होय होय वारकरी : भूमिका
आहे त्या पेक्षा जगाला सुंदर करण्यासाठीच्या प्रयत्नांत मराठी संत आणि त्यांच्या चळवळीचा वाटा अत्यंत मोलाचा राहिला आहे. भारतीय सामाजिक परिपेक्षात भक्ती चळवळीने केलेले अभूतपूर्व सामाजिक प्रबोधन कार्य पुढे दीर्घकाळ चाललेल्या सामाजिक बदलांच्या चळवळीची पायाभरणी करणारे ठरले. मराठी संतांच्या क्रांतीकार्याचे योगदानही निश्चितच या कामी कोणत्याही अर्थाने कमी नाही. भारतीय समाजाच्या पुनर्जागरणाचा आद्य काळ म्हणजे मध्ययुगीन भक्ती चळवळ होय. या माध्यमातून भारतीय समाजाच्या मुलभूत प्रश्नांना हात घालत संतांनी सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. आणि महाराष्ट्र हे त्या क्रांतीचे केंद्र ठरला.
लिंगायत, महानुभाव, वारकरी आणि अशा अनेक समतावादी विचार मांडणारे धर्म, तत्वज्ञान आणि आचार प्रवाह महाराष्ट्राच्या या भूमीत निर्माण झाले. सामतामुलक समाजासाठी धर्म चिकित्सा आणि त्याअनुषंगिक आचार पद्धतीचा पुनर्शोध घेत सर्वसामान्य माणसाला सहज कळेल, रुचेल, पचेल आणि त्याही पुढे जात तो सकळहितवादी असा होता. या परिवर्तनासाठी कोणत्याही रक्तरंजित क्रांतीची आवश्यकता संतांना वाटली नाही. माणूस बदलतो यावर त्यांचा ठाम विश्वास होता आणि हृदय परिवर्तन हे त्यांचे पद्धतीशास्त्र होते.
सर्वार्थाने विषम-विपरीत अशा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परीस्थितीत संतांनी केलेले अभूतपूर्व सामाजिक वर्तन बदलाचे प्रयत्न आजच्या आधुनिक काळातील परिपेक्षात मर्यादित वाटत असले तरीही ते भावी समाजजीवनाची पायाभरणी होती. संतांच्या अध्यात्मिक लोकशाहीकडे याच दृष्टीकोनातून आज आपणास बघावे लागेल. सामाजिक बदलांच्या शस्त्रविहीन लढाईत संतांनी केलेला त्याग, सोसलेली सामाजिक कुदृष्टी आणि हालपेष्टा, प्रसंगी दिलेले बलिदान यांचे सातत्यपूर्ण चिंतन आजच्या स्वयंघोषित आणि बेगडी साधुत्व, स्वार्थी वृत्ती, कट्टर आणि संकुचित धार्मिकतेच्या या काळात अत्यंत महत्वाचे ठरते.
मुळात, संत आणि त्यांचे वांद्मय केवळ सामाजिक मुलभूत प्रश्न आणि समस्यांवर केवळ भाष्य करून थांबले नाहीत तर पराकोटीच्या करुणेने त्यांनी या समस्यांचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला. निसंशय कोणत्याही महामानवांना स्थळ-काळ आणि अन्य तत्कालीन समाजिक परीपेक्षच्या मर्यादा असतात तश्याच मराठी संतांनाही या होत्याच. मात्र या मर्यादा भेदण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न त्यांनी केला आहे.
संतांच्या या करुणामय विद्रोहाची समकालीन मांडणी ‘होय होय वारकरी’ या ग्रंथाच्या माध्यमातून ह.भ. प. ज्ञानेश्वर बंडगर यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक इतिहासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या वारकरी परंपरेचा सखोल आणि चिकित्सक अभ्यास, या परंपरेचा उगम, तिच्या तत्वज्ञानाची बहुपदरी बैठक, संतपरंपरेतील अंतःप्रवाह आणि बहुस्तरिय सामाजिकता, वारकरी विचारविश्वावर इतर विचारसरणींचा आणि इतरांवर वारकरी विचारांचा झालेला परिणाम आणि प्रभाव याचे मुद्देसूद आणि प्रसंगोपात विश्लेषणात्मक मांडणी लेखकाने केली आहे. भारतीय समाजातील जाती आणि लिंगभेदाचा प्रश्नही या माध्यमातून संतांच्या जीवनचरित्र आणि विचारांचे दाखले देत त्यांनी ऐरणीवर आणला असून विषमतावाद आणि समतावादी विचार यांच्यातील सांस्कृतिक संघर्ष वारकरी परंपरेच्या माध्यमातून अधोरेखित करण्याचा त्यांनी प्रयत्न ही लेखकाने केला आहे.
बहुदा वारकरी समुदाय आणि विचारांची मांडणी सांस्कृतिक अंगांनीच करण्यावर विशेषतः आजचा मिडिया आणि नवोदितांचा कल असतांच ह.भ. प. ज्ञानेश्वर बंडगर यांनी मात्र या परंपरेचे सांस्कृतिक आणि धार्मिक सत्तांविरुद्ध उभा केलेला वैचारिक संघर्ष, तिचा ऐतिहासिक विकासक्रम, आणि आधुनिक काळात तिच्यात झालेल्या सांस्कृतिक विकृतीकरणाचे भान ठेवत सामाजिक अंगाने परखड चिकित्सा करत या परंपरेतील मूलगामी मूल्यांचा शोध घेतला आहे. या ग्रंथाच्या माध्यमातून वारकरी परंपरेचा केवळ एक धार्मिक प्रवाह म्हणून नव्हे, तर तो एक सामाजिक परिवर्तनाची दिशा दाखवणारा आणि समतेच्या मूल्यांवर आधारित सांस्कृतिक आंदोलन म्हणून समजून घेण्याचा एक अभ्यासपूर्ण प्रयत्न लेखकाने केला आहे.
या प्रयत्नांत खारीचा वाटा देता आला याबद्दल ‘कोरो इंडिया’ आणि परिवाराचा भाग म्हणून आम्हाला आज अत्यंत आनंद ताटतो. स्वतः ह. भ. प. ज्ञानेश्वर बंडगर यांचाही वर्ष २०२२ पासून समता फेलोशिपच्या माध्यमातून ‘कोरो इंडिया’चा एक कार्यकर्ता म्हणून आत्मीय संबंध आहे. ‘कोरो इंडिया’च्या याच प्रक्रियेत ‘अत्त दीप अकादमी ऑफ ग्रासरूट लीडरशिप’ या विशेषतः तळातील ज्ञाननिर्मिती, प्रचार-प्रसार, उपयोजन, संयोजन आणि पथ प्रदर्शन (डेमोनस्ट्रेशन) यासाठी कार्यरत असलेल्या आमच्या संस्थेचाही मोलाचा वाटा आहे. अकादमीच्या माध्यमातून होत असलेल्या बृहद ज्ञान प्रकल्पाचा एक भाग म्हणून ‘होय होय वारकरी’ हा अत्यंत महत्वाचा सामाजिक दस्तावेज वाचकांच्या हाती येतो आहे याबद्दल कृतज्ञता वाटते. ‘कोरो इंडिया’ आणि ‘अत्त दीप अकादमी’च्या या आणि अशा जनकेंद्रित प्रक्रियांच्या माध्यमातून यापुढेही असेच सकस साहित्य निर्माण होत राहील. अर्थात त्याचा पाया समता आणि आपली संविधानिक मुल्ये असतील.
कुणाल रामटेके