Monday, 28 March 2016



निस्वार्थी कार्यकर्त्याचा 'जीवनगौरव'
 (वेध 'विजय यशवंत विल्हेकर' यांच्या जीवन कार्याचा)


               "स्वतःची कोणतीही आर्थिक परिस्थिती नसतांना शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करणाऱ्या विजय विल्हेकरांना आमच्या संस्थेच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. निरपेक्ष वृत्तीने काम करण्याची त्यांची प्रेरणा समाजाने घ्यावी हाच त्यामागचा उद्देश आहे." 
अभिजित फाडके
आपुलकी फाउंडेशन, पुणे..  
  




       महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी निस्वार्थ भावनेने काम करणारे विजय यशवंत विल्हेकर यांना पुण्यातील 'आपुलकी फाउंडेशन' च्या वतीने देण्यात येणारा 'आपुलकी जीवनगौरव पुरस्कार' नुकताच जाहीर झाला. अमरावती येथे दि. २९ मार्च रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येईल. त्यात वनराईचे गिरीश गांधी, जेष्ठ कवी विठ्ठल वाघ, बाळासाहेब कुलकर्णी आदी उपस्थित राहणार आहेत. एक लाख रुपये रोख, सन्मान चिन्ह असे स्वरुप असलेल्या या पुरस्काराची रक्कम मात्र नेहमी प्रमाणेच विल्हेकर सर यांनी शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबियांना मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे.  


     
       माझा या 'अवलिया' व्यक्तिमत्वाशी परिचय झाला तो एका वादविवाद स्पर्धेच्या निमित्ताने. सर त्या स्पर्धेचे परीक्षक म्हणून आले होते. त्या स्पर्धेत मी यशस्वी होऊ शकलो नाही. मात्र, पुढील काळात माझ्यावर पित्यावत प्रेम करणाऱ्या सरांचा कायमचा ऋणानुबंध जुडला. आदिवास्यांच्या भाषेतील अनेक गाणी त्यांनी आम्हाला गावून दाखवली आणि चळवळी विषयीच्या गप्पाही आमच्याशी त्यांनी मारल्या होत्या.




     मुळात विजय यशवंत विल्हेकर यांच्या कार्याचा आढावा घेताना त्यांनी १९७० च्या दशकापासून ते आजवर केलेल्या व्यापक कार्याचा आलेख आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. देशातील विविध समस्यांविरुद्ध आवाज उठवत व्यापक जनआंदोलन निर्माण करण्यासाठी सरांची भूमिका महत्वाची ठरते. त्यातच महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी केलेले प्रयत्नही आदर्श ठरले आहेत. खरेतर वडिलांचा स्वातंत्र्य चळवळीचा वारसा आणि आईची कुटुंबा नियोजनाच्या चळवळीतील भूमिकेचे संस्कार त्यांच्यावर बालपणीच झाले होते. त्यातच वयाच्या १२ - १३ व्या वर्षात सरांनी विदर्भात कृषी विद्यापीठ व्हावे या साठीच्या मोठ्या भावाच्या मार्गदर्शनात आपला सहभाग नोंदवला. पुढे राष्ट्रीय विचारांनी प्रेरित होत जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनातही जनजागरण कार्यरत महत्वाच्या वाटा त्यांनी उचलला. जेपी यांच्या 'छात्र संघर्ष वाहिनी' या संघटनेत सामील होऊन देशभरात विद्द्यार्थ्यांचे जाळे त्यांनी तयार केले. पुढे महाराष्ट्रातील नामांतर चळवळीत सहभागी होऊन आंबेडकरी चळवळीशीही त्यांचे घट्ट नाते निर्माण झाले. 



       

        शेती आणि शेतकरी यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सरांवर पित्याप्रमाणे प्रेम करणाऱ्या शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेतही पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून आपण सहभागी झाल्याचे ते मोठ्या अभिमानाने सांगतात. याच आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी विदर्भात महिलांच्या नावे शेत जमिनी असाव्यात या साठीही प्रयत्न केले. त्यात १९८७ साली राबवण्यात आलेले 'लक्ष्मी मुक्ती आंदोलन' महत्वाचे ठरले. १९८८ मध्ये देशव्यापी 'शेतकरी कर्ज मुक्ती आंदोलन' छेडत सरकारला शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी त्यांनी भाग पडले. 

     
        विल्हेकर सरांच्या या कामांची दाखल घेत विविध संस्था संघटनांनी त्यांना अनेक पुरस्कार देऊन गौरवले आहे. त्यात २०१२ चा निळू फुले पुरस्कार, आम्ही सारे फाउंडेशनचा कार्यकर्ता पुरस्कार अशी प्रातिनिधिक नावे सांगता येतील. मात्र, मिळालेल्या या पुरस्कारांची रक्कमही त्यांनी आपली आर्थिक परिस्थिती नसतांनाही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना सुपूर्द केली. आपल्या चळवळींचा सर्व प्रवासही त्यांनी विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून वेळोवेळी मांडला आहे. त्यात २०१२ मध्ये या विषयावरचे 'अंबर हंबर' हे पुस्तकही प्रकाशित झाले. अलीकडेच मनोविकास प्रकाशनाच्या वतीने त्यांचे 'फकीरीचे वैभव' हे दुसरे पुस्तक येऊ घातले आहे. 



No comments:

Post a Comment