स्त्री : एक टिप्पणी
नुकताच कॉ. डॉ. सोनाली ठवकर यांचा
‘बलात्कार’ हा लेख वाचण्यात आला. स्त्रीत्व आणि बलात्काराच्या प्रश्नाचा त्यांनी घेतलेला आढावा निश्चितच समकालीन वास्तवात महत्वाचा ठरतो. एकंदरीतच ‘स्त्री’ प्रश्नावर या लेखाच्या अनुषंगाने ही एक टिप्पणी…
हजारो वर्षांच्या काळापासून जागतिक परीपेक्षात ‘स्त्री’चा वापर भोगवादी दृष्टिकोनातून करण्याची जणू परंपराच आहे. अर्थातच त्यासाठी धार्मिक, सांस्कृतिक, वंशीय, जातीय अशा कितीतरी भ्रमपोषक घटकांना पाणी घालण्यात आले. तथाकथित शुद्धत्तेचे नाते स्त्रीजातीशी जोडण्यात आले. मुळात, केवळ शरीर सुखाच्या भावनेतून स्त्री जातीचा ‘मादी’ म्हणून केलेला वापर आदिम साम्यवादानंतरच्या मानव जातीच्या टोळी काळात पर्यायी युद्धभूमी म्हणून आणि शत्रू पक्षाच्या हीनत्व भावनेला अधोरेखित करण्यासाठी करण्यात येऊ लागला. अर्थातच पुढे समाजव्यवस्थेच्या विकास टप्प्यातही व्यवस्थेच्या चाव्या पुरुषसत्तेच्या कंबरेलाच असल्याने त्यासाठी पद्धतशीर अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्यासाठी स्त्री च्या शरीरशास्त्राचा खोटा आधारही घेण्यात आला. धर्म व्यवस्थेच्या माध्यमातून त्यासाठी मूलभूत प्रयत्न केल्याचे सातत्याने दिसून येते.
मुळात, स्त्री विरोधातील हिंसा हा केवळ संबंधित स्त्रीचाच एकमेव प्रश्न नसून त्यामागची कारण परंपरेचा आढावाही आपल्याला घ्यावा लागेल. अर्थातच ही कारणे तपासतांना हजारो वर्षांच्या पुरुषसत्तेचा आणि धर्म सत्तेचा पगडा दृगोच्चर झाल्याशिवाय राहणार नाही. जिथे एखाद्या धर्माचे तत्वज्ञानच ‘न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हती’ असा ठोस आदेश देते, त्याचा आचार मार्गही शोषणाचे उपयोजन करणाराच असणार आहे. मग अशा भ्रमशोषणपोषक वातावरणात समतेचा विचार जन्मास हजारो वर्षे लागणे हे अर्थातच आले. मुळात जी बंडे समाज आणि धर्म व्यवस्थेच्या शोषणाविरुद्ध अंतर्गत परीपेक्षात झाली तिचे रूपांतरही कालांतराने त्या व्यवस्थेशी समन्वय आणि पुढे संमेलन या थराने होत जाते. मग सुधारणेसाठी मूलतत्वांचे निर्मूलन हाच एकमेव मार्ग ठरतो. यासाठी समता, न्याय, मैत्रीभावना, स्वातंत्र्य ही मूल्ये सातत्याने समाज मनावर बिंबवावी लागतात आणि विवेकाधिष्टिततेचा विचार पेरणारे शिक्षण करावे लागते.
No comments:
Post a Comment