अरुणाजींशी पहिली भेट
जेष्ठ साहित्यिक अरुणा ढेरे यांची यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य
संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड निश्चितच बदलांची नांदी आहे…
आ. अरुणा ढेरे |
गेल्याच आठवड्यात अरुणा ढेरे यांची निवड यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झाल्याची बातमी आली. मुळात, दर वर्षी होणाऱ्या वाद - प्रवादांना फाटा देत सम्मेलनाध्यक्षांची सन्मानपूर्वक निवड करण्याचा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयाचे फलित म्हणून अरुणाजींची ही निवड निश्चितच नव्या बदलांची नंदी म्हणून बघण्यास हरकत नसावी. त्यांच्या या निवडीने मराठी साहित्य विश्वात एक नवे पर्व सुरु होत असल्याची प्रतिक्रिया माध्यमांमधून व्यक्त होते आहे. या निवडीवर सोशल मीडियावरही अत्यंत बोलक्या प्रतिक्रिया उमटल्या. फेसबुक, व्हाट्सअप आणि ट्विटर आदींवर शुभेच्छा देणारी रीघ लागली. माझ्या फेसबुक पेज साठी मी ही अरुणाजींबरोबरचे जुने फोटो शोधत होतो आणि मनात मात्र त्यांना भेटल्याच्या, त्यांच्याशी बोलल्याच्या आठवणी जाग्या होत होत्या.
मी पुण्याच्या ‘आबासाहेब गरवारे महाविद्यालया’त असतांनाची गोष्ट. पत्रकारिता विभागाचा एक विद्यार्थी म्हणून त्यावेळी मी तिथे शिकत होतो. सांस्कृतिक समृद्धी ही पुण्याची ओळख. अर्थातच, आमचं महाविद्यालयही त्याला अपवाद नव्हतं. त्यावेळी बरेचसे मान्यवर आमच्या महाविद्यालयाला भेट देत असत. त्यातून त्यांच्या व्याख्यानाची, त्यांच्याशी भेटण्या-बोलण्याची संधी आम्हा विद्यार्थ्यांना मिळत असे. त्यावेळी पत्रकारिता विभागातील आम्ही काही विदयार्थी महाविद्यालयाच्या उपक्रमांमध्ये आवर्जून सहभाग घेत असू. एकदा महाविद्यालयाच्या स्नेह संमेलनातील वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनसाठी अरुणाजी आमच्याकडे येणार असल्याची बातमी मराठी विभागाच्या प्राध्यापकांनी आम्हाला सांगितली. आम्ही आनंदून गेलो. मुळात, ज्यांच्या विषयी, ज्यांच्या साहित्याविषयी नेहमी वाचायला मिळतं त्यांनाच साक्षात भेटण्याची ही संधी आम्हाल चालून आली होती. कार्यक्रमाच्या दिवशी जरा तास - दीड आधीच आम्ही काही निवडक विद्यार्थी मराठी विभागात दाखल झालो आणि अरुणाजींच्या येण्याची वाट बघत बसलो. त्या आल्या. निश्चितच त्यांना भेटणं त्यावेळी आमच्यासाठी सुवर्णसंधीच होती. त्यांची फार काही पुस्तकं वाचली होती असं नाही पण एक अनामिक आकर्षण साहित्य क्षेत्रातल्या या हस्ती बद्दल निश्चितच आमच्या मनात होतं. त्या आल्या त्यावेळी नेमकं काय बोलायचं ? सुरुवात कुठून करायची ? असं काहीच सुचत नव्हतं. आमच्या मनातलं बहुतेक अरुणाजींनी ओळखलं असावं. त्यांनीच स्वतःहून आमच्याशी बोलायला सुरुवात केली आणि मनावरचा भार हलका झाला. मुळातच त्यांच्या आवाजात एक प्रकारचा आश्वासक असा मातृत्वाचा आधार आहे. खूप छान वाटलं. आम्ही फुलात गेलो. त्यांच्या साहित्यातलं फार काही वाचलं नसल्याबद्दल मी सांगितलं, त्यावर त्या छान हसल्या. नंतर मात्र आमच्या गप्पा आणखीच फुलायला लागल्या. अनेक विषयांवर त्यांनी आपलं मत आमच्यासमोर व्यक्त केलं. तेव्हा सहज बोलता - बोलता कुणीतरी माझ्या मित्राने मी विदर्भातल्या ‘रिद्धपुर’ गावाचा असल्याचं त्यांना सांगितलं. त्यावर अगदी आतुरतेनं त्यांनी गावाबद्दल विचारलं. मराठी साहित्याचा आद्य ग्रंथ ‘लीळाचरित्र’ माहिमभट्टांनी याच आमच्या ‘रिद्धपुर’ गावात लिहिला. मराठी भाषेची आद्य कवयित्री महदंबा हीनही ‘धवळे’ या भूमीवर रचलं. महानुभाव मराठी साहित्याची काशी म्हणून प्रसिद्ध असलेलं हे गाव. त्यांनाही या साऱ्या विषयाची मुळातच गोडी असल्याचं त्यांच्या बोलण्यावरून जाणवत होतं. माझ्या गावा विषयी, महानुभावांच्या मराठी साहित्यातील योगदानाविषयी त्यांच्याकडून ऐकून एक वेगळा जिव्हाळा आमच्यात निर्माण झाला. पुढे कार्यक्रमाची वेळ झाली. आणि आम्ही त्यांना कार्यक्रम स्थळी घेऊन आलो. त्यावेळी त्यांनी स्नेह संमेलन आणि वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटक म्हणून खूप सुंदर भाषण केलं. त्यांच्या विदयार्थी दशेतले वक्तृत्व स्पर्धेतले अनुभवही आम्हाला सांगितले. ते सारं काही प्रेरणा देणारं होतं. कार्यक्रम संपला. आम्ही त्यांना सोडायला आलो. त्यावेळी घेतलेली त्यांची सही मी अजूनही तशीच जपून ठेवली आहे.
पुढे मात्र, अनेक कार्यक्रमांच्या निमित्तानं सातत्यानं त्यांच्याशी संपर्क आला. पुण्यात पत्रकारिता करीत असतांना बऱ्याच विषयांवर त्यांचे विचार जाणून घेण्याची संधी मला मिळाली. आजही फोन वरून कधीतरी त्यांच्याशी बोलणं होतं. तो मायेचा आवाज नवं काहीतरी करण्याची, धडपडण्याची प्रेरणा देतो.
आज जेव्हा अरुणाजी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून निवडल्या गेल्या तेव्हा मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या कुणाही इतका आनंद मलाही झाला. मुळात, साहित्य संमेलनाच्या निवडणुका, त्यातील घाणेरडं राजकारण, गट्ठा मतं आणि त्यातून साहित्य बाह्य आरोप-प्रत्यारोपातून कलुषित होणारं वाङमय विश्व यातून उच्च दर्जाच्या साहित्यिकांना अध्यक्षपदापासून दूर राहावं लागलं आहे. त्यातून साहित्यिक, उपसाहित्यिकाही नसणारे लोक अध्यक्षाच्या खुर्चीवर बसून स्वनामधान्य झालेत. या साऱ्या प्रक्रियेत कुठे तरी खंड पडवा आणि अत्यंत मानाचं, महत्वाचं असं हे पद सन्मानानं देण्यात यावं याविषयी मराठी साहित्य विश्वात सातत्यानं चर्चा होत होती. याविषयी सहज एकदा प्रा. सदानंद मोरे सरांना विचारलं असता, “लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणूक प्रणाली स्वीकारली की हे जय-पराजय होणारच” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. ते ही खरंच आहे. मात्र, महामंडळाच्या आजच्या या निवड प्रक्रियेने नवा मार्ग पुढे आणला आहे. काळाच्या कसोटीवर कोणत्याही साहित्य प्रवाह आणि साहित्यिकांवर अन्याय न होता हे सारे सुरु राहिले तरच ते प्रासंगिक ठरेल.
आज अखिल भारतीय साहित्य महामंडळाने यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर सन्मानपूर्वक निवडीचा घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय निश्चितच मोलाचा मानावा लागेल. अरुणाजी या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडल्या गेल्या आहेत. तब्बल १८ वर्षांनी पुन्हा एकदा एक महिला संमेलनाध्यक्षपदी विराजमान होणार आहे. यापूर्वी २००१ मध्ये डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी अध्यक्षपद भूषवलं होतं. संमेलनाच्या इतिहासात कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष या चारच महिलांना आजवर संमेलनाध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. पाचव्या महिला संमेलनाध्यक्ष म्हणून त्यांना मिळालेला हा मान मोलाचा आहे. त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून त्या आता नेमकी काय भूमिका मांडतात याविषयी सारीचें लक्ष लागून राहिले आहे. समकालीन भयग्रस्त वातावरणात साहित्य आणि साहित्यिकांची जबाबदारी त्या कशा मांडतात हे बघणे महत्वाचे ठरेल.
************
पूर्वप्रकाशित
१
दैनिक जनमाध्यम
दिनांक ६ नोहेंबर २०१८ |
२
अक्षरनामा
अरुणा ढेरे सध्याच्या भयग्रस्त वातावरणात आपली जबाबदारी
कशी निभावतात, हे महत्त्वाचं !
https://www.aksharnama.com/client/article_detail/2722?fbclid=IwAR097-yaVM
ujE1FjUC77dpGEWIqITENUs6ruLEjrpKlii3eDMRm5ixj9ITY
ujE1FjUC77dpGEWIqITENUs6ruLEjrpKlii3eDMRm5ixj9ITY
३
महाराष्ट्र दशा
अरुणाजींशी पहिली भेट
https://maharashtradesha.com/article-on-aruna-dhere-written-by-kunal-ranteke/
?fbclid=IwAR0rOsrJPtHe4vGnW_Y6HpgdzR0zs96qN3vCtU1F7AhGzGUbbCMcGV7_w6g
?fbclid=IwAR0rOsrJPtHe4vGnW_Y6HpgdzR0zs96qN3vCtU1F7AhGzGUbbCMcGV7_w6g
४
डेली हंट
अरुणाजींशी पहिली भेट
No comments:
Post a Comment