Thursday, 2 October 2014

युवा प्रेरक सुब्बाराव 

                                        युवा प्रेरक सुब्बाराव 



आदरणीय सुब्बरावाजी

     भारत महासत्तेच्या महामार्गाने प्रस्थान करण्याच्या संकल्पार्थ कटिबद्ध आहे तेथेच भावी भारताच्या नव निर्माणासाठी युवकांमध्ये प्रेरणा निर्मितीचा प्रयत्न करणारे डॉ.एस.एन.सुब्बाराव यांचे कार्य ही त्याच मार्गावर दीपस्तंभ ठरणारे आहे. युवक हाच राष्ट्र निर्माता आणि याच युवकांच्या सक्षम खांद्यावरच महासत्तेची धुरा असल्याचा विचार बरेचदा बोलून दाखवला जातो. मात्र जेव्हा राष्ट्र उभारणी साठी युवकांचे निर्माण या ध्येयाने प्रेरित होऊन सुब्बरावांसारखी एखादी हस्ती कार्य हाती घेते,तेव्हा या कार्याला प्राप्त होणारे चीरंतनाचे मुल्य भावी पिढीला मार्गदर्शन करणारे ठरते.                                                                                                डॉ.एस.एन.सुब्बाराव यांचा परिचय करून देण्याची मुळातच गरज नाही. य़ुवकांचे प्रेरणास्थान असणाऱ्या सुब्बारावजी यांना भाईजी म्हणून होणारे उस्फुर्त संबोधन म्हणजे  त्यांचे आपल्या प्रतीचे नाते उद्घृत करण्यास समर्थ नाहे. आपल्या सुसंस्कृत,सध्या व्यक्तित्वाच्या बळावर चक्क चंबळ च्या डाकूनाही अहिंसात्मक मार्गाची वाट धरायला लावणारा हा ८५ वर्षांचा युवा नेता युवकानाही मोहिनी घालतो आपल्या व्यक्तित्वाची, विचारांची .समाजातील सज्जन शक्ती जेव्हा विपरीत काळातही शांत बसते तेव्हा घडून येणारी हानी ही दुर्जनांच्या वितंडा पेक्षाही भयावह असते.याच विचारातून सुब्बरावांचे कार्य आज सक्षम व रचनात्मक कार्यासाठी विधायक मार्गाचा वापर करून लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निर्माणासाठी होत आहे.भाईजींचा जन्म मुळात कर्नाटक मधील ब्यांगलोर मधला,त्यांचे पूर्वज तमिळनाडूतील सालेम या गावातील म्हणूनच ७ फ़ेब्रु.१९२९मध्ये जन्मलेले सुब्बाराव यांचे नाव ठेवण्यात आले सालेम नान्जूदेय्या सुब्बाराव आपल्या कुटुंबातील संस्कार,तत्कालीन सामाजिक वातावरण,पेटलेले स्वातंत्र्याचे रणशिंग, महापुरुषांचा समाज मनावरील प्रभाव,माध्यमांची ठोस भूमिका आदी सर्वांचा परिणाम सुब्बाराव यांच्या बाल मनावर झाला असावा. त्यातूनच साकार झाले ते देशासाठी चळवळ कर्त्या सुब्बरावांचे क्रांतिकारक व्यक्तिमत्व.वयाच्या १० व्या वर्षी स्वतःच्या शाळेत जुलमी ब्रिटीश राजवटीच्या विरोधात केलेल्या बाल संघटने पासून ते १३व्या वर्षी भारत छोडो आंदोलनाला साथ देत शाळेतून निघून जाऊन गांधींच्या ब्रिटीश शिक्षण व्यवस्थेला त्यागण्याच्या आव्हानाला ओ देत केलेले पलायन त्यातच निदर्शनांमुळे झालेली अटक हाच मुळात रोमांचित करणारा अद्भुत कालखंड वाटतो.ज्या वयात आपण गोटया खेळलो त्याचा काळात सुब्बाराव देशासाठी जेलावाऱ्या करीत होते हेही एक नवलच म्हणावे लागेल.   

           त्या नंतरच्या काळातही सुब्बाराव यांनी आपले कार्य जोमाने सुरुच ठेवत गांधीवादाचे उपयोजन राष्ट्रीय समस्यांच्या निर्मुलनार्थ करण्याचे प्रयत्न केले.  अर्थात कोणतही विचार काळाचे अपत्य ठरावा.सुब्बाराव यांनी आपला वेध हा मुळात युवा निर्माण ते राष्ट्र विकास याच दिशेने ठेवला.सुरुवातीच्या काळात गांधी साहित्य संघाच्या छायेखाली आयोजीत कृती कार्यक्रम आणि राष्ट्रसेवा दल व विद्यार्थी कॉंग्रेस मधील सेवेने केलेला प्रारंभ नव्या कार्याचा पाया ठरावा. भारत स्वातंत्र्या नंतर मात्र जे स्वप्न आपली नेत्यांनी बघितले ते पूर्णत्वास गेले नाही ते दुदैव, मात्र या समस्या ग्रस्त भारता साठी यत्न करणे ही  गरजेचे होते ते आपल्या राष्ट्रीय युवा योजना या युवाचा चळवळीच्या माध्यमातून केले. युवकांचे सकारात्मक विधायक कार्यासाठी संघटन करीत देशाच्या कानाकोपऱ्यात आयोजित शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी अंतर भारतीय राष्ट्रीय एकात्म युवकांची नवी पिढीच निर्माण केली.  

    स्वातंत्र्यानंतर राजकीय लोकशाही भरतात अवतरली मात्र सामाजिक-आर्थिक लोकशाही पासून आजूनही दूर असलेला देश  विषमतेच्या  खाईतच उभा आहे. त्या दृष्टी ने यत्न करतांनाच सुब्बारावांचे लक्ष्य गुन्हेगार समजल्या गेलेल्या चंबळच्या प्रदेशाकडे वेधले गेले त्यातही गुन्हेगारीचा पेहेराव पांघरलेल्या माणसाने त्यांना आकृष्ट केले मदहो सिंग सिंग आणि उधम सिंग सारख्या १०० डाकुंना त्यांनी आत्मसमर्पण करवत राष्ट्राच्या मुख्य धारेत समाविष्ट केले. १९५४ मधील ही घटना आजही आपल्या साठी तेवढीच प्रेराणास्पद आहे. उपरोक्त तथाकथित गुन्हेगारांना त्यांनी मध्यप्रदेशातील गांधी सेवा आश्रमात आश्रय दिला आणि श्रमदान करीत आपले जीवन जगणारी आदर्श माणसे घडविण्याचा प्रयोग करत अनोखे उदाहरण समाजासमोर प्रस्थापित केले. १९७२ मध्ये ६५४ चंबळ खोऱ्यातील डाकू तर १९७४ मध्ये राजस्तानातील १२३ डाकुनीही सुब्बाराव यांच्या मार्गाचा अवलंब केला.

 

    

सुब्बारावजींनी आपले विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्या साठी त्यांनी अनेक पुस्तकांचेही लेखन केले.अपना सुख बिसार ज्या हे अलीकडील पुस्तक त्यांच्या महान कार्याची कहाणीच आहे.सुब्बाराव यांनी छोट्या खेड्यांपासून ते देश विदेशातील प्रवासाने युवकांना प्रेरित केले.अनेक नामांकित पुरस्कार प्राप्त सुब्बाराव मात्र या प्रवासातही फळांनी वाकलेल्या वृक्षांप्रमाणे नम्रच राहिलेत.१९९५ चा राष्ट्रीय युवा पुरस्कार भारत सरकार ने त्यांना प्रदान करून युवकांप्रती त्यांनी केलेल्या कार्यांची कृतज्ञताच जणू व्यक्त केली. १९९७  मध्ये त्यांना मानद डी.लिट ने सन्मानित केले गेले.सोबतच २००२ मध्ये विश्व मानवाधिकार प्रोत्साहन पुरस्कार ,२००३ मध्ये राष्ट्रीय संप्रदाय सद्भावना पुरस्कार (भारत सरकार) ,भारतीय एकता पुरस्कार,२००८ साली म.गांधी जीवन गौरव पुरस्कार या व अश्या किती तरी राष्ट्रीय अंतर राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित भाईजी आज वयाच्या ८५ व्या वर्षातही तारुण्याला लाजवेल अश्या उत्साहाने सतत कार्य मग्न असतात.                                                               काही दिवसांपूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्य आयोजित सोहळ्याचे औचित्य साधून भाईजी गुरुकुंज आश्रम मोझरी , ता. तिवसा, जी.अमरावती (महाराष्ट्र) या छोट्याश्या गावात आले होते.अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे गुरुजी यांनी प्रेमाने  करून दिलेला परिचय हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय असाच अनुभव होता. त्या वेळी त्यांच्याशी बोलण्याचे लाभलेले सौभाग्य अनेक दिवसांच्या संकल्पांची जणू सिद्धीच होती.अनेकदा याच ठिकाणी बाल वयात मी त्यांची ऎकलेलि भाषणे आणि भाईजींसोबत खेळलेले सामुहिक खेळ अजूनही स्मरणात होतेच मात्र प्रत्यक्ष भेट ही पहिलीच.त्या वेळी ते मला म्हणाले होते की,"बाळ,काळ बदलतो तशीच परिस्थितीही बदलत जाते महापुरुषांच्या  विचारांचे संदर्भ नव्या काळानुसार शोधत तुम्हालाच आता पुढे यावयाचे आहे... "अनेक भाषा अवगत असणाऱ्या भाईजींचे ते शब्द आजही मनात घर करून आहेत. खरच मोठी माणसेजी बोलतात त्याला चिरंतनाचं मुल्य असतं. त्यातही जे शब्द मुखातून बाहेर येतात ते कानापर्यंत पोहोचतात आणि जे हृदयातून येतात तेच ह्रुदय पर्यंत पोहोचतात. भाईजींचे ते शब्द आज हृदयात आहेत अनामोल अशी शिदोरी बनून. पुढे भाईजींच्या भाषणाची वेळ झाल्याने आम्ही सारे त्यांच्या सोबत कार्यक्रम स्थळी जायला निघालो.वाटेत उस्फुर्तपणे माझ्या खंद्या वर हात ठेऊन ते चालत राहिले. आजही तो हात मायेची उब देत आहे. त्यांच्या या परिस स्पर्शाने आई भेटल्याचा आनंद मला त्या वेळी झाला होता.                                                                                                             

आदरणीय सुब्बरावाजींच्या समवेत (गुरुकुंज आश्रम ,मोझरी )

सुब्बराव म्हणजे दोन स्थितींना जोडणारा दुवा ठरावेत एक अद्भुत नवा भारत आणि दोन आपला ऐतिहासिक वारस्याचा आदर्श.खरच भारतीय युवकांच्या हृदयाचे पोषण करणारे भाईजी  एक जिवंत विद्यापिठाच होत. 


                                                                                                                                                               


No comments:

Post a Comment