आ. बच्चू कडू यांचे राजकारण आणि त्यांचा
अचलपूर मतदार संघ
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारात अमरावती जिल्ह्याच्या तिवसा मतदार संघातून ऍड. यशोमती ठाकूर यांची कॅबिनेट मंत्री पदी तर अचलपूर मतदार संघातून आ. बच्चू कडू यांची राज्य मंत्री पदी निवड करण्यात आली. मुळात विदर्भाच्या राजकारणात अमरावतीचे महत्व निश्चितच अधोरेखित करण्यासारखे आहे. सत्ताधारी वर्गानेही हे ओळखूनच सत्ता समतोल आणि प्रतिनिधित्वाच्या विचारातून जिल्ह्यास दोन मंत्री पदे देऊ केली आहेत. पैकी आ. बच्चू कडू हे अपक्ष उमेदवार म्हणून चौथ्यांदा निवडून आले असून या निवडणुकीत प्रहार पक्षाची ताकतही त्यांच्यासह दोन आमदारांच्या रूपाने वाढल्याचे दिसून येते.
आ. बच्चू कडू यांच्या राजकीय जीवनाचा आढावा घेता सातत्याने जनकेंद्रित राजकारण आणि लोक मुद्द्यांना प्राधान्य देत अगदी 'सिंघम स्टाईल' आंदोलनातून जनतेच्या मनात स्थान निर्माण करणारे राजकारणी अशी त्यांची ओळख महाराष्ट्रास आहे. अगदी बेरोखठोक भूमिका मांडत सत्ताधारी वर्गास सामान्यांच्या बाजूने भूमिका घेण्यास भाग पाडण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. जिल्ह्यातील रुग्ण, अपंग, शेतकरी, शेतमजूर तथा सर्वसामान्य जनतेच्या बाजूने सात्तत्याने उभे राहण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याने ही जनता सुद्धा त्यांच्या बाजूने उभी राहते हे नेहमीच जिल्ह्यांच्या राजकारणात दिसून येते.
मुळात बच्चू कडू यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात ही शिवसेनेच्या एका साध्या कार्यकर्त्याच्या रूपाने केली. नंतरच्या काळात मात्र त्यांनी ‘प्रहार जनशक्ती’ या संघटनेची स्थापना करून जनतेच्या विविध प्रश्नांवर राजकारण आणि आंदोलनाचा मार्ग अवलंबला. त्यांची बरीचशी आंदोलनेही उल्लेखनीय आणि माध्यमांना बातम्या उपलब्ध करून देणारी अशीच ठरली आहेत. त्यात त्यांचे 'शोले स्टाईल' आंदोलन असो की अमेठी मधील एका वृद्धेस घर बांधून देत थेट राहुल गांधी यांच्या राजकीय फ्रेमच्या विरोधातील आंदोलन असो ही सारीच आंदोलने जनतेच्या मानत घर करून गेली आहेत. इतकेच नाही तर शासकीय दिरंगाई आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात थेट कृती करत अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याचा त्यांचा कार्यक्रम ही जनतेला भावाला असावा.
तूर्तास बच्चू कडू हे अचलपूर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. या मतदार संघाला आजपर्यंत दोनदा राज्यमंत्री पद आणि दोनदा पालकमंत्री पद मिळाले आहे. मात्र बच्चू कडू हे अपेक्ष म्हणून निवडून येत मंत्रिपद मिळवणारे या मतदार संघातील पहिलेच आमदार ठरले आहेत. इतकेच काय तर जिल्ह्याच्या राजकारणात सलग चार वेळा निवडून येण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. सन १९९४ मध्ये राज्यात युतीचे सरकार असतांना या मतदार संघातून आ. विनायकदादा कोरडे यांना पशुसंवर्धन व दुग्ध विकास खात्याचे राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर काही वर्षांपूर्वी अगदी थोडक्या मतांनी वसुधाताई देशमुख यांनी बच्चू कडू यांचा पराभव केला आणि आघाडी सरकार मध्ये राज्यमंत्री व पालकमंत्री पद मिळवले. नंतरच्या काळात मात्र आ. बच्चू कडू यांनी मतदार संघात आपला जम बसवत आपले वर्चस्व निर्माण केले. आणि आता मात्र थेट १५ वर्षांनी आ. बच्चू कडू यांच्या रूपाने या मतदार संघास राज्यमंत्री पदाची संधी मिळाली. निश्चितच आ. बच्चू कडू यांनी मिळवलेला जनतेचा हा विश्वास भविष्यात सुद्धा असाच जपतील आणि जनकेंद्रित राजकारणाचा त्यांचा मार्ग दृढ होईल.