Tuesday, 3 December 2019

आंबेडकरी चळवळ
आणि समकालीन उपयोजनाचा प्रश्न     



कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती, धर्म, आचार-विचार आणि तत्वज्ञान प्रामाण्याच्या विरोधात बंड उभारणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज मात्र त्यांच्याच देशातील जनतेकडून दैवती करणाच्या प्रक्रियेत बंधिस्त होतांना दिसून येतात. त्यामागची कारणे सुद्धा ज्या प्रस्थापित विषमतावादी धर्म प्रवाहास त्यांनी विरोध केला त्या तत्त्वज्ञानाच्या मुशीत पिढ्यानपिढ्या घडलेल्या गुलाम मानसिकतेत शोधता येतील. कोणत्याही सामाजिक क्रांतिकारकास देवत्व प्रदान केले की त्यामागच्या मानवी जाणिवा कमकुवत होऊन त्या द्वारा निर्माण होऊ घातलेल्या सकारात्मक सामाजिक प्रक्रिया मंदावते हे त्यामागचे गृहीत सूत्र असते. मुळात समकालातील भारतीय समाजाचे समतावादी स्वरूप हे आंबेडकर आणि त्यांच्या पूर्वीच्या क्रांतिकारक चळवळीची देण होय. भारतीय समाजाच्या सामाजिकरणाचे महान आंदोलन आजवर आंबेडकरी चळवळीने उभारले आणि ते सिद्धीस नेण्याचा महत यत्न केला. आजही डॉ. बाबासाहेबांच्या विचार आणि त्यांच्या उपयोजित तत्वज्ञानाची निकड याच नाही तर जागतिक मानवी समाजाला जाणवते आहे, हे त्या तत्वज्ञानाच्या साकल्याधिष्टित विवेकवादी मानवकेंद्रित स्वरूप आणि महान त्याग तथा  समाजहितैषी भूमिकेतून झटणाऱ्या कार्यकर्ते विचारवंत आदींचे हे यश आहे. 
आंबेडकरी चळवळीचा इतिहास बघता आंबेडकरोत्तर कालखंडात भारतीय संविधानाच्या उपयोजनाच्या कठोर आग्रहावर ही चळवळ लढल्या गेल्याचे दिसते. मुळात बाबासाहेबांचा लढा केवळ मानवाधिकारांपुरताच मर्यादित न राहता तो राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक तमाम पातळ्यांवरचा  ऐतिहासिक संघर्ष होता. मात्र सामाजिक सुधारणांशिवाय राजकीय सुधारणा निष्फळ ठरतील या जाणिवेतून दलित-वंचित-पीडित बहुजन समाजास त्यांनी सत्तेचा वाटा घेण्यास सुचवले. त्यासाठी प्रस्थापित पक्षाच्या विरोधात मजबूत विरोधी पक्ष निर्माण करण्याच्या भूमिकेतून १९४२ साली ‘शेड्युल कास्ट फेडरेशन’ ची त्यांनी स्थापना केली. पुढे त्यांच्याच खुल्या पत्रातील निर्देशाच्या आधारावर त्यांच्या अनुयायांनी १९५७ साली ‘भारतीय रिपब्लिकन पक्षा’ची  स्थापना केली. दुर्दैवाने आज मात्र बाबासाहेबांच्या याच पक्षाचे ५० पेक्षाही जास्त तुकडे झाले आहेत. यातून निर्माण झालेली सर्वांगीण पातळीवरची कमकुवत लक्षात घेता १९७० च्या दशकात निर्माण झालेल्या ‘दलित पँथर’ ने समाजावर वेगळा ठसा निर्माण केला होता. आजही देशभरातच नव्हे तर आतंरराष्ट्रीय पातळीवर आंबेडकरी तत्वज्ञानाचा आधार घेत विविध चळवळी जन्मास येत आहेत.    

अर्थात कोणतीही चळवळ ही परिपूर्ण असू शकत नाही. कालानुरूप परिस्थिती सापेक्ष मूल्य-व्यवस्था आणि रणनीती त्या चळवळीने स्विकारावी लागते. बदलांचा मागोवा घेत पावले टाकावी लागतात. एका विविक्षित जात समूहात जन्मास आल्याने कोणी आंबेडकरवादी होत असेल तर हा मोठा भ्रम आहे. आजच्या आंबेडकरी चळवळीला कोणत्याही एका जात-वर्ग समूहाच्या दावणीला न बांधल्या जाता मुक्तपणे त्या तत्त्वज्ञानाच्या आचारवंतांची फळी सर्व जाती आणि वर्ग समूहांमधून निर्माण करण्याचे प्रयत्न करावे लागतील. दुर्दैवाने आज एकीकडे पोथीनिष्ठता आणि दुसरीकडे केवळ एका जात समुहापुरतेच मर्यादित करण्यात काहींनी धन्यता मानली. आंबेडकरांनाही हेतुपुरस्सर जातीच्या चौकटीत बांधण्याचा प्रयत्न या  स्वार्थी मानसिकतेने केला. सर्वस्पर्शी आंबेडकर आज घराघरातच नव्हे तर माणसाच्या मनामनात पोहचवत कोणत्याही संप्रदायिकरणापासून हा आंबेडकरी विचार दूर ठेवण्याची जबाबदारी त्यांच्या अनुयायी म्हणवून घेणाऱ्या आपल्या सर्वांची आहे.

प्रकाशित - https://maharashtradesha.com/the-question-of-the-ambedkarti-movement-and-contemporary-planning/

5 comments:

  1. कुणाल चांगले विश्लेषण आहे.

    ReplyDelete
  2. अगदी बरोबर कुनाल दादा, काही चळवळींनी बाबासाहेबांच्या तत्वज्ञानातील समता व बंधूता स्वताच्या जातीधर्मापुरती मर्यादीत ठेवली व त्या चळवळीं कालांतराने कमकुवत होत गेल्या..बाबासाहेबांच्या विचारांची चळवळ ही सर्वसमावेशक असायली हवी..तेव्हाच त्यांचे विचार तळागाळांतील लोकांच्या मनात रूजवता येतील..

    ReplyDelete
  3. कुणाल, छान।

    काळाची गरज की कोणी एक सर्वसामयिक पक्ष आणि नेता व्हावा।

    बहुजन वंचित किंवा अम्बेडकराइट पार्टी ऑफ इंडिया

    सार्वभौम भारतात वंचितांचे हित जपण्यबरोबर सार्वत्रिक विकास व्हावा।
    काळाची गरज आहे की आपल्यासरखे सुशिक्षित तरुणाई यांनी एक होऊन पुढाकार घ्यावा।

    धन्य।

    ReplyDelete