गावरुढींच्या बळी
पुण्यातच महिलांच्या मंदिर प्रवेशास नकार
महाराष्ट्रात सर्वाधिक महिला गुणोत्तर असलेल्या वरदाडे गावाची गोष्ट
ज्या पुण्यापासून आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्याच पुण्यापासून केवळ 3२ किमी लांब असलेल्या पानशेत रस्त्यावरील वरदाडे गावात मात्र आजही महिलांनाच मंदिर प्रवेश नाही. मुळात गावातील सरपंच, ग्रामसचिव, तलाठी, मुख्याध्यापक अशी सर्व पदे समर्थपणे महिलाच भूषवत असतांना त्यांनाच मात्र मंदिर प्रवेशापासून वंचित ठेवण्यात आले आहे.
मंदिर व् ग्रामपंचायत एकाच प्रांगणात : महिलांना मात्र प्रवेश नाही |
टुमदार ग्रामपंचायत असलेल्या वरदाडे गावच्या वंदना शेडे या महिला सरपंच आहेत. दुर्दैवाने मात्र ग्रामपंचायतीतच त्यांना मुख्यदाराने प्रवेश करता येत नाही. आश्चर्य वाटेल पण याचे कारण म्हणजे त्या महिला आहेत हे आहे. मुळात ग्रामपंचायत आणि ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर या दोन्ही वास्तू एकाच ठिकाणी आहेत. अर्थातच महिलांना मादिरातच प्रवेश नसल्याने ग्रामपंचायातमधेही खुद्द सरपंचांनाच मुख्यद्वारातून प्रवेश घेण्यास बंदी आहे. गावरूढी नुसार भैरवनाथ हे वरदाडेचे ग्रामदैवत.या देवाला ‘बाई – बांगडी, हात – बोट’ चालत नसल्याची माहिती गावकरी देतात.
काही वर्षांपूर्वी देवाला असेच ‘न्हात्या – धुत्या’ बाईचे ‘हातबोट’ लागले आणि त्याचा परिणाम म्हणूनच गाववार अरिष्ट आल्याचे भोळे गावकरी सांगतात. कुण्या एका भगताकडून या सर्व कारणामुळे देव कोपला आणि गाव सोडून डोंगरात जाऊन बसल्याची माहितीही गावकना मिळाली होती. सुमारे १० ते १२ वर्ष देवाचा हा कोप गावावर असल्याचे बोलले जाते.अर्थातच याबद्दल दोषी धरले गेले ते गावातल्या स्त्रियांनाच. मग होती नव्हती ती देवदर्शनाची स्त्रियांची संधीही काढून टाकण्यात आली. देवाच्या उत्सवात आणि रंगपंचमीला भरणाऱ्या यात्रेत देवाची पालखी निघते यावेळी देव आपली बहिण कळंबजाई देवीच्या भेटीला जातो त्याच वेळी काय ते महिलांना देवदर्शनाची संधी मिळते.
|
याच खिडकीतून महिला दर्शन घेऊ शकतात |
वर्षभर मात्र महिलांना मंदिरात प्रवेश नाकारला जातो. मंदिराच्या म्हणजेच ग्रामपंचायतच्या भिंतीला मात्र महिलांसाठी तेवढी एक छोटी खिडकी ठेवली गेली आहे. अगदी काही दिवसांपर्यंत महिलांना मंदिर प्रवेश नसल्याची पाटीही मंदिराच्या दाराशी लावण्यात आली होती मात्र मंदिराचे रंगकाम करतांना ती पुसण्यात आली मात्र लवकरच ही पाटी लावण्यात येणार असल्याची माहिती गावक-यांनी दिली.
ओसाडजाई देवी |
याच वर्दाडे गावापासून २ किमी लांब असलेल्या ओसोडजाई देवीच्या मंदिराचीही हीच कथा आहे. चक्क आदिशक्ती पार्वतीच स्त्री रूप असलेल्या या देवीच्या मंदिरात तर महिलांनी प्रवेशाच करू नये अशी पाटीच गावकरी आणि विश्वस्थांनी गाभाऱ्याच्या दाराशी लावली आहे. अर्थातच या मंदिराचे सर्व नित्यविधी करण्याची जबाबदारीही पुरूषांकडेच आहे. यात देवीच्या स्नानापासून ते नैविद्द्या पर्यंतचे सर्व विधी पुरूषाच करतात. देवी स्त्रीरूप असूनही महिलांनाच मंदिर प्रवेश नसणे हीच मुळात दुर्दैवाची बाब म्हटली पाहिजे.
वरदाडे : पुण्यापासून ३२ किमी दूर |
निसर्गाच्या कुशीत वसलेले २४५ कुटुंबाच्या वर्दाडे गावाची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ११८३ एवढी आहे. त्यात ५८४ महिला तर ५९९ पुरुषांचा समावेश होते. संख्यात्मक माहितीचा आधार घेतल्यास अवघ्या महाराष्ट्रातील कोणत्याही गावपेक्षा स्त्री – पुरुष संख्येचे हे प्रमाण दर हजार पुरुषांमागे ९७५ एवढे आहे. निश्चितच ही बाब आपल्या सर्वांसाठीच आशादायक म्हटली पाहिजे. मात्र असे असतांनाही याच गावातील स्त्री पुरुषांना समान संधी उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. शासनाच्या योजनांचा अपरिहार्य परिणाम म्हणून की काय पण गावगाड्याच्या अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणारी वर्दाडे गावाची स्त्री मात्र आजही गावरुढीतच अडकून पडली.
आजच्या आधुनिक काळात महिला गावाची सरपंचच काय तर देशाची पंतप्रधान आणि राष्ट्रपतीही होऊ शकते. कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स बनून अंतराळात जाऊ शकते मात्र हीच स्त्री गावाच्या मंदिरात जावू शकत नाही. आपल्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी निश्चितच ही दुर्दैवाची बाब म्हटली पाहिजे.
तृप्ती देसाई (अध्यक्ष,भूमाता ब्रिगेड) |
छबन जोरकर (ओसाडजाई मंदिराचे पुजारी) |
बाळू शेडे (गावकरी) |
सुलाबाई भालेराव (गावकरी) |
"देवी असली तरीही स्त्रीचेच एक रूप आहे. देवीला सारे सारखेच असतात. ओसाडजाई देवीच्या मंदिरात महिलाआजही जावू शकत नाही. याच्यावर विचार करण्याची गरज आहे. देवासाठी नसला तरीही माणुसकीसाठी महिलांना मंदिर प्रवेश मिळालाच पाहिजे."
---------------------------------------
---------------------------------------
दि.२७ फेब्रुवारीच्या नवभारत ग्रुपच्या 'दैनिक नवराष्ट्र' मधील 'पुणे प्लस'च्या पहिल्या पानावर प्रकाशित झालेली माझी ही 'न्यूज स्टोरी' |
copyright_kunalramteke_feb.2016