श्रद्धा साईबाबांची सबुरी विवेकाची
ज्या अखंड क्रांतिकारी संत परंपरेने महाराष्ट्र धर्माचा पिंड आजवर पोसला त्याच परंपरेच्या नावाने निर्माण झालेली भोंदूगिरी आणि दुकानदारी सर्वसामान्यांच्या शोषणास मात्र कारणीभूत होणारी ठरली. अगदी चक्रधर ते तुकोबा-चोखोबा आणि अलीकडे कर्मयोगी संत गाडगे बाबांपर्यंतची ही परंपरा, परंपरेतून निर्माण झालेले संत साहित्य आणि तत्त्वज्ञानाचा मूलगामी वारसा आपणास लाभला असतांनाही एकीकडे देव्हाऱ्यात अग्रस्थानी असलेले हे संत व्यवहारात मात्र पद्धतशीरपणे नामोच्चार आणि संदर्भांपुरतेच उरवून ठेवण्यात आले. त्यातूनच संत आणि त्यांच्या साहित्याला डोक्यावर घेणारा समाज, त्यांना डोक्यात घेइनास झाला आणि अर्थातच आत्मघाताच्या गर्तेत गेला. दुर्दैवाने दैवतीकरणाच्या प्रक्रियेचा अविभाज्य भाग म्हणून सारासार विवेकही आपण गमावून बसलो आणि ‘अविवेकाची काजळी’ मनाचा आरसा धूसर करून गेली. चिकित्सा हा संतांच्या विचारांचा मूळ गाभा कधीचाच आपण विसरून श्रद्धा-भक्ती आणि देवपूजेतच लिन झालो. मुळात संतांच्या एकंदरीतच जीवन चरित्र आणि तत्वज्ञान व्यवहाराची सबुरीने चिकीत्सा केली असती तर कोणत्याही ऐऱ्या-गैऱ्या असंताच्या ठाई वाऱ्या कराव्या लागल्या नसत्या. असो.
महाराष्ट्राला वाद-प्रवादाची परंपरा काही नवी नाही. मात्र, हे वाद आजच्या अश्या टप्प्यातही येऊन पोहचतील हे मात्र कोणासही वाटले नसावे. देशात तिरुपती बालाजी नंतर दुसरे सर्वात श्रीमंत असलेले देवस्थान म्हणजे शिर्डीचे साईबाबा मंदिर आहे. राज्यच नव्हे तर देश आणि विदेशायातूनही भक्त या ठिकाणी सातत्याने येत असतात. श्रद्धा आणि सबुरी हा साईबाबांनी दिलेला कथित संदेश जरी लक्षात घेतला तरीही साई भक्तांकडून किमान तितका तरी आदर्श आचरण्याची अपेक्षा निश्चितच करता यावी. पण दुर्दैवाने तसे असू नये.
काही दिवसांपूर्वी मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परभणी जिल्ह्यातील पाथरी गावाचा उल्लेख साई बाबांची जन्मभूमी असा केला आणि एका नव्या वादाला तोंड फुटले. या आधीही ज्यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद साई जन्मशताब्दी निमित्त शिर्डीला आले होते त्यावेळी त्यांनी बाबांची जन्मभूमी म्हणून पाथरीचा विकास करण्याची गरज व्यक्त केली. त्यावेळीही काही लोकांनी नाराजीचा सूर लावला आणि महाराष्ट्राच्या काही मान्यवर मंत्र्यांनी राष्ट्रपतींना कुणीतरी चुकीची माहिती दिली असावी असे म्हटले.
भारतासारख्या देशात कथित धर्म, धार्मिक महापुरुष, परंपरा आणि तत्वज्ञानाचे आचरण यावरून निर्माण होणारे वाद काही नवे नाहीत. मात्र ज्या देशात जीवन-मरणाचे अन्य प्रश्न आ वासू उभे आहेत त्या ठिकाणी साईबाबाच्या जन्मस्थानावरून वाद पेटून थेट बंद वगैरेचे प्रसंग निर्माण होऊन आणखी जनतेला वेठीस धरण्याचे कार्यक्रम राबवल्या जाणे निश्चितच लोकशाही धिष्टित समाज म्हणून घातक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित समाज हा भारतीय संविधानाच्या उपयोजनाचा एक महत्वपूर्ण बिंदू आहे. पूर्णपणे धर्मनिरपेक्षता आणि स्वतंत्र, समता, न्याय, बंधुतेच्या चौकटीवर उभारलेले संविधान राबवण्याची पूर्ण जबाबदारी एक समाज म्हणून आपणा सर्वांची आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये राज्यकर्त्यांनीही धर्माधिष्टीत राजकारणाचा आश्रय न घेता आपली जनकेंद्रितता जोपासणे आवश्यक असते. धर्म संदर्भ आणि त्या आधारावर होणाऱ्या राजकारणातून नेमकी काय दुरावस्था होऊ शकते हे भारतीय नागरिक म्हणून आपण सर्वांनीच स्वातंत्र्यानंतर (आणि आधीही) सातत्याने अनुभवले आहे. काही दिवसांपूर्वी पुणे विद्यापीठात ‘साईबाबा अध्यासन केंद्रा’ ची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी अनेक पुरोगामी संघटना, विद्यार्थी, प्राध्यापक, लेखक आणि विचारवंतांनी याचा जाहीर निषेध व्यक्त केला होता. अर्थात, अत्यंत मूलगामी प्रश्न आणि समस्यां अजूनही आपण सोडवू शकलो नसतांना केवळ संकुचितता आणि तत्सम कृती निश्चितच निषेधार्य आहे. म्हणूनच एक समाज म्हणून साईबाबांवर श्रद्धा ठेवतांनाच विवेकाची मात्र सबुरी करून चालणार नाही.
No comments:
Post a Comment