श्रद्धा साईबाबांची, सबुरी शिक्षणाची
नुकत्याच 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा'त 'साईबाबा अध्यासन केंद्र' सुरु करण्याच्या निर्णयाबाबत माध्यमांमध्ये काही बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. त्याबाबत कालच विद्यापीठाने एक प्रसिद्धीपत्रक काढून या अध्यासनास कोणतीही मान्यता देण्यात न आल्याचे कळवले आहे. या प्रकरणाचा वेध घेणारा हा लेख.
नुकत्याच 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा'त 'साईबाबा अध्यासन केंद्र' सुरु करण्याच्या निर्णयाबाबत माध्यमांमध्ये काही बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. त्याबाबत कालच विद्यापीठाने एक प्रसिद्धीपत्रक काढून या अध्यासनास कोणतीही मान्यता देण्यात न आल्याचे कळवले आहे. या प्रकरणाचा वेध घेणारा हा लेख.
शिक्षणाने माणूस शहाणा होतो, अंधश्रद्धांचा नाश होत विवेकाने जगण्याचा मार्ग मिळतो. हे आणि असे अनेक सुविचार बालपणापासून आपण ऐकत असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर शिक्षणाला ‘वाघिणीचे दूध’ म्हणत असत. मात्र, याच शिक्षण व्यवस्थेत तथाकथित धर्म आणि अंधश्रद्धेचा शिरकाव होऊन उद्याचे भविष्य ज्यांच्या खांद्यावर आहे त्या विद्यार्थ्यांनाच याचे शिकार व्हावे लागत असेल तर मात्र निश्चितच हे दुर्दैवी म्हटले पाहिजे. काल परवा वृत्तपत्रांमधून सावित्रीबाई फुले यांच्या नावे असलेल्या पुणे विद्यापीठात साईबाबा यांच्या ‘जीवन कार्याच्या संशोधन व चिंतनासाठी’ अध्यासन केंद्राच्या मान्यतेबद्दल बातम्या प्रकाशित झाल्या. त्यातूनच वाढता माध्यम रेटा आणि पुरोगामी सामाजिक संघटनांचा दबाब यातून तात्काळ धडा घेत काल विद्यापीठाच्या अधिकृत ‘माध्यम समन्वय कक्षा’ने या अध्यासन केंद्राला अद्याप मान्यता देण्यात न आल्याचे एका प्रसिद्धी पत्राद्वारे कळवले. मात्र, त्या पत्रकातच ‘खुलासा’ करतांना विद्यापीठाने साईबाबा संस्थानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांच्याकडून एक प्रस्ताव प्राप्त झाला असल्याचे सांगत त्याची दाखल घेत अध्यासन केंद्र सुरु करण्यासाठी लागणाऱ्या निधी बाबत ‘साई संस्थान’कडे विचारणा केली असल्याचे म्हटले आहे. अर्थातच या प्रसिद्धी पत्रत विद्यापीठाने अध्यासन केंद्रासाठी करावी लागणारी पूर्व तयारी तथा नियोजनाचाही थोडक्यात आढावा घेतला असून त्यात त्यांनी ‘निधी तरतूद’ ही ‘अध्यासन सुरु करण्याची पहिली पायरी’ असल्याचे म्हटले आहे. या प्रसिद्धी पत्रकाचा सूर ‘मी नाही त्यातली’ असा असला तरीही विद्यापीठाला ‘साईबाबा अध्यासन केंद्र’ सुरु करण्यासाठी निधी तरतुदीबाबत विचारणा करण्याची आवश्यकता का म्हणून निर्माण व्हावी ? हा मुळात प्रश्न आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या पुरोगामित्वाचा पुणे शहराला लाभलेला वारसा आणि त्यातच शिक्षणाच्या भगवेकरणापासून ते वाढत्या आत्यंतिक असहिष्णुतेच्या प्रश्नापर्यंत नजर टाकली तर ‘विद्यापीठे सामाजिक क्रांतीचे केंद्रे ठरावीत’ हा सामाजिक आशावाद व्यक्त होतानाच निधी संदर्भातील ही विचारणा निश्चितच ‘दाल मे कुछ काला’ असल्याचे सूचित करते.
मुळात, विद्यापीठांमधून अध्यासन केंद्रांच्या माध्यमातून ज्ञानमीमांसा होत संबंधित विषयाचे चिकित्सक मूल्यांकन तथा समकालीन वास्तवात चर्चा अपेक्षित असते. विविधांगी संशोधन, लेखन, चिंतन होत त्या विषयाचे महत्व अधोरेखित करत त्याच्या उपयोजनशीलतेची मूल्यमीमांसा करण्यात यावी, हा अध्यासन केंद्रांचा मुख्य हेतू असतो. मात्र, ज्ञानमीमांसेची प्रगाढ परंपरा आणि विद्वतजनांचे प्रदीर्घ सानिध्य लाभलेल्या पुणे विद्यापीठात साईबाबा अध्यासन केंद्राच्या निर्मितीचा प्रश्न पुरोगामित्वाच्या महंत वारश्याचे अवमूल्यन आणि उद्दिष्टांना हरताळ फासणारा ठरावा. मुळात, साईबाबा हे आहेत तरी कोण ? याचा विचार विद्यापीठाने करणे महत्वाचे होते. समकालीन वास्तवात अत्यावश्यक आणि आत्यंतिक महत्वाची अशी अनेक क्षेत्रे संशोधन व चिकित्सेसाठी उपलब्ध असताना साईबाबांच्या जीवन कार्यावर अध्यासन केंद्र निर्माण करण्याची गरज विशिष्ट समाज घटकाला भासलेली गरज आणि त्याला विद्यापीठाच्याही मान्यवरांकडून असलेला सुप्त पाठींबा हा मुळातच सारा संशोधन विषय ठरावा.
साईबाबा हे चमत्कारिक व्यक्तिमत्व सातत्याने सर्वसामान्य समाजमनावर बिंबवल्या गेले. त्यातूनच विविध अंधश्रद्धेला मिळालेले उधाण सर्वांपरीचित आहे. कोट्यावधी रुपयांचा निधी बाबांचे हजारो भक्त आज त्यांच्या देशभरातील संस्थानांना देत असतात. त्यातून तथाकथित समाज कार्य राबविण्याचा दावाही या संस्थांमार्फत केला जातो. हे वर्ष साईबाबांच्या समाधी शताब्दीचे वर्ष म्हणून त्यांचे भक्त साजरे करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून साई संस्थानच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात ‘श्री साईबाबा अध्यासन केंद्र’ सुरु करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यासाठी संस्थानच्या वतीने सुमारे एक कोटी रुपयांच्या निधीची तरतूदही करण्यात आली. शिर्डी साई संस्थानच्या अधिकृत वेब साईटवरही त्याबद्दल एक निवेदन जारी करण्यात आपले असून त्यानुसार, पुणे विद्यापीठाच्या वतीने हे अध्यासान केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगत येत्या सत्रापासून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल असेही म्हटले आहे. याबाबत अधिक माहिती देतांना ‘साई संस्थान, शिर्डी’चे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनीही, ‘साई बाबांच्या जीवन चरित्राचा अभ्यास करण्यासाठी’ साईबाबा अध्यासन केंद्र सुरु करण्यास साई संस्थानच्या प्रस्तावास विद्यापीठाने मंजुरी दिल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले आहे.
मुळात, सध्यस्थितीत विद्यापीठात एकूण १९ अध्यासन केंद्रे आहेत. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र,, संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्र, संत ज्ञानेश्वर अध्यासन केंद्र, लो. टिळक अध्यासन केंद्र, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्र, छ. शिवाजी महाराज अध्यासन केंद्र, म. गांधी अध्यासन केंद्र, विखे पाटील अध्यासन केंद्र, शंतनुराव किर्लोस्कर अध्यासन केंद्र, इसरो स्पेस सायन्स स्टडी अध्यासन केंद्र, एअर पॉवर नॅशनल सिक्युरिटी स्टडीज अध्यासन केंद्र, जैवतंत्र अध्यासन केंद्र, स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र, ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ एनर्जी स्टडी अध्यासन केंद्र, भीमसेन जोशी अध्यासन केंद्र, सी एस आई आर / आय पी आर अध्यासन केंद्र आदींचा समावेश आहे. या पैकी सुमारे १७ अध्यासन केंद्रांचे प्रमुखपद रिक्त असून या सर्वच अध्यासन केंद्रांचे काम मागील दोन वर्षांपासून संथ गतीने सुरु आहे. या पैकी फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र व छ. शिवाजी महाराज अध्यासन केंद्र यांनाच अनुक्रमे विजय खरे व संजय भिडे हे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
विद्यापीठाने उपरोक्त अध्यासन केंद्रांची व्यवस्थित काळजी घेत ही केंद्रे अत्याधिक जोमाने कार्यरत व्हावीत असा आशावाद आता या चर्चेच्या निमित्ताने व्यक्त होतो आहे. मुळात, शिक्षण संस्था या सामाजिक परिवर्तनाच्या आधारशीला रचणाऱ्या केंद्र संस्था असतात. मग, अशा वेळी होणारी शैक्षणिक हयगय निश्चितच नव समाजनिर्मितीच्या प्रक्रियेसाठी बाधक ठरेल यात शंका नसावी. अर्थातच भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रात धर्म श्रद्धांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून आदर बाळगणे मोलाचे ठरावे. विद्यापीठाने अद्याप तरी ‘साईबाबा अध्यासन केंद्रा’चा निर्णय न घेण्यात दाखवलेली ‘सबुरी’ निश्चितच तूर्तास शिक्षण क्षेत्रावर ‘श्रद्धा’ जागवणारी असली तरीही भविष्यात ‘श्रद्धा साईबाबांची आणि सबुरी शिक्षणाची’ असे होऊ नये म्हणजे झाले.
पूर्वप्रकाशित
'एक्टिव्हिस्ट पोस्ट', दिनांक २१ डिसेंबर २०१७
https://marathi.activist-post.com/featured/sai-baba-study-centar-dispute/
https://www.facebook.com/pg/activistpost.magazine/posts/
सन्दर्भार्थ
साईं संस्थानची अधिकृत वेब साइटवरील घोषणा https://www.shrisaibabasansthan.org/news/index.htm
No comments:
Post a Comment