Saturday, 13 October 2018

ऐतिहासिक येवले परिषद आणि 
बाबासाहेबांच्या क्रांती घोषणेचा समकालीन अन्वयार्थ



येवले परिषदेस संबोधित करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर


भारतीय दलित, शोषित, वंचितांचे मुक्ती प्रेरक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या येवले येथील परिषदेतील क्रांती घोषणेला आज दिनांक १३ ऑक्टोंबर २०१८ रोजी ८३ वर्ष पूर्ण होत आहेत. बाबासाहेबांची “मी हिंदू म्हणून जन्मास आलो तरीही हिंदू म्हणून मारणार नाही’ ही ऐतिहासिक घोषणा पुर्वाश्रमीच्या भारतीय अस्पुश्यांना मानवतेचा मार्गदीप ठरली आणि समानतेच्या प्रकाशात त्यांचे जीवन न्हाऊन निघाले. बाबासाहेबांची ही घोषणा खऱ्या अर्थाने भारतीय जातिवर्गलिंगभेदअंतक क्रांतीची मुहूर्तमेढ म्हटली पाहिजे. या परिषदेच्या माध्यमातून निर्माण झालेल्या जाणिवा दलितांना मानसिक दृष्ट्या शोषनाधिष्टीत धर्माच्या वर्चस्वातून मुक्त करण्यास सहायक ठरल्या.


मुळात, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले अवघे आयुष्य कोट्यवधी दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी वाहून दिले. सर्वार्थाने उपेक्षित समाजाच्या प्रगतीसाठी ते दिवसरात्र झटत होते. देशातील कथित सवर्ण समाजाच्या मनाला कधी तरी पाझर फुटेल आणि आपणासारखेच इतर ही सर्व सामान आहेत हा भाव त्यांच्यात जागृत होईल हा आशावाद ते बाळगून होतो. धर्मांतर्गत सुधारणांच्या सर्व पातळीवरील प्रयत्नांना अपयश आल्यानंतर मात्र धार्मिक, सामाजिक हक्कांसाठीचे ‘सत्याग्रह’ सोडत ज्या प्रस्थापीत धर्म व्यवस्थेत अस्पृश्यांना पशूंपेक्षाही हीन वागणूक दिली जाते त्या व्यवस्थेचा त्यागच त्यांच्या मुक्तीचे माध्यम होईल हा विचार त्यांच्या मनात निर्माण झाला. हिंदू धर्म आणि तत्वज्ञानावर त्यांनी सातत्याने विवेकाधिष्टित टिका केली मात्र एक माणूस म्हणून त्यांचे संपूर्ण समाजावर निखळ प्रेम होते. मात्र, आपल्या समाजाला मिळत असलेली हीनतेची वागणूक त्यांचे मन विषन्न करीत असे.


सामाजिक न्यायाच्या प्रतिष्ठापनेसाठी त्यांनी हिंदू धर्मातील विषमतावादी तत्वज्ञान आणि त्याच्या आचारपद्धती विरुद्ध व्यापक लढा देण्याचा सर्वांगीण प्रयत्न सातत्याने केला होता. त्याच मालिकेत पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठे व मंदिरे यात प्रवेश मिळाला पाहिजे यासाठीचा व्यापक संघर्ष आपण लक्षात घ्यायला हवा. त्यातून ४ सप्टेंबर १९२७ रोजी ‘समाज समता संघा’ची स्थापना, १३ नोव्हेबंर १९२७ रोजी अमरावती येथे अंबादेवी मंदीर सत्याग्रह, २५ डिसेंबर १९२७ साली महाड येथील सत्याग्रह व मनुस्मृती दहन, २९ जून १९२८ साली 'समता' पाक्षिकाचा आरंभ, ३ मार्च १९३० रोजी नाशिक येथे काळाराम मंदिर प्रवेश, २४ नोव्हेबंर १९३० साली 'जनता' साप्ताहिकाची सुरुवात, १४ ऑगस्ट १९३१ रोजी मुबंई येथे महात्मा गांधी समवेत पहिली भेट नंतर २५ सप्टेंबर १९३२ रोजी ऐतिहासिक पुणे करार आदीं महत्वपूर्ण निवडक घटनांचा समावेश येवले परिषदेच्या पार्श्वभूमीवर करता येईल. मात्र, सवर्ण हिंदू समाजाच्या हृदय परिवर्तनाचे हे सारे प्रयोग होत असतांनाच त्यांना मात्र हा अस्पृश्य समाज अजूनही कुत्र्या मांजरापेक्षाही खालचा वाटे. या पार्श्वभूमीवर विदर्भातील तत्कालीन दलित नेते व आंबेडकरांचे श्रद्धास्थान गुरुवर्य किसान फागूजी बनसोड यांच्या 'प्रदीप' या काव्यसंग्रहातील खालील ओळी महत्वाच्या वाटतात.


“हरी मज पशु कर वा पक्षी कर,
परी करू नको महार !
पक्षी योनी राघो केला,
तरी हिंदू शिकविती.
महार केलिया विटाळ म्हणुनी,
शिक्षण बंदी करती…”


दरम्यान, नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेश चळवळीच्या काळातच बाबासाहेब ‘गोलमेज परिषदे’त गुंतून गेले होते. या परिषदेतीतून अस्पृश्यासाठी मिळेल ते खेचून आणण्याचे शर्थीचे प्रयत्न त्यांची चालवले होते. त्याच वेळी मंदिर प्रवेशाचा लढा ही त्यांनी त्यांच्या सहकारऱ्यांमार्फत गेली पाच वर्ष लावून धरला होता. मात्र, अजूनही अस्पृश्य समाजाला माणूस म्हणून मानायला नकार देणारे सनातनी मंदिर प्रवेशाच्या विरुद्धच होते. ज्या धर्मात पशूंना मंदिरात प्रवेश करण्याची मुभा आहे मात्र सर्वार्थाने सामान असलेल्या मानवास तेथे बंदी घालण्याच्या दांभिक प्रवृत्ती विरुद्ध बाबासाहेबांनी “ज्या धर्मात आम्हाला कुत्र्याचीही किंमत नाही त्या धर्मात आता आपण राहायचे नाही” असा निर्धार करून धर्मांतराचा विचार आपल्या कार्यकर्त्यांना बोलून दाखवण्यास सुरुवात केली. आपल्या समाजाचे या विषयी काय मत आहे याविषयीही बाबासाहेबांना उत्सुकता होती. समाजही आता जागृत व्हायला लागला होता. अर्थातच त्यासाठी बाबासाहेब आणि त्यांच्या पूर्वसूरींचे प्रयत्न कारणीभूत होते. मात्र, सातत्याने नागावल्या गेलेल्या शोषित समाजासाठी नवा समतामूलक मानव धर्म पर्याय म्हणून त्यांना हवा होता. हा धर्म अर्थातच बुद्धाच्या महान धम्माच्या रुपाने त्यांनी त्यांच्या समाजाला पुढे दिला.


अस्पृश्यतेच्या प्रश्नावर व्यापक चर्चा करण्यासाठी आणि समाजासमोर समतेच्या आग्रहाचा निर्धार व्यक्त करण्यासाठी बाबासाहेबांच्या नेतृत्वात दिनांक १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवले मुक्कामी एक परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून सुमारे १०,००० पेक्षा जास्त लोक उपस्थित राहिले होते. बाबासाहेबांविषयीची कृतार्थता आणि मुक्तीची चाड असलेला हा समाज नव्या दिशेने मार्गक्रमण करण्यास सिद्ध होऊ बघत होता. परिषदेचे स्वागताध्यक्ष अमृत धोंडिबा रणखांबे हे कार्याच्या यशस्वीतेसाठी अविरत झटत होते. अपूर्व उत्साहात परिषदेस सुरुवात झाली.


यावेळी भरगच्च सभामंडपात बाबासाहेबांनी अत्यंत प्रभावी अशा शब्दात विषमतावादी धर्म आणि त्याच्या तत्वज्ञानाची चिकित्सा करत आपल्या समाजाच्या मुक्तीचा मार्ग काय असू शकतो यावर व्यापक विचार व्यक्त केले. त्यावेळी त्यांनी, “मागच्या पाच वर्षापासून आपण सर्वानी मोठ्या कष्टाने काळाराम मंदिराची चळवळ चालविली. पैसा आणि वेळ खर्ची घालून चालविलेला हा पाच वर्षाचा झगडा व्यर्थ गेला. हिंदूच्या पाषाणहृदयाला पाझर येणे अशक्यप्राय आहे, हे आता पक्के झाले आहे. काळारामाच्या निमित्ताने माणूसकीचे अधिकार मिळविण्यासाठी चालविलेली ही चळवळ निष्फळ ठरली. अशा या निर्दय व अमानुष धर्मापासून फारकत घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आपण हिंदू आहोत केवळ याच कारणास्तव आपल्यावर हे अस्पृश्यत्व लादण्यात आले आहे. तेच जर आपण दुसऱ्या धर्माचे असतो तर हिंदू आपल्यावर अस्पृश्यत्व लादू शकले असते काय ? हा धर्म सोडून एखाद्या दुसऱ्या धर्मात जावे असे तुम्हाला वाटत नाही काय ?” असा प्रश्न उपस्थितांना केला. त्यांच्या या प्रश्नाला टाळ्यांच्या गजरात श्रोत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. याच भाषणात पुढे बाबासाहेबांनी “मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हते. हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही.” ही ऐतिहासिक घोषणा करून शोषणवादी धर्म त्याग करण्याचा मनोदय व्यक्त केले. अर्थातच त्यांची ही घोषणा म्हणजे येथील संतांनी व्यवस्थेवर घाव होते. लोकांच्या जीवनात रक्तविहीन मार्गाने होऊ घातलेल्या क्रांतीचा तो आगाज होता.


ही ‘भीमगर्जना’ ऐकून अस्पृश्य समाजामध्ये उत्साहाला उधाण आले. पिढ्यांपिढ्यांची गुलामगिरी क्षणात मानाच्या पातळीवरून मुक्त होऊ बघत होती. धर्मांतराच्या या घोषणेने एक निर्णयात्मक संदेश समाजापर्यंत पोहचला होता. भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात बाबासाहेबांनी आता मंदिर प्रवेशाच्या चळवळी थांबवण्यास आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले. ही नव्याला युगाची सुरुवात होती. संमिश्र अशा प्रतिक्रिया या परिषदेच्या आणि बाबासाहेबांच्या भीमगर्जनेच्या निमिताने समाजाच्या प्रत्येक जाती-वर्गातून व्यक्त झाल्या. बाबासाहेबांचा हा निर्धार १ ऑक्टोंबर १९५६ रोजी नागपूर च्या आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेच्या निमिताने दीक्षाभूमीच्या पावन परिसरात नागपूर मुकाम्मी फलद्रुप झाला.


   अस्पृश्यतेचे चटके सोसत मानवी हक्क नाकारल्या गेलेल्या समाजाला बाबासाहेबांच्या धर्मांतर चळवळीतून आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला. त्यातूनच समकालीन विकास आणि सामाजिक परिवर्तनाची बीजे रोवल्या गेली. मुळात, भारतीय समाज धर्म विहीन अवस्थेत जगण्यास अद्यापही अवधी असल्याने विवेकवादी समतामूलक असा बुद्धांचा धम्म बाबासाहबांनी आपल्या या समाजाला दिला. त्यातूनच प्रज्ञा, शील आणि करुणेचा मूलमंत्र घेऊन समकालीन समतेचा हा संगर शांततामय मार्गाने दलित समाज लढतांना दिसून येतो. हे सारे संचित बाबासाहेबांचे आहे.    

पूर्वप्रकाशित -

१) ‘द वऱ्हाड’ - दिनांक १४ ऑक्टोंबर २०१८

२) ‘अक्षरनामा’ - दिनांक १५ ऑक्टोंबर २०१८
सामाजिक परिवर्तनाची बीजे रोवणारी डॉ. आंबेडकरांची क्रांतीघोषणा!




No comments:

Post a Comment