मक्ता तुमचाच का ?
भारतातील पहल्या महिला रायडर ईशा गुप्ता यांची अनोखी सफर
"महिलांसाठी असुरक्षित देश अशीच आपल्या देशाचे चित्रण सर्वत्र केले जाते. माझ्या प्रवासात मात्र मला तसे अनुभव आले नाहीत. सर्वांना मुक्तपणे जगण्याचा अधिकार देशात असताना महिलाही त्याला अपवाद ठरू शकत नाहीत, हे दाखवून देण्यासाठीच मी भटकत आहे."
-ईशा गुप्ता, बाईक रायडर
पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या बाईक रायडिंग या क्षेत्रात स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करीत देशातील पहिली महिला रायडर होण्याचा सन्मान पटकाविला आहे ईशा गुप्ता या तरुणीने. ११० दिवसांत १७ राज्यांचा प्रवास करण्याचे ध्येय बाळगत वैयक्तिक रायडिंगच्या क्षेत्रात नवा विक्रम गाठण्याचे स्वप्न ईशाने उराशी बाळगले आहे.
रोजच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनातून मुक्तपणे भटकण्याचा निर्धार करीत २६ जानेवारी २०१६ रोजी तिने बंगरूळहून आपला प्रवास सुरू केला. अनुभवांचे ओझे घेऊन तिचा हा प्रवास अजूनही सुरू आहे तो बाईक रायडिंगच्या क्षेत्रात नवा विक्रम गाठण्यासाठीच. आतापर्यंत ६९ दिवसांत २१ हजार १२३ किलोमीटरचा प्रवास करीत ईशा पुण्यात आली होती. त्यानिमित्ताने तिने आपल्या अनोख्या प्रवासातील अनुभव सांगितले.
वाढत्या महिला अत्याचारांच्या घटना आणि त्यातच भारत म्हणजे महिलांसाठी सर्वांत असुरक्षित देश, अशी बाह्य जगाची धारणा होत असतानाच याला विरोध करण्यासाठीच आपण हे धाडस करू शकलो, अशी प्रतिक्रिया या वेळी ईशाने व्यक्त केली. मुळात ‘सीबीआरई’ या नामांकित संस्थेत सीनियर मॅनेजर या पदावर कार्यरत असणारी ईशा ही मूळची बंगरूळची. पण, हल्ली मुक्काम मात्र लखनौ येथे असून, आई केरळची असल्याने ती मात्र कोणत्याही राज्यापेक्षा स्वतःला पूर्ण भारतीय मानते. याचा भारतीयत्वाचा अभिमान बाळगत ‘उत्सव भारतीयत्वाचा’ ही अभिनव ‘थीम’ घेऊन तिने आपला रायडिंगचा प्रवास सुरू केला. प्रवासात आलेल्या अनेक अडचणींवर मात करीत तिने एक अभिमानाचा टप्पा पूर्ण करीत पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात स्वतःची वेगळी मोहोर उमटविली आहे.
मुळात ‘बाईक रायडिंग’चे कोणत्याही प्रकारचे शिक्षण न घेतलेल्या ईशाने याआधीही सुमारे ७ काजार किलोमीटर लांबीचा प्रवास फक्त ४० दिवसांत पूर्ण करीत २० मेट्रो शहरांना भेटी दिल्या होत्या. मात्र, हा प्रवास केवळ महामार्गांवरील असल्याने फारशा अडचणी आल्या नसल्याचे ती सांगते. या वेळचा संपूर्ण प्रवास मात्र सर्वार्थाने वेगळा ठरला असल्याचे सांगत शहरे आणि गावांपासून ते जंगल असलेल्या भागातून अनेक अडचणी आल्याचे ती सांगते. मात्र, या अनुभवामधूनही खूप काही शिकायला मिळाल्याने भावी जीवनाची शिदोरी यानिमित्त बांधता आल्याची भावनाही तिच्या मनात आहे.
कसे आहे प्रवासाचे नियोजन...
दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि गाडीला लागणारी साधने घेऊन तिचा रोजचा प्रवास सुरू होतो. दररोज ३५० ते ४०० किलोमीटरचा टप्पा गाठण्याचे तिचे ध्येय असते. मात्र, जसे आपण एखाद्या प्रवासाचे वेळापत्रक आखतो तसे न आखता मनासारखा भटकणारा प्रवास करण्यातच खरी मजा असल्याचे ईशा सांगते. या प्रवासात कधी मित्रांकडे, कधी हॉटेलमध्ये तर कधी एखाद्या मंदिरात मुक्काम करीत देशाची विविधता जाणून घेण्याबरोबरच आपण सारे एकच आहोत, हा संदेश देण्यासाठी आपला प्रवास असल्याची भावना ईशा व्यक्त करते.