Wednesday, 17 July 2019



माझ्या आठवणीतले ढाले सर



      तारीख कदाचित दोन ओक्टोंबर आणि वर्ष २०१५ चं असावं. पुणे महानगरपालिकेच्या वतीनं त्या वर्षीचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारदेवून पँथर राजा ढाले यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. मुळात, भारतीय स्वातंत्र्याच्या पंचवीसाव्या वर्षपूर्ती निमित्त साधनामध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या लेखावर आक्षेप घेत १९७२ साली याच पुण्याच्या महानगरपालिकेने त्यांच्यावर तहकुबी मांडली होती. त्याच महानगरपालिकेतर्फे ढाले सरांचा हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा निव्वळ आंबेडकरी चळवळीच्या विचारांमधून घडून येत असलेल्या बदलांचा एक परिणाम होता.

      त्यावेळी मी पुण्याच्या गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेच्या पदव्योत्तर पदवीच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी होतो. याअभ्यासक्रमाचा भाग असलेल्या आंतर्वासितेसाठी पुण्यातच एका स्थानिक वृत्त वाहिनीमध्ये मी काम करण्याचा निर्णय घेतला होता. आंतर्वासिता सुरु होवून साधारणतः चार - पाच दिवस झाले असतील. आणि त्याच वेळी साधारणतः दुपारी चारच्या सुमारास माझ्या हाती या सत्कार सोहळ्यासाठी संपादक-पत्रकारना निमंत्रित करणारं पत्र आलं. त्या कार्यक्रमाला जाण्याचा आणि थेट राजा ढाले यांची छोटीशी का होईना पण आमच्या मीडियाच्या भाषेत बाईटघेणाचा विचार मी मनोमन पक्का केला आणि आमच्या संपादकांना गळ घालण्यासाठी त्यांच्या केबिन मध्ये गेलो. मुळात, राजा ढाले यांच्या विषयी मी आधीही बरच काही वाचलं, ऐकलं होतं. दलित पँथरच्या संस्थापकांपैकी ते एक होते. बाबासाहेब आंबेडकर आणि १९७० च्या काळातील दलित साहित्य निर्मितीच्या काळातील ते एक जेष्ठ साहित्यिक होते. 'दलित पँथर' च्या रूपानं त्यांनी सर्वार्थाने शोषित वंचित अशा समाजात सम्यक क्रांतीची बीजे रोवण्याचा मूलभूत प्रयत्न केला होता. या माणसाविषयी आकर्षण असणं अत्यंत स्वाभाविक होतं. मी आमच्या संपादकांशी हा कार्यक्रम मला कव्हरकरायचा असल्याबद्दल बोललो. त्यावेळी टीव्ही मीडियातला माझा अनुभव चार - पाच दिवसांच्या वर निश्चितच नव्हता. माझ्या संपादकांनी मात्र माझा सारा उत्साह बघून हा कार्यक्रम कव्हरकरण्याची संधी मला दिली. एक जेष्ठ कॅमेरामन माझ्या सोबत दिला आणि दुसऱ्या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमाला सुमारे तासाभरा आधीच मी हजर झालो. बऱ्याच दिवसांपासून राजा ढाले यांना भेटण्याची माझी इच्छा आज पूर्ण होणार होती.

      काही वेळातच बालगंधर्वाच्या भव्य सभागृहात कार्यक्रम सुरु झाला. कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पुणे महानगर पालिकेचे तत्कालीन महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या सह अनेक क्षेत्रातील नामवंत प्रामुख्यानं उपस्थित होते. दादांच्या हस्ते त्या जेष्ठ दलित नेतृत्वाचा सत्कार करण्यात आला. यावेळी आपल्या नेहमीच्या विद्रोही शैलीत ढाले सरांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले की फुले-आंबेडकर यांच्यानंतर निर्माण झालेल्या पोकळीमध्ये अन्याय संपला पाहिजे यासाठी आमची पिढी खपली. अन्याय संपला नाही. खूप काही करायला वाव आहे. पण, करू दिले जात नाही. चळवळी मोडल्या जातात. आमचेच लोक प्रलोभनांना बळी पडतात. माणसाने स्वातंत्र्य विसरून काही साध्य होत नाही. असे होकायंत्रहोऊन जगण्यापेक्षा बाबासाहेबांची अस्मिता जागृत ठेवा.मुळात, 'प्रस्तापितांसह दलित चळवळ आणि राजकारण्यांनाही त्या कानपिचक्या होत्या. मुळात, एके काळी पुणे हे भटांचे आणि पेशवाईचे शहर होते. ज्या पुण्यामध्ये सावित्रीबाईंच्या अंगावर शेण टाकले गेले, त्याच पुण्याच्या विद्यापीठाला सावित्रीबाईंचे नाव देऊन पुण्याने सभ्यतेची उंची वाढवत नेली', असे म्हणत त्यांनी पुणे शहराचे आभार व्यक्त केले. जातवास्तवावर बोलतांना आपणास कोणत्याही जाती बद्दल आकस नाही मात्र जात मोडली पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली. पुढे, “माणसाची उंची वाढली तर विचारांची उंची वाढेल. शिक्षणाने माणूस सुशिक्षित झाला असला, तरी सुसंस्कृत झाला नाही. सावित्रीबाईंच्या कार्याने विविध क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत हे खरे असले, तरी अन्यायाचे मूळ स्त्रियांच्या गर्भाशयापर्यंत गेले आहे. ही वृत्ती समूळ छाटली गेली, तरच स्त्रियांसाठी समता हा नवा विचार अमलात येऊ शकेल.असे ते म्हणाले. गंभीर चिंतन, स्वतःत विचारधारेची खोलवर रुजवलेली मुळे, सकस सर्वांगीण वाचन, व्यापक कृतिशीलत्व आदींमधून विकसित झालेली त्यांची स्वतंत्र अशी शैली होती. ते समकालीन भयग्रस्तात अथक पाहरा देणारे कर्ते होते. अगदी . वि. पवारांच्याच भाषेत दलित साहित्याच्या निर्मिती काळात राजा ढाले हातात नंगी तलवार घेऊन दाराशी उभे राहिले नसते तर या साहित्याची भ्रूण हत्यार झाली असती,’ अर्थातच हा माणूस मोठा होता. ढाले सरांनी स्वतःतल्या साहित्यिकावरही यावेळी भाष्य केलं. ते म्हणाले, “मी उद्याचा लेखक आहे. त्यामुळे प्रकाशकाकडे जाऊन पाय चेपत बसणे माझ्या स्वभावात नाही. हे लेखन अनेकांना वर्मी लागले आहे. बंडखोर आहे. मी स्वत: मान्यतेच्या विरोधात असलो तरी या लेखनाला मान्यता मिळत आहे. फुले-आंबेडकरी वारसा अनाथ होता कामा नये ही दक्षता घेतली पाहिजे.निश्चितच सरांचे हे विचार मोलाचे होते. आहेत.

      कार्यक्रमाच्या सांगतेनंतर आम्ही सारे ढाले सरांना भेटायला आणि आमच्या माध्यमांसाठी बाईटघ्यायला स्टेजच्या मागे एका रूम मध्ये गेलो. त्याचवेळी अजितदादांसह काही मान्यवरही तेथे आले होते. त्यांनी आम्हाला प्रतिक्रिया दिल्या. काही वेळानंतर कार्यकर्त्यांमधून अगदी वाट काढत ढाले सर आमच्याशी बोलायला आले. मी आमच्या न्यूज चॅनलचा बूमहाती घेऊन होतो. विविध माध्यमांचे जेष्ठ प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. कदाचित सर्वात लहान असल्याने ढाले सर मला म्हणाले, “टीव्ही प्रतिनिधी ना रे तू ? विचार मग प्रश्न ?” आता इतके सगळे जेष्ठ पत्रकार आणि संपादक मंडळी तेथे असतांना थेट मलाच पहिली प्रतिक्रिया घ्यावी लागणार असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. पण आता वेळ आली होती आणि थेट ढाले सरांनी मलाच आधी बोलायला सांगितलं होतं. उगाच काहीतरी वेळ मारून नेण्यासाठी किंवा प्रश्न फ्रेम करण्यासाठी मी त्यांच्याच भाषणातील मुद्द्याने सुरुवात केली, “फुले, शाहू, आंबेडकरी…” इतकं म्हणतोच तो मला थांबवत ते म्हणाले, “आधी तुमच्या प्रश्नातलं शाहूगाळा ना”, मला नेमकं काय झालं ते काही कळेना.मग तेच बोलते झाले आणि फुले-आंबेडकरी तत्वज्ञान आणि त्यात शाहू छत्रपती महाराजांच्या कार्याचा संदर्भ देत त्यांच्या तत्वज्ञानात्मक उपयोजनावर प्रश्न उपस्थित करत मानवी जीवनाच्या उत्थानासाठीच्या तत्वज्ञानातील थेट संदर्भांच्या शृंखलेवर भाष्य केले. हा संवाद बरेच दिवसानंतर पर्यंत आणि चक्क आजही माझ्या मनात असाच कधी घोळत राहतो. राजा ढालेंसारख्या जेष्ठाने ही भूमिका का घेतली असावी हे माझ्या बुद्धीला आजही कळत नाही. कळले तर वळत नाही. शोषणाधिष्ठीत व्यवस्थे विरोधात संविधानिक मार्गाने आपण सर्व एक व्हावे, तत्वज्ञान, त्याचे उपयोजन आणि संदर्भीय समस्या या मूलभूत प्रश्न बनून पुढे येतील मात्र या आणीबाणीच्या काळात तूर्तास 'कॉमन मिनिमम प्रोग्रॅम' हाती घेऊन संविधानिक मार्गाने आपण लढावे असे माझे मत होते. आहे. कदाचित ढाले सरांना कोणत्याही प्रकारचा राजकीय, सामाजिक समझोता मान्य नव्हता. तात्कालिक बदलांपेक्षा मूलभूत तथा शाश्वत परिवर्तन त्यांना मान्य होते. आपली अवघी हयात आंबेडकरी विचारधारा प्राणपणाने जपण्यासाठी आणि ती जनमानसात पोहचवण्यासाठी त्यांनी खर्ची घातली होती. प्रसंगी प्रस्थापित व्यवस्थे विरुद्ध कोणत्याही मूलभूत भौतिक साधनांशिवाय व्यापक अर्थाने लढा दिला होता. बुद्ध-आंबेडकरी तत्वज्ञानाचे परिशुद्ध रूप समकालीन समाजात रुजवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. मात्र, खूप काही केले यापेक्षा 'खूप काही करता आले असते' असच ते आपल्या म्हणाले होते. आणि त्यातच ते खूप काही ते बोलून गेले होते, सांगून गेले होते. आज त्यांच्या आठवणी, त्यांचा आंबेडकरी क्रांतिकारी इतिहास, त्यांनी मागे ठेवलेली अजरामर सम्यक क्रांतीची चळवळ आज आपल्याला प्रेरणादायी ठरणारी आहे. निश्चितच राजा ढाले सरांवर विरोधक टीका करू शकतात, समर्थक प्रेम करू शकतात मात्र कुणीही त्यांना 'इग्नोर' करू शकत नाही. अगदी कुणाचा इतिहास सुद्धा. सरांना अभिवादन तथा क्रांतिकारी जय भीम.