्या जातात.
भटक्या विमुक्तांच्या वस्तीमधील मुलांचे पालक दिवसभर कामासाठी बाहेर असतात. अशावेळी त्यांच्या छोट्या भावंडाना सांभाळण्याची जबाबदारी मोठ्या मुलांवर येते. या समाजात बालमजुरीचे प्रमाणही मोठे आहे. मुलांना मात्र त्यामुळे शिक्षण मिळू शकत नाही. त्यावर उपाय म्हणून ;निर्माण' चे कार्यकर्ते वस्तीवर जावून शाळा भरवतात. त्यातून मुलांना कथा, गाणी, विविध खेळांच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते.
केंद्र सरकारने ६ ते १४ वर्ष वयोगटासाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला. मात्र, आजही लाखो मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. यासाठी सर्वाना शिक्षण मिळावे हा महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेत 'सावित्रीची शाळा' हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती 'निर्माण' संस्थेचे संस्थापक संतोष जाधव यांनी 'नवराष्ट्र'शी बोलतांना दिली.
'निर्माण' च्या या उपक्रमात समाजातील विविध घटकांतील नागरिक सहभागी होत असून याला मोठ्या प्रमाणात सहकार्याची गरज आहे. मुळात, समाजकार्याचे शिक्षण घेतलेल्या संतोष जाधव यांनी सामाजिक बांधिलकीपोटी 'निर्माण' या संस्थेची स्थापना २००६ मध्ये केली होती. ज्या समाजातून आपण वर आलो त्या सामाजाला काही तरी दिले पाहिजे इतकाच काय तो यामागचा हेतू होता. पण, हीच छोटी सुरुवात नव्या सामाज प्रयोगाची नांदी ठरली. त्यातूनच अनेक उपक्रम समर्थपणे राबवले गेले. याच पैकी एक म्हणजे 'सावित्रीची शाळा' हा होय. हा प्रकल्प राबवण्यासाठी अशोक हतागळे, नामदेव कसबे, संदीप आखडे, अप्पा चाबुकस्वार आदी कार्यकर्ते प्रयत्न करीत आहेत.
"सावित्रीची शाळा' हा अभिनव उपक्रम आमची संस्था राबवत आहे. स्वातंत्र्यानंतरच्या इतक्या वर्षांच्या काळातही समाजातील सर्व घटकांना शिक्षण मिळू शकले नाही. त्यासाठी सामाजिक जाणीवेतून या प्रकल्पाचे निर्माण आम्ही केले होते. शाळा जर मुलांपर्यंत पोहचत नसेल तर शाळेने त्यांच्याकडे पोहोचावे. म्हणून भटक्या विमुक्तांचे जीवन जगणाऱ्या माणसांच्या पालावर जावूनच आम्ही हा प्रकल्प राबवीत आहोत."
संतोष जाधव
संस्थापक - अध्यक्ष, निर्माण सामाजिक संस्था.
"देशाच्या महासत्तेची स्वप्न आपण बघतो आहोत पण समाजातील सर्व घटकांच्या समान विकासाशिवाय ते शक्य होणार नाही. 'सर्वांना शिक्षण' हा आपला मुलभुत अधिकारही सर्वाना मिळू शकला नाही. याच वंचितांपर्यंत शिक्षण घेऊन जाण्यासाठी 'सावित्रीची शाळा' हा प्रकल्प महत्वाचा ठरतो."
वैशाली भांडवलकर
संचालिका, भटक्या - विमुक्त महिला अधिकार आंदोलन
========================================
दिनांक ६ मार्च २०१६ च्या दैनिक 'नवराष्ट्र' पुणे मधे 'सावित्रीची शाळा' या 'निर्माण' संस्थेच्या अभिनव उपक्रमाचा आढावा घेणारी
माझी ही
'न्यूज स्टोरी'
No comments:
Post a Comment