'भाजप' विरुद्ध 'आप' : काम बोलता हैं...
अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल सर्वसामान्यांना अपेक्षित असेच लागले. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या नेत्तृत्वाने विशेषतः मोदी -शहा यांनी आपली उरलीसुरली प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लावली असली तरीही जनमताचा कौल मिळवण्यास हे नेतृत्व सपशेल अपयशी ठरल्याचे या निकालातून ठळकपणे दिसून येते. मुळात सातत्यपूर्ण चुकीची धोरणे, संकुचित राष्ट्रवादाच्या सिद्धांताचे अवलंबन, सामाजिक धृवीकरणाचा प्रयत्न, अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असतांनाही त्याविषयी पराकोटीचा नाकर्तेपणा, जातीय-धार्मिक द्वेष आणि त्यातून वाढती असामाजिकता ही आणि अशी किती तरी कारणे भाजप पराभवाची सांगता येतील. दिनांक १४ फेब्रुवारी रोजी या निवडणुकीची अधिसूचना जाहिर झाल्या नंतरच्या २३ दिवसांमध्ये भाजप ने जवळपास १०० उच्चस्तरीय नेत्यांची फळी प्रचाराला लावली. त्यात अगदी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांसह ४० स्टार प्रचारकांचा समावेश होता. अमित शहा यांनी तर आपल्या प्रचाराची सुरुवात अधिसूचनेच्याही २५ दिवस आधी केली. यावेळी आपल्या मतदार संघात जे फिरकूनही बघत नाहीत तेही दिल्लीच्या रस्त्यांची धूळ चाळते झाले. दिल्लीच्या गल्ली-गल्लीत भाजप ने सुमारे ४५०० सभा घेतल्या. याचवेळी अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षाने ही आपले ३९ स्टार प्रचारक मैदानात उतरवले. त्यात ३ मोठ्या आणि इतर सभांच्या भरोशावर निवडणूक जिंकून दाखवली.मुळात, या निवडणुकीचे विश्लेषण करत असतांना एक बाब प्रकर्षाने जाणवेल ती म्हणजे केजरीवाल यांनी घडवून दाखवलेला बदल हा दिल्लीकरांच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा असतानाही ही निवडणूक जमिनी स्तरावरील मुद्द्यांपेक्षा राष्ट्रीय मुद्यांवर केंद्रित झाली. त्यात एनआरसी, सीएए, राममंदिर, राष्ट्रवाद, कलम ३७७, गौमाता, हिंदू - मुस्लिम, सावरकर तसेच संविधान, सेक्युलरीझम, आंबेडकर आदींचा ढोबळमानाने विचार करावा लागेल. त्यातच केजरीवाल यांच्या ‘काम बोलता हैं’ सोबतच भाजप सरकारच्या धोरणांविरोधात निर्माण होत असलेला पराकोटीचा जन-असंतोष ‘आप’च्या चांगलाच पथ्यावर पडला. असे असले तरीही त्यांच्या या यशाची काही ठोस कारणेही नक्कीच सांगता येतील. त्यापैकी भाजप ने २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ मोदी यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवत प्रधानमंत्रीपदाचा इतर कोणीही दावेदार जोरदार प्रचार करत सुमारे ३०३ जागा जिंकत सरकार स्थापन केले. त्यावेळी दिल्लीत आम आदमी पक्षाला एकही जागा जिंकता आली नव्हती. अनेकांचे डिपॉजिट जप्त झाले होते. यातून धडा घेत केजरीवाल यांनी व्यापक जनसंपर्कांवर लक्ष केंद्रित करत आणि मोदींप्रमाणेच ‘देयर इज नो अल्टरनेटिव (TINA)’ या सूत्राचा अवलंब आणि आपल्या स्वच्छ प्रतिमेचा वापर करत जोरदार बहुमत खेचून आणले. लोकांनीही दिल्ली शिक्षण, वीज, सुरक्षा अशा मुद्द्यांवर झालेले काम लक्षात घेऊन आपली पसंती त्यांना दर्शवली.
दिनांक ८ फेब्रुवारी झालेल्या या निवडणुकीत एकूण ७० जागांसाठी ६२.५९% मतदाण झाले होते. हा लेख लिहीत असतांना आम आदमी पक्षाला ५३.६१%, भाजप ला ३८.५७% आणि काँग्रेस ला ४.३६% मतदान झाले होते. दिल्ली मध्ये भाजप २२ तर काँग्रेस गेल्या ७ वर्षांपासून सत्तेतून दूर आहे. याचा विचार आता संबंधित पक्षाच्या नेतृत्वाला करावा लागले. असे असले तरीही काँग्रेस नेते आणि मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री कमल नाथ यांनी मात्र ‘काय होईल ते आम्हाला माहीतच होते, पण बीजेपी चे काय झाले हे महत्वाचे आहे’ असे विधान केले आहे. त्यावरून या निवडणुकीत या पक्षांना आम आदमी पार्टी च्या जिंकण्यापेक्षा भाजप चे पराभूत होणे जास्त महत्वाचे दिसते.
मुळात, २०१२ साली अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी 'जन लोकपाल' आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या 'आम आदमी पार्टी'चा भारतीय राजकारणात उदय झाला. आज त्या घटनेला केवळ सात वर्ष झाली आहेत. खरेतर कोणताही राजकीय अनुभव, पुरेसे आर्थिक पाठबळ आणि कोणताही विशिष्ट गॉडफादर नसतांना आम आदमी पक्षाने सलग तिसऱ्यांदा मिळवलेला हा विजय बदलांच्या शक्यता वृद्धिंगत करणारा ठरतो. त्या तुलनेत जगातला सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजप चे वय ६८ आज वर्षांपेक्षा जास्त आहे. केवळ काम, जनतेच्या मनात निर्माण केलेला विश्वास आणि प्रासंगिक रास्त भूमिका या शिदोरीच्या बाळावर केजरीवाल आज यशस्वी झाले आहेत.
आज देश पातळीवर विचार करता गेल्या दोन वर्षात भाजप प्रणित एनडीए सरकार ने सात राज्यांमधली सत्ता गमावली आहे. त्यातून केवळ ‘चुनावी जुमला’ नाही तर व्यापक जनहिताचा कार्यक्रम कोणत्याही राजकीय पक्षाने घेतल्या शिवाय यश मिळू शकत नाही. हे या निवडणुकीने पुन्हा एकदाचे सिद्ध झाले आहे. आणि निश्चितच ‘ये जनता है, ये सब जानती हैं’ हेही या राजकीय पक्षांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.