प्रल्हादजी छाब्रिया : अ सेल्फमेड मॅन
फिनोलेक्स उद्द्योग समूहाचे संस्थापक प्रल्हादजी छाब्रिया यांना भावपूर्ण श्रद्धांजली
देशाच्या फाळणीनंतर निर्वासित म्हणून भारतात येत मातृभूमीच्या हितासाठी कष्ट सोसत, सामाजिक भावनेतून उद्योगविश्वाची उभारणी करीत नवा आदर्श निर्माण करणाऱ्या उद्योगमहर्षी प्रल्हाद छाब्रिया यांचे दि. ५ मे रोजी पुण्यात निधन झाले. समाजाची जाण असलेला उद्योगरत्न आपण गमाविला. पण, त्यांच्या चिरंतन स्मृती मात्र सतत भारतीयांना नवी प्रेरणा देत राहतील. अशा द्रष्ट्या उद्योजकाला शब्दरूपी पुष्पांजली...
देशाची फाळणी झाल्यानंतर राष्ट्र उभारणी करण्याची मोठी जबाबदारी भारतीयांवर होती. मात्र, त्यात आपले सर्वस्व गमाविलेल्या निर्वासितांची भूमिकाही तितकीच मोलाची म्हणावी लागेल. न डगमगता येणाऱ्या परिस्थितीला धैर्याने सामोरे जात स्वतःला सावरत मातृभूमीसाठी झटणारी माणसे त्या काळात सुदैवाने आपल्याला लाभली; म्हणूनच आज देशाचा प्रवास महासात्तेकडे होत असल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे. याच विविधांगी क्षेत्रात राष्ट्रनिर्मात्यांच्या परंपरेत प्रल्हाद छाब्रिया यांचे नाव आदराने घ्यावे लागेल. प्रल्हादजी यांचा जन्म १९३० सालचा. आजच्या पाकिस्तानातील कराची शहरात त्यांचे बालपण गेले. मात्र, सर्व सामान्यांना लाभणारे बालपण काही त्यांना उपभोगता आले नाही. प्रल्हादजींच्या जन्मानंतर त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर मात्र घरातल्या कर्त्या पुरुषाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. अगदी उमलत्या वयातच परिवाराच्या भरणपोषणाची जबाबदारी आल्याने त्यांना केवळ १० रुपये महिना पगाराची नोकरी धरावी लागली. मात्र, जबाबदारीच्या जाणिवेतून नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा त्यांच्या मनात निर्माण झाली. पुढे १९४७ च्या काळात मात्र देशाला फाळणीच्या संकटातून जावे लागले. यातच छाब्रिया कुटुंबाला कराची सोडून स्वतःच्या देशात येण्यासाठी धडपडणे महत्त्वाचे झाले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नसतानाही केलेले हे स्थलांतर मात्र जणू नव्या काळाची नांदीच होती. कराचीवरून अमृतसर आणि पुढे हितचिंतकांच्या सांगण्यावरून त्यांनी पुण्याचा मार्ग धरला.
महाराष्ट्राच्या इतिहासात १९६०चे दशक महत्त्वाचे ठरते ते उद्योगविश्वाच्या उदयाच्या निमित्ताने. याच काळात प्रल्हाद छाब्रिया हे अमराठी नावही मराठी उद्योगविश्वात तितक्याच आत्मीयतेने पुढे आले. ‘फिनोलेक्स’ उद्योगसमूहाची स्थापना करीत देशात प्रथमच जेली भरलेल्या दूरसंचार केबलची निर्मिती करण्याचा मान त्यांनी पटकाविला. महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या इतिहासात कृषी क्षेत्रात क्रांतिकारक ठरलेली ठिबक सिंचन प्रणाली निर्माण करीत ती सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न म्हणजे राष्ट्र उभारणीच्या कार्यातील आदर्शच म्हणावा लागेल.
आजही महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांत ‘कधी न संपे माउलीची वारी, फिनोलेक्स देई पाण्याची अखंड धारी’ हे ब्रीदवाक्य फिनोलेक्स उद्योगसमूहाच्या सिंचन क्षेत्रातील योगदानाचीच जणू साक्ष देते. सतत उद्योगी राहत आपण करीत असलेल्या कामाशी निष्ठा बाळगत उत्पादनाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड न करता प्रल्हादजींनी ‘तयाचा वेलू गगनावरी’ नेला. त्यातूनच केवळ ५० रुपयांच्या भांडवलावर सुरू केलेल्या फिनोलेक्स उद्योगसमूहाची १० हजार कोटी रुपयांची उलाढाल यशस्वी करीत देशातच नव्हे, तर अांतरराष्ट्रीय स्तरावर कार्यकर्तृत्वाची मोहोर त्यांनी उमटविली.
जगातील काही प्रगत देशांनाही फिनोलेक्सबरोबर करार करणे महत्त्वाचे ठरू लागले. प्रल्हादजींच्या कष्टाला मिळालेली ही पावतीच म्हणावी लागेल. हलाकीच्या परिस्थितीतून वर येऊन आर्थिक साम्राज्याचा डोलारा निर्माण करणारे महाभाग समाजात काही कमी नाहीत. मात्र, स्वतःबरोबरच इतरांना आधार देणारे हात दुर्दैवाने कमी आहेत. प्रल्हादजींनी मात्र आकाशाला गवसणी घालत पाय घटत जमिनीवर रोवून ठेवत समाजाशी असलेली आपली नाळ कधी तुटू दिली नाही. सामाजिक क्षेत्रातही त्यांनी आपला वावर अखेरपर्यंत कायम ठेवला. याच भावानेतून त्यांनी ‘मुकुल माधव फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. त्याचबरोबर संशोधनाला वाव देण्यासाठी ‘होप फाउंडेशन अॅण्ड रिसर्च सेंटर’ या प्रकल्पाची निर्मितीही केली. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी आर्थिक गणिताचा विचार न करता रत्नागिरीसारख्या भागात शाळेची निर्मिती करतानाच उच्चशिक्षणासाठी जागतिक दर्जाची शैक्षणिक संकुले निर्माण केली. त्यात इंजिनिअरिंग इनि्स्टट्युशन फिनोलेक्स अॅकॅडमी आॅफ मॅनेजमेंट अॅण्ड टेक्नॉलॉजीसह हिंजवडी येथील ‘इंटरनॅशनल आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’ आदी समृद्ध ज्ञान शाखांचीही त्यांनी सुरुवात केली. आपला हा सारा प्रवासही त्यांनी समर्थपणे रेखाटत आदर्शाचा ठेवा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले ते 'देअर्स नो सच थिंग अॅज अ सेल्फमेड मॅन' नावाच्या आत्मचरित्रातून.
प्रल्हादजींच्या कार्याने ‘सगुण फलनतः सज्जनां कुटुंबि’ या संस्कृत सुभाषिताची आठवण होते. कारण, सद्भावनेने सत्कार्य करणा-यांच्याच भाळी सत्काराचे येणारे भाग्य प्रल्हादजींच्या रूपाने चिरंतन प्रेरणा देत राहते.
------------------------------
'दैनिक नवराष्ट्र'च्या दिनांक ८ मे २०१६ च्या अंकात
प्रल्हादजी छाब्रिया यांच्या जीवन कार्याचा आढावा घेणारा
हा माझा लेख...
#pralhadchhabriya #finolex #navrashtr #pune #makeinindia
No comments:
Post a Comment