Friday, 23 November 2018

माझ्या बाबांच्या पाच कविता  


१) पाहिले मी

रक्त माणसांचे स्वस्त पाहिले मी
गळे कापणारे दोस्त पाहिले मी

अव्यक्त ईश्वराचे अस्तित्व पुजणारे
नरक यातनेने भयग्रस्त पाहिले मी

थापा प्रबोधनाच्या मारोत बापडे हे
चारित्रही तयांचे उध्वस्त पाहिले मी

ज्यांच्या मुळे मिळावी मुक्ती उभ्या जगाला
ते धर्म पंडितांचे बंदीस्त पाहिले मी

स्त्रीच्या महानतेचा आदर्श सांगणारे
धंद्यात ते मुलींच्या व्यस्त पाहिले मी

'आम्ही सनातनी' ही जे मारतात शेखी
मंदिरालयात काही विश्वस्त पाहिले मी

कारागृहात ज्यांचा आजन्म जन्म जावा
सत्तेत राज्यकर्ते निर्धास्त पाहिले मी

ही वाटचाल सारी अंधारल्या दिशेने 
पूर्वेसही उद्याचे सूर्यास्त पाहिले मी


२) प्रबोधन

स्वार्थात आपलाल्या जगतात लोक सारे
बाता प्रबोधनाच्या बकतात लोक सारे

जे दिन रात्र सारी करती हरामखोरी
त्यांच्या समोर इथले झुकतात लोक सारे

सडकीच संस्कृतीही कुजकी विचारधारा
प्रेमास संशयाने बघतात लोक सारे

हा रोज पाहातोरे व्यापार चाललेला
अब्रूसही दुकानी विकतात लोक सारे

अपवाद सांगण्याला जे सभ्य काही लोक
त्यांच्या वरीही आता थुंकतात लोक सारे


३) पर्याय

गांधींच्या देशात, उरली ना शांती ।
युद्धाला विश्रांती, नाही येथे ।।

कळला न आम्हा सुखाचा तो अर्थ ।
श्रमता का व्यर्थ ? स्वार्थासाठी ।।

नाही ओळखली काळाची पाऊले ।
पाठीशी धावले, प्रदूषण ।।

शत्रू ते लपले, मित्रांच्या रूपात ।
सहद तुपात मिसळले ।।

साऱ्या समस्येला, बापूंचा पर्याय ।
दुसरा उपाय असेची ना ।।


४) माझा गाव

परतून आज माझे मी गाव पाहिले
त्याच जाती रीती भेदभाव पाहिले

शूद्र, ब्राह्मणांची भिन्न भिन्न वस्ती
माणसांच्या सभ्यतेला विभागतात रस्ती
बंदीस्त धर्म आणि त्यांचे देव पाहिले
परतून आज माझे मी गाव पाहिले

सावकारी पाश तेच तेच गाव गुंड
राजकीय अस्मितेचे माजलेहे बंड
सत्तेसाठी लाचारीचे डाव पाहिले
परतून आज माझे मी गाव पाहिले

चालतीचे मित्र होते आज झाले पारखे
भुललेत भाकरीला तेही श्वाना सारखे
स्वार्थप्रवृत्तीचे बेबनाव पाहिले
परतून आज माझे मी गाव पाहिले

कालचा तो काळ गेला सभ्य होते चोरही
आज आता लाज वाटे अपराध करती थोरही
नितीभ्रष्ट त्यांचे स्वभाव पाहिले
परतून आज माझे मी गाव पाहिले


५) कविता

वेदनाही विचारांचा धडा वाचू लागते
कविताही मनामध्ये तेव्हा सुचू लागते

भ्रष्ट झाले श्रेष्ठ आता तुम्ही आम्ही नष्ट 
सत्तेभोवती जमा झाले सारे नतद्रष्ट
काळ्या पैश्यामुळे त्यांचे धन साचू लागते 
कविताही मनामध्ये तेव्हा सुचू लागते

मुर्दाळ संस्कृतीचे कितीतरी गोडवे
आळदांड विकृतीने केले किती आडवे
सभ्यतेचा बुरुजही असा खचू लागते
कविताही मनामध्ये तेव्हा सुचू लागते

कटं करून संकटं भेट दिली जातात
हटकून मित्रही थेट दूर होतात
उपहास आपोआप जेव्हा पचू लागते
कविताही मनामध्ये तेव्हा सुचू लागते

लाचारांच्या गर्दीमध्ये व्हावे समाविष्ट
नाहीतर अहोरात्र सोसणे हे कष्ट
डोक्यामध्ये समतेचे भूत नाचू लागते
कविताही मनामध्ये तेव्हा सुचू लागते


- मदन रामटेके
मो. 9975209730 
रिद्धपुर, ता. मोर्शी, जिल्हा अमरावती, पिन को. 444704

No comments:

Post a Comment